स्पर्श उपक्रमामुळे वर्षाकाठी १२० दशलक्ष युनिटची वीज बचत होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |


सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती


मुंबई : राज्यातील शासकीय इमारतींमधील उपकरणामुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्च होत असून वीज देयकामध्येही मोठा खर्च होतो. यामुळे स्पर्श हा आगळावेगळा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्यामुळे राज्य शासनाच्या इमारतीमधील विजेच्या वापरामध्ये बचत होणार असून वर्षाकाठी सुमारे १२० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार असून वीज देयकामध्येही ११४ कोटी रुपयांची बटत होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्यासाठी ‘स्पर्श’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय अनिवासी इमारतींमधील जुनी ट्यूबलाईट, पंखे, वातानुकुलित यंत्रे बदलून ऊर्जा बचत करणारी नवीन उपकरणे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १२६९ शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या असून त्यामुळे सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला असून बिलापोटी देण्यात येणाऱ्या ९२.६८ लाख रुपयांची बचत झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, सर्व शासकीय इमारतींमधील जुनी उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्यामुळे ऊर्जेतील बचती बरोबरच खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सौर ऊर्जेवर भर देण्यात येणार असल्यामुळेही ऊर्जा संवर्धनासाठी मोठा हातभार लागणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात सौरऊर्जेवर भर

स्पर्श हा उपक्रम दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून दुस-या टप्प्यात सौरऊर्जेवर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या सर्व इमारतींच्या छतावर तसेच परिसरातील मोकळ्या जागांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती संच बसविण्यात येणार आहेत. तसेच लागणारी अतिरिक्त वीज ही महावितरण कंपनी तर्फे पुरविण्यात येणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यातील इमारतींचा समावेश

स्पर्श’ प्रकल्पांतर्गत नागपूरमधील राजभवन, विधानभवन, रवी भवन, आमदार निवास, हैद्राबाद हाऊस, पुण्यातील राजभवन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, सोलापूरमधील शासकीय सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड येथील विमा रुग्णालय, मुंबईतील बांधकाम भवन, जीटी हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालय, मध्यवर्ती प्रशासकीय भवन आणि औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठ या इमारतीमध्य ऊर्जा कार्यक्षम पंखे, दिवे, वातानुकुलित यंत्रे बसविण्यात आली आहेत.

@@AUTHORINFO_V1@@