वाचाल तर वाचाल....
महा एमटीबी   23-Apr-2018वाचाल तर वाचाल असं कोणी तरी म्हणलयं. जर आपण चांगल वाचलं नाही तर आपली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तिचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायची ताकद तयार होत नाही, असं म्हणण चुकीचं ठरू नये.

जसा आहार, विहार याचा आपल्या जडण-घडणीवर परिणाम होत असतो तसाच किंवा त्यापेक्षा पण जास्तच आपल्या वाचनाचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. तर हे सगळ तुम्ही आज का वाचताय असा प्रश्न पडला असेल तर याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक ग्रंथ दिवस...

२३ एप्रिल १९९५ पासून हा दिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणजेच वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो. का बरं ? आजचं का साजरा करतो आपण हा दिवस ? याचं कारण म्हणजे सुप्रसिध्द लेखक - नाटककार विल्यम शेक्सपियर यांची पुण्यतिथी आज असते त्यामुळे त्यांच्या नावाने आजचा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो.

भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला विपुल प्रमाणत लेखकांची, पुस्तकांची, साहित्याची एक परंपरा आहे. या सगळ्यांची आठवण आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. ज्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या पुस्तकांच्या आवडी निवडी. कोणाला गूढ कथा आवडतात तर कोणाला ऐतिहासिक कादंबऱ्या, आणि कोणाला तर, आत्मचरित्र.. असे अनेकविध प्रकार सर्वच देशांच्या साहित्य प्रकारात मोडतात. आणि लोकांना सर्व पुस्तक वाचायला आवडतातही. वयोमाननुसार या आवडी डेव्हलप होतात किंवा बदलतात आणि मग धार्मिक पुस्तकही आवडायला लागतात. आपल्या जीवनाच सार सांगणारी पुस्तक वाचताना आपल्या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी येताना आपण कित्येकदा पाहतो. कारण त्या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांचा अनुभव त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घेतलेलाच असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पुस्तक आपल्या ज्ञानाचा ठेवा वाढवत असतो.

आता आपण २१ व्या शतकात आहोत आता आपल्याला वाचन करायला इ-बुक्स, किंडल सारखे इझी पर्याय उपलब्ध असतात मात्र आजही हातात पुस्तक घेतल्याशिवाय आपल्यला चैन पडत नाही.

आजच्या दिवसाच्या निमित्ताने सोशल मिडियावर खूप प्रकारचे विचार, कोट्स, चित्र आपण पाहतो यातील काही चित्र ही प्रातिनिधीक स्वरूपात आपण खाली पाहूयात -

१. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. गीतेचा सार हे फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला शिवकण देणारी आहे असं एक युरोपीयन लेखकाने म्हणलं आहे.२. ८ व्या शतकात लिहिलं गेलेलं अरेबियन नाईट्स या पुस्तकातील कथा या आपल्याकडील पंचतंत्रातल्या गोष्टींचा आधार घेऊल लिहिल्या असाव्यात असं एका ट्विटर अकांऊटवर म्हणलं आहे.३.
१९५० मध्ये लोकांसाठी फिरते ग्रंथालय होत ज्यात लोक पुस्तक घेत आणि वाचन करत असत कारण प्रत्येक गावात वाचनालय असेलच असा तो काळ नव्हता.४. सोशल मिडियावर आज काही उपहोसात्मक फोटोही फिरताना दिसत आहेत जे मुख्यत्वे आजच्या पिढीचे प्रतिनिधीक रूप आहे असं म्हणाव लागेल.


१९१३ मध्ये भारताला पहिले नोबेल पारितोषिक मिळाले ते पण साहित्यामध्येचं. रबिंद्रनाथ टागोर यांनी यावेळी म्हणलंय की, जे शिक्षण आपल्याला नुसती माहिती देत नाही तर आपलं अस्तिव सर्व घटकांशी जोडतं ते खरं शिक्षण आहे.वाचन आणि त्यांचा विचार यामुळेच आपण आपल्या अस्तिवाचा शोध घेऊ शकतो. वरील उदाहरण ही थोडीच असली तरी साधारण आपल्याला यावरून वाचनसंस्कृतीचा अंदाज बांधता येईल. वाचनाची पध्दती बदलली तरी चालेल पण, वाचन करण्याची आवड, गरज आणि भूक संपता कामा नये. कारण नाहीतर आपण आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधण्याचे अनेक पर्यायांपैकीचा खूप मोठा दुवा गमावून बसू.

शेक्सपियरची आठवण ..


विल्यम शेक्सपियर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस हा ग्रंथ दिवस म्हणून साजरा केला जातो. शेक्सपियर हे थोर लेख, नाटककार, कवी, अभिनेते होते. इंग्लिश रंगभूमीवर आणि साहित्यामध्ये शेक्सपियर यांचं खूप मोठ योगदान आहे. त्यांची हॅम्लेट, रोमियो- ज्युलियट, ऑथेल्लॉ, मॅकबेथ यासारखी दर्जेदार नाटक त्यांनी लिहिली आहेत ज्याचा अभ्यास आजही जगभरातील साहित्यिक अभ्यास करतात.- पद्माक्षी घैसास