शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, कुऱ्हे पानाचे येथे गाळ वाहतुकीला शेतकर्‍यांचा प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

 
 
शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार’ योजनांतर्गत
कुर्‍हे पानाचे येथे गाळ वाहतुकीला शेतकर्‍यांचा प्रतिसाद
शेतकर्‍यांनी फक्त वाहतूक खर्च करावा, तहसीलदार नाईकवाडे यांचे आवाहन
जळगाव, २० एप्रिल
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून परिसरातील शेतकर्‍यांनी तलावात असलेला गाळ जेसीबी, पोकलॅन्डच्या सहाय्याने काढून ट्रॅक्टर, डंपरमधून स्वत:च्या शेतामध्ये टाकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेला येथे चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ‘तरूण भारत’ला दिली.
ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत राज्यातील २५० हेक्टर पर्यंत सिंचन क्षमता असणार्‍या धरणांमधील गाळ काढणे व तो शेतात वापरणे यासाठी राज्यामध्ये ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यासाठी ६ मे, २०१७ रोजी मान्यता देण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तर, तालुकास्तर समित्या गठीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे पेट्रोल पंपामागे असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी दोन पोकलॅन्ड, एक जेसीबी, ७८ ट्रॅक्टरद्वारे दररोज मागील आठवड्यापासून गाळमुक्त शिवार योजनेचा शुभारंभ होवून सामूहिकपणे शेतकरी गाळ आपल्या शेतात नेत आहेत. शुक्रवारी, २० एप्रिल रोजी शेतकरी वरुण इंगळे हे स्वत:च्या पोकलॅन्डद्वारे गाळ काढून शेतात टाकत असताना तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट देवून पाहणी करुन शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. लोकसहभागातून योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असेही तहसीलदार नाईकवाडे यांनी शेतकर्‍यांना सांगितले. या भेटी प्रसंगी निवासी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, कुर्‍हे पानाचे तलाठी ज्ञानेश्वर पाटील, पोकलँन्डमालक वरुण इंगळे, सरपंच सुरेश शिंदे, कोतवाल प्रकाश अहिर यांच्यासह शेतकरी भुवन शिंदे, वासुदेव इंगळे, ललित इंगळे, अजय पाटील, रमाकांत पाटील, परशुराम बारी उपस्थित होते.
काय आहे ही योजना
धरण, तलाव, पाझर तलाव यामधील गाळ शेतकर्‍यांनी जेसीबी, पोकलॅन्ड यांच्या सहाय्याने काढून आपल्या मुरबाड असलेल्या शेतात टाकून व शेतीला सुपीक बनवून उत्पादन क्षमता वाढवावी. याकरिता पोकलॅन्ड, जेसीबी यांना लागणार्‍या इंधनाचा खर्च जलयुक्त शिवार योजनेतून शासन करणार आहे. शेतकर्‍यांनी फक्त गाळ वाहतुकीचा खर्च स्वत: करायचा आहे.
ग्रामस्तरीय संनियंत्रण समिती
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत ग्रामस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन असते. यामध्ये समितीचे अध्यक्ष सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, तलाठी/ ग्रामसेवक आणि संबंधित शाखा अभियंता हे सदस्य म्हणून या समितीमध्ये असतील.
आतापर्यंत काढला ८ हजार ब्रास गाळ
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत कुर्‍हे पानाचे येथील पाझर तलावातून गेल्या आठवड्यापासून आम्ही १५ शेतकरी मिळून गाळ काढून शेतामध्ये टाकत आहो. माझे स्वत:चे पोकलॅन्ड आणि दोन जेसीबी यांना लागणारे इंधन शासनाकडून मिळते. वाहतूक खर्च आम्ही शेतकरी करीत आहोत. आतापर्यंत आम्ही ८ हजार ब्रास गाळ वाहून नेला आहे. पावसाळा लागेपर्यंत जास्तीत जास्त गाळ काढून पावसाळ्यात या पाझर तलावात पाणीसाठा होवून शेतकर्‍यांना भविष्यात त्याचा फायदा होईल. दुसर्‍या शेतकर्‍यांनी या गाळ काढण्याच्या योजनेत सहभागी व्हावे असे वाटते.
वरुण इंगळे, शेतकरी
 
@@AUTHORINFO_V1@@