प्रेयस की श्रेयस ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018   
Total Views |

 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाचा मानदंड समजल्या जाणाऱ्या संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांची एक मुलाखत मला एकदा ऐकायला मिळाली होती. मुलाखत घेणाऱ्याने शंकरजींना प्रश्न विचारला, ’आपले संगीत नेहमीच लोकांना भावते. लोकांना भावेल असे संगीत सातत्याने आणि दीर्घकाळ तयार करणे आपल्याला कसे शक्य झाले ?’ यावर सुमारे पंचवीसेक वर्षं उत्तम कामगिरी करत सातत्याने यशाच्या शिखरावर विराजमान असलेल्या शंकर यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक होतं. ते म्हणाले, ’लोकांची आवड समोर ठेवून आम्ही काम करत नाही. ज्या वेळी एखादं गीत हातात येतं, तेव्हा अन्य कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या गीतासाठी उत्कृष्ट संगीत काय असु शकतं इतकाच विचार आम्ही करतो आणि आमचं सांगितिक ज्ञान पणाला लावून ते काम आम्ही पूर्ण करतो. हे असं जेव्हा होतं तेव्हा लोकांना ते आवडतंच, असा आमचा अनुभव आहे.’ केवळ लोकांना आवडते (हेही बऱ्याचदा गृहितकच) म्हणून गुणवत्तेशी अक्षम्य तडजोडी करुन मिळणाऱ्या तात्पुरत्या लाभांना चटावलेल्या सर्व तथाकथित कलाकारांनी शंकरजींच्या या वाक्यावर सखोल चिंतन करायला हवे. लोकांना काय वाटेल यापेक्षाही श्रेयस्कर काय आहे, हे अधिक महत्वाचे नाही का ?


अधिक व्यापक स्तरावर विचार केल्यास लक्षात येते की, जी गोष्ट प्रिय वाटते ती हितकारक असेलच असे नाही आणि दुसऱ्या बाजुला जी गोष्ट हितकारक म्हणजेच श्रेयस्कर असेल ती वरकरणी न आवडणारीही असु शकते. आपल्या दैनंदिन जीवनात तर हे नेहमीच पहायला मिळते की, ’श्रेयस’ म्हणजेच हितकारक गोष्टींपेक्षा ’प्रेयस’ म्हणजेच प्रिय वाटणाऱ्या गोष्टींचे आकर्षण तुलनेने अधिक असते. उदाहरणच सांगायचे झाल्यास पालेभाज्या, कडधान्ये इ. नी युक्त अन्नपदार्थांपेक्षा ’फ़ास्ट फ़ुड’ अधिक आकर्षक वाटते. पण कुठलाही डॉक्टर ’आता फ़ास्ट फ़ूड चालु करा जोरात’ असा सल्ला कधीही देणार नाही. सेवा-सुविधांच्या बाबतीतही चित्र असेच आहे. सेवा उत्तम आहे की नाही हे ठरविण्याचे निकष सामान्यत: अत्यंत उथळपणे वापरले जातात. ’स्वस्त सेवा’, ’झटपट सेवा’ याच निकषांच्या आधारे सेवा-सुविधांचे मूल्यमापन होत असते. अर्थात स्वस्त व झटपट – म्हणजेच एका परीने ’प्रेयस’ – सेवा ही दर वेळी सर्वोत्तम म्हणजेच ’श्रेयस’ असेलच असे नाही. त्यातही अन्य सर्व बाबतीत एक वेळ ठीक आहे, परंतु वैद्यकीय सेवांच्या बाबतीत तर फ़ार सावध रहाण्याची आवश्यकता असते.


जनकल्याण रक्तपेढीतून विविध रुग्णालयांना रक्तघटकांची सेवा देत असताना हा प्रेयस-श्रेयसचा संघर्ष नेहमीच पहायला मिळतो. रक्तपेढीच्या वतीने अनेक रुग्णालयांमधून डॉक्टर्स व परिचारिकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गांमध्ये किंवा वर्ग झाल्यानंतर होणारी प्रश्नोत्तरे खूप वास्तवदर्शी असतात. अशाच एका रुग्णालयामध्ये रुग्णालयाचे डॉक्टर आणि रक्तपेढीच्या डॉ. माधुरी बर्वे यांचा झालेला एक संवाद माझ्या चांगला लक्षात राहिलेला आहे. या रुग्णालयातील प्रशिक्षण वर्ग उत्तम पार पडला आणि नंतर कॉफ़ी घेण्याच्या निमित्ताने आम्ही तिघेजण एकत्र बसलो होतो. रुग्णालयाचे हे डॉक्टर बोलता बोलता म्हणाले,

’मॅडम, हे सर्व ठीक आहे म्हणजे ’जनकल्याण’ च्या गुणवत्तेबद्दल काही शंकाच नाही पण एक प्रश्न आमच्या परिचारिका नेहमी आम्हाला विचारतात.’

