अमेरिका आणि कोरिया संवाद
महा एमटीबी   21-Apr-2018शीतयुद्धात कोरियात उभी फूट पडली आणि त्याचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे दोन स्वतंत्र देश उदयास आले. खरंतर या दोन्ही देशांत काहीच फरक नाही. ना वंशांचा, ना भाषेचा, ना धर्माचा. पण, साम्यवादी आणि लोकशाहीवादी असा विचारांचा संघर्ष इथे निर्माण झाला आणि एका देशात फूट पडून दोन हाडवैरी निर्माण झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन आणि साम्यवाद्यांचा पाठिंबा हा उत्तर कोरियाला होता, तर अमेरिकाप्रणित भांडवलशाही आणि लोकशाहीवादी देशांचा पाठिंबा हा दक्षिण कोरियाला होता. १९५३ साली यावर तोडगा काढून पानमून्जमयेथे कैद्यांच्या अदलाबदलीसंबंधी एक करार झाला. पण, दक्षिण कोरियाने २५ हजार कैदी चाचणीशिवाय सोडले आणि या वाटाघाटीत अडचणी आल्या. शेवटी २७ जुलै १९५३ रोजी शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशांची सीमा ठरविण्यात आली. आज उत्तर कोरियात साम्यवादी पक्षाची एकाधिकारशाहीची सत्ता आहे आणि दक्षिण कोरियात लोकशाही नांदत आहे. साम्यवादाच्या नावाने हुकूमशाही राबविण्यात उत्तर कोरियाचा क्रमांक प्रथम. चीनमध्येही साम्यवादाच्या नावाने हुकूमशाही आणि सामान्य जनतेचे दमन करणे सर्रास चालते. नुकतंच उत्तर-दक्षिण कोरिया या दोन हाडवैरी देशांच्या प्रमुखांची बोलणी व्हावी म्हणून ‘हॉटलाईन’ सुरू करण्यात आली. उत्तर कोरिया हा गेल्या काही वर्षांत आपल्या मनमानी कारभारामुळे आणि सामान्य जनतेवर केलेल्या अत्याचारामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. एका व्यक्तीने चूक केली, तर त्याची शिक्षा पुढच्या दोन पिढ्यांना भोगावी लागते. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किमजोंग ऊन यांचे काका भर सभेत झोपले, याची शिक्षा म्हणून किमयांनी त्यांच्यावर रानटी कुत्रे सोडले. त्या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडून त्यांचा जीव घेतला. या एका प्रकारावरून किमजोंग यांची क्रूरता लक्षात येते. मागे काही महिन्यांत त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. अणुचाचण्याही केल्या. या अणुचाचण्यांमुळे उत्तर कोरियात धक्केही जाणवले. अणुबॉम्ब अमेरिकेवर सोडण्याची धमकीही या माथेफिरु जोंग यांनी दिली होती. अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बसारखे संहारक शस्त्र एका लहरी हुकूमशहाकडे असणे हे जगासाठी अत्यंत धोकादायक. यासाठी अमेरिकेनेही जोंग यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुकता दाखवली आहे. यासाठी शिखर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश असणार आहे, तो उत्तर कोरियाचे निः शस्त्रीकरण.


कोरियाच्या समुद्री भागात हे निःशस्त्रीकरण व्हावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. ट्रम्प यांचे म्हणणे असे की, या बैठकीत कुठलाच निष्कर्ष निघाला नाही तर ते सन्मानपूर्वक या बैठकीतून निघून जातील. ही बैठक जर यशस्वी झाली तर याचा फायदा संपूर्ण जगाला होईल आणि ही बैठक यशस्वीरित्या पार पडावी, अशी ट्रम्प यांची आशा आहे. पण, ही बैठक नेमकी कुठे पार पडेल, याबाबत अजून तरी दोन्ही देशांनी मौन पाळले आहे. दुसरीकडे दोन्ही कोरियन देशांदरम्यान संवाद पुनःर्प्रस्थापित होण्यासाठी ‘हॉटलाईन’ सुरू करण्यात आली आहे. या हॉटलाईनवर दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी संवादही साधला. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा या दोन देशांत संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला झाला आहे. आज सीरियासारख्या देशात कमालीची अशांतता आहे. त्यात आधी किमजोंग यांनी अमेरिकेला अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय, अशी शंका निर्माण होते. डोकलामवरूनही भारत आणि चीनमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. डोकलामचा प्रश्न सुटूनही चीन अस्वस्थ आहे. आधीच्या दोन महायुद्धांचा अनुभव जगाच्या पाठीशी आहे. त्यामुळे पुढच्या महायुद्धाला कोणी धजावणार नाही, असे म्हणायला हरकत नाही. पण, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारखे देश अण्वस्त्रधारी झालेले आहेत. शीतयुद्धाच्या काळातही अनेक युद्धे झाली. पण, त्यात कधीच अण्वस्त्रांचा वापर केला गेला नाही. अमेरिकेने उत्तर कोरियाशी चर्चेचे एक पाऊल पुढे टाकले आहे आणि दक्षिण कोरियानेही संवादासाठी हात पुढे केला आहे. यामुळे तिसर्‍या महायुद्धाची नांदी संपुष्टात येईल, असे म्हणायला हरकत नाही.


- तुषार ओव्हाळ