कृतीशील समरसतेचे दर्शन
महा एमटीबी   20-Apr-2018

गेल्या जानेवारी महिन्यामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी दलित संघटनांकडून बंद आणि हिंसक आंदोलने करण्यात आली. "देशामध्ये पुन्हा सवर्णांची सत्ता आली असून यामुळे भारतातील संविधानाला धोका निर्माण झाला आहे. तसेच देशातील पददलित नागरिक पुन्हा एकदा गुलामीकडे जाणार आहेत", अशा भ्रामक कल्पनेतून ही आंदोलने आली होती, नव्हे तर करवून घेण्यात आली होती. देशामध्ये एकीकडे सवर्ण आणि दलित असा वाद रंगवला जात असतानाच दुसरीकडे मात्र भारतीय समाजाची खरी मानसिकता काय आहे, देशात सवर्ण आणि दलित यांच्यातील एकरूपता काय आहे, हे दर्शवणाऱ्या काही घटना घडत आहे. दुर्दैवाने मात्र याकडे लक्ष देण्यास मात्र कोणालाही वेळ नाही किंबहुना त्याला तेवढी 'टीआरपी' नाही म्हणून अशाकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु एक सजग आणि जागरूक नागरिक म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही. कारण या अशा घटनांमुळेच देशातील 'सामाजिक समरसते'चे खरे दर्शन घडते व देशाला एकात्मतेचे एक नवीन बळ देखील मिळते.
ही घटना आहे तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील. गेल्या सोमवारी म्हणजे १६ एप्रिला हैद्राबादमधील जीयागुडा येथील चिलकुर बालाजी मंदिरामध्ये एक अनोखा कार्यक्रम पार पडला. तामिळनाडूतील रंगनाथ स्वामी मंदिराचे पुजारी सी.एस. रंगराजन यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या एक 'दलित' तरुणाला आपल्या खांद्यावर बसवून चिलकुर मंदिरात नेले. आता काही विद्वानांना यावर 'यात काय मोठे ?' असा प्रश्न साहजिकच पडेल. परंतु देशात पुन्हा एकदा मनुवाद बोकाळत असल्याची बोंबा मारत असलेल्यांना हाच प्रसंग भारतीय समाजाची खरी 'पुरोगामी' ओळख दाखवून देणारा आहे. कारण रंगराजन यांनी आपल्या खांद्यावर बसवून ज्या तरुणाला मंदिरात नेले तो तरुण दलित तर आहेच पण त्याच बरोबर एक अध्यात्मिक अधिकारी पुरुष असून आपल्यापेक्षा ज्ञानवंत असल्याचे रंगराजन यांनी म्हटले आहे. तसेच मोठ्या थाटामाटात, वाजतगाजत आणि जयजयकाराच्या गजरामध्ये या तरुणाला म्हणजे आदित्य परासरी याला मंदिरात घेऊन जाण्यात आले. यावेळी आदित्य आणि रंगराजन यांनी 'परमेश्वराची सर्व लेकरे एक समान असून परमेश्वरावर प्रत्येकाचा समान अधिकार आहे', असा संदेश उपस्थित सर्वांना दिला.

भारतामध्ये एकीकडे समाजामध्ये जातीच्या नावाने वाद लावले जात असतानाच, भारतीय समाजातील हे दृश्य अत्यंत सुखावणारे असे आहे. दुर्दैवाने जातीचा अभिशाप गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय समाजाचा पाठलाग करत आला आहे. खऱ्या ज्ञानाचा स्पर्श न झालेल्या अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारचे भेदभाव आजही पाळले जातात. विशेषतः मंदिरासारख्या पवित्र स्थानी हा भेद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मुळात मंदिर हे समाजाला एकत्र आणि सशक्त करण्याचे आद्यकेंद्र आहे. परंतु याचठिकाणी असे भेद पाळले जातात. अस्पृश समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी संत ज्ञानेश्वरापासून ते बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकरांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. तरी देखील आजही अनेक ठिकाणी दलित समाजातील नागरिकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नाही. परंतु रंगराजन यांच्या सारख्या व्यक्तींच्या कार्यातून आता मात्र अशा घटना हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला आहे. त्याठिकाणी देखील भारतीय समाज जातीच्या अभिशापातून आता मुक्त होऊ लागला आहे. त्यामुळे हैद्राबादमधील हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय असेच आहे.भारतीय संतानी आणि समाजसुधारकांनी नेहमी देशाला एकतेचा आणि समरसतेचा संदेश दिला आहे. माणसाने माणसाकडे माणसाप्रमाणे पाहावे आणि माणसाप्रमाणेच त्याच्याशी वर्तन करावे, असा संदेश प्रत्येक संतानी दिला आहे. इतकेच नव्हे तर 'सर्वांघटी राम देहादेही एक' अशी साक्ष देत 'उच्च-नीच भेद न करावा कोणी | जो का नारायणी, प्रिय जाहला' असे वारंवार त्यांनी बजावले. सर्व समाजाला एकरूप पाहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने परमेश्वरी साक्षात्कार आहे, अशी शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे 'पुरोगामीपणाचे' ढोल बडवत देशाला पुन्हा एकदा अराजकतेच्या खड्यात ढकलू पाहणाऱ्यांना खऱ्या 'पुरोगामीपणा'ची ओळख कृतीमधूनच करून दिली पाहिजे.