’तो कोणता ?’ डॉ. बर्वे यांनी काहीशा उत्सुकतेने आणि काहीशा चिंतेने विचारले. मीही जरा सावध झालो.

’तो असा की…’ ते डॉक्टर पुढे बोलु लागले, ’यापूर्वी आमच्याकडे अन्य एका रक्तपेढीतून रक्तघटक येत असत. त्यावेळी रक्त मागवण्यासाठी त्या रक्तपेढीच्या कुरियर कर्मचाऱ्याकडे रुग्णाचा ’रक्तनमुना’ आणि रक्त मागविण्याचा अर्ज दिल्यानंतर तो अर्ध्या तासाच्या आतच आवश्यक तो रक्तघटक इथे आणून देत असे. पण आता मात्र या कामासाठी खूप जास्त वेळ लागतो, असे आमच्या परिचारिकांचे निरीक्षण आहे.’

’अच्छा !’ डॉ बर्वे आत्मविश्वासपूर्वक बोलु लागल्या, ’डॉक्टर, आपल्या परिचारिकांना धन्यवाद द्यायला हवेत, ते अशाकरिता की त्यांनी हे निरीक्षण आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. पण या संदर्भात मला एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. ती ही की, जेव्हा रुग्णाचा रक्तनमुना रक्तपेढीच्या मुख्य प्रयोगशाळेत पोहोचतो त्या क्षणानंतर त्या रुग्णासाठी रक्तपिशवी वितरित होईपर्यंत नेमका किती वेळ लागायला हवा, हे ठरते ते मधल्या कालावधीत होणाऱ्या अत्यावश्यक प्रक्रियांवरुन. रुग्णाचा रक्तनमुना रक्तपेढीने मागविण्याचे कारणच मुळी हे असते की, तो रक्तदात्याच्या रक्ताशी जुळवून बघता यावा. म्हणजे असे की, रुग्णाला हे रक्त दिल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्तावर याचा काय परिणाम होऊ शकतो, याची एक छोटी रंगीत तालीमच रक्तपेढीत करुन बघितली जाते. यालाच आम्ही रक्तजुळवणी (cross-matching) असे म्हणतो. यासाठी रक्तदाता आणि रुग्ण या दोघांचेही रक्तनमुने एका यंत्रातून (centrifuge) फ़िरवावे लागतात. त्यातील पेशी (cells) आणि रक्तरस (serum) वेगळे करावे लागतात. त्यांना काही काळ तापमान-नियंत्रकामध्ये (incubator) ठेवावे लागते. यानंतर ही रक्तजुळवणी होते. याखेरीजही रक्तदाता व रुग्ण या दोघांचेही रक्तगट पुन्हा एकदा तपासून पहाणे, त्यातील प्रतिकारकांची (antibody) तपासणी हेही सर्व केले जाते. या सर्व प्रक्रिया अर्थातच रक्तसंक्रमणादरम्यान रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचकरिता करायच्या असतात. रक्तपेढी तंत्रज्ज्ञाकडे अन्य काहीच काम नाही असे गृहीत धरले तरीदेखील या सर्व प्रक्रियांना किमान पंचेचाळीस मिनिटे लागतातच. शिवाय येण्या-जाण्याचा वेळ निराळाच. त्यामुळे रुग्णाचा रक्तनमुना घेऊन जर अर्ध्या तासाच्या आत कुणी रक्तपिशवी पोहोचवित असेल तर खरे म्हणजे आपणच त्याला जाब विचारायला हवा. कारण रक्तजुळवणीशी संबंधित महत्वाच्या प्रक्रियांमध्ये शॉर्टकट्स घेतल्याशिवाय किंवा त्या प्रक्रियाच वगळल्याशिवाय इतकी झटपट सेवा कशी देता येईल ? आणि ’रुग्ण-सुरक्षेशी कधीही तडजोड करायची नाही’, असे जनकल्याण रक्तपेढीने तरी निश्चितपणे ठरविले आहे.’

हे सर्व ऐकून ते डॉक्टर विचारमग्न झाले आणि म्हणाले, ’बाप रे. हे तर फ़ारच गुंतागुंतीचे आहे. बरे झाले, हा आपण या संदर्भात बोललो ते. अन्यथा झटपट सेवेकडे तर कुणीही आकृष्ट होऊ शकते. पण मॅडम, काही रुग्णांना तातडीने रक्त देण्याची गरज असते, त्यावेळी काय करायला हवं ?’

’अगदी योग्य प्रश्न विचारलात डॉक्टर’, डॉ. बर्वे उत्तरल्या, ’आमच्याकडे येणाऱ्या रक्तघटकांच्या मागण्या आम्ही सामान्यत: तीन श्रेणींमध्ये विभागतो. सामान्य (regular) मागणी, जलद (urgent) मागणी आणि तातडीची (emergency) मागणी. सामान्य मागणीमध्ये शस्त्रक्रियेच्या पुरेशा वेळेआधी रुग्णाचा रक्तनमुना आमच्याकडे येतो आणि जुळवणी करुन आम्ही त्या रुग्णाच्या नावे ती रक्तपिशवी ठेवून देतो. रुग्णालयातून डॉक्टरांनी सूचना दिल्यानंतर ही रक्तपिशवी वितरित केली जाते. जलद मागणी जेव्हा येते तेव्हा बहुधा रुग्णावर शस्त्रक्रिया चालु असते. अशा वेळी आमच्या हातातील अन्य कामे बाजुला ठेवून कमीत कमी वेळात रक्तजुळवणी करुन आम्ही रक्तपिशवी वितरित करतो आणि तातडीच्या मागणीमध्ये मात्र काही अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगी त्वरित रक्तघटक मिळून रुग्णाचा जीव वाचणे गरजेचे असते. अशा वेळी रक्तजुळवणी न करतादेखील रक्त देता येऊ शकते, कारण जुळवणी न केल्यामुळे झालेल्या त्रासावर नंतर उपचार करता येऊ शकतात, मात्र आधी रुग्णाचा जीव वाचणे महत्वाचे असते. पण ’जुळवणी’ न करता (फ़क्त रक्तगट तपासून) रक्त वितरित करा’ अशी स्पष्ट सूचना रुग्णालयांतील डॉक्टरांनी रक्तपेढीच्या डॉक्टरांना देणे आवश्यक असते. कारण हा निर्णय रुग्णालयाचे डॉक्टरच घेऊ शकतात. मात्र बहुतांश रक्तसंक्रमणांच्या वेळी रक्तजुळवणी ही केली जातेच किंबहुना रुग्णहित लक्षात घेता ती करायलाच हवी. ’रुग्णाला काही होणार नाही’ हे गृहीत धरुन रक्तजुळवणीमध्ये शॉर्टकट्स घेणे हे मात्र रुग्णावर निश्चितच अन्यायकारक आहे.’

या विश्लेषणावर त्या डॉक्टरांनी समाधानपूर्वक मान हलवली आणि आमची ही चर्चा एका चांगल्या वातावरणात संपली. या प्रसंगानंतर आमच्या प्रशिक्षण वर्गात हा महत्वाचा मुद्दा आम्ही आग्रहाने मांडायला सुरुवात केली. कारण अशा शंका बऱ्याच जणांच्या मनात असतात आणि प्रशिक्षण वर्गाचे व्यासपीठ तर याकरिताच आहे.

एकंदरीत ’प्रेयस की श्रेयस’ हा निरंतर चालु राहणारा संघर्ष आहे. मात्र गीताला श्रेयस्कर असा स्वरसाज चढवूनही ते गीत ’प्रेयस’ होऊ शकते यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे जे ’श्रेयस’ आहे त्यावर ठाम राहून ते ’प्रेयस’ही कसे ठरेल यासाठी आमचेही प्रयत्न निरंतर चालु आहेतच. यातून चांगले परिणाम मिळतील, असा आमचा विश्वास आहे.

- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@