दो गज जमीन के नीचे...
महा एमटीबी   20-Apr-2018
 

मेक्सिको आणि अमेरिका यांच्या सीमेखालून आरपार निघणारं एक भुयार सापडलंय. जमिनीच्या पृष्ठभागाखाली नऊ फूट खोलीवर असलेलं हे भुयार, पाच फूट उंच, पाच फूट रूंद आणि दोन हजार चारशे फूट लांब अशा मापाचं आहे. अमेरिकेच्या कोणत्याही अत्याधुनिक रडार यंत्रणेला त्याचं अस्तित्व समजू शकलं नाही. कार्लोस काल्व्हिलो नावाचा एक तस्कर पकडला गेला. मारिजुआना या अंमली पदार्थांची चोरटी आयात-निर्यात करणार्‍या या इसमाने एक टन इतक्या मोठ्या प्रमाणात मारिजुआनाची पाकिटं अमेरिकेत आणली. पोलीसही ते घबाड पाहून चकित झाले. त्याच्या जबानीवरून पोलिसांना वरील अफलातून भुयाराचा पत्ता लागला.
 
एका ठिकाणाहून जमिनीखालून दुसर्‍या ठिकाणी जाणारा गुप्त मार्ग, चोर वाट म्हणजेच भुयार. आपल्याकडे हरिभाऊ आपट्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांमधून भुयारी वाटांचे उल्लेख भरपूर येतात, पण तसा भुयाराचा उल्लेख रामायण काळापासून आढळतो. लंकेतल्या आपल्या लष्करी तळावर रात्रीची विश्रांती घेणार्‍या राम-लक्ष्मणांना, अहिरावण-महिरावण या राक्षसबंधूंनी एका भुयारावाटे पाताळात नेलं. मग मारुती त्याच भुयारावाटे पाताळात गेला, इत्यादी कथा मोठी अद्भुत आहे.
 
महाभारतात लाक्षागृह प्रकरणात भुयार येतं. ’वारणावत’ नगरात दुर्योधनाचा हस्तक पुरोचन पांडवांसाठी लाक्षागृह बांधतो, विदुराचा हस्तक पुरोचनाच्या कारस्थानाची सूचना धर्मराजाला देतो व लाक्षागृहाच्या खालून थेट गंगेवर नेणारं एक भुयारही तो बांधून देतो. लाक्षागृह पेटल्यावर पांडव आणि कुंती त्या भुयारातून निसटतात आणि नदीतून नौकेत बसून वारणावताबाहेर पडतात.
 
नंद साम्राज्य उलथून टाकून, आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताला मगधाच्या सिंहासनावर बसवलं. पण, नंदाच्या जुन्या निष्ठावंतांचे, चंद्रगुप्ताचा घात करण्याचे प्रयत्न चालूच होते. चंद्रगुप्तासाठी चंदनी लाकडांचा एक सुंदर नवा प्रासाद बांधण्यात आला होता. या प्रासादात चंद्रगुप्त आणि चाणक्य बसले असता आचार्यांच्या तीक्ष्ण नजरेला एक मुंगी दिसली. जमिनीच्या संपूर्ण लाकडी तक्तपोशीच्या एका फटीतून एक मुंगी भाताचं एक शीत तोंडात धरून, बाहेर येत होती. नव्या कोर्‍या इमारतीच्या खाली शिजवलेला भात? सदैव सावध असलेल्या आचार्यांनी ताडायचं ते ताडलं. त्यांनी प्रथमचंद्रगुप्ताला तिथून बाहेर काढलं नि त्या रात्री स्वत:च प्रासाद पेटवून देऊन, अपघाताने तो पेटल्याचा बहाणा केला. प्रासाद जळून खाक झाल्यावर असं आढळलं की, विरोधी मंडळींनी दूरच्या ठिकाणापासून प्रासादाच्या खालपर्यंत भुयार खणलं होतं नि क्रमाक्रमाने हत्यारबंद लोक प्रासादाच्या खाली जमा होत होते. अर्थातच ते तिथे जेवतही होते. पुरेशी संख्या झाल्यावर तळघरातून बाहेर याचचं नि चाणक्य-चंद्रगुप्त यांना ठार मारून, क्रांती करायची, असा एकंदर बेत होता.
 
हिंदू धर्मात फार जातीभेद नि पंथभेद आहेत, असा इंग्रजांचा आरोप असतो. आमच्यात आहेत भेद, पण त्यापायी कुणी कुणाच्या जीवावर उठलेला नव्हता. पंधराव्या-सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये कॅथलिक-प्रोटेस्टंट या पंथांचा झगडा इतका तीव्र झाला की, त्यांच्यामध्ये रीतसर खून आणि लढाया सुरू झाल्या. इंग्लंडच्या राजाने प्रोटेस्टंट पंथाला उचलून धरलं म्हणून कॅथलिक पंथी इतके चिडले की त्यांनी खुद्द राजालाच ठार मारण्याचं कारस्थान रचलं. ५ नोव्हेंबर १६०५ या दिवशी राजा जेम्स पहिला हा पार्लमेंटच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार होता. त्या वेळेस जबरदस्त स्फोट घडवून आणायचा नि राजासहित सर्व प्रमुख सरदारांना ठार मारायचं, असा कट रॉबर्ट कॅटसबी आणि गाय फॉक्स यांनी रचला. पार्लमेंट हाऊसच्या खालपर्यंत एक भुयार अतिशय गुप्तपणे खणण्यात आलं. त्यातून बंदुकीच्या दारूचा साठा पार्लमेंटच्या खाली करण्यात येऊ लागला. ही दारू पेटवून द्यायची नि धडाका उडवायचा असा बेत होता. पण, तो उघडकीला आला आणि गाय फॉक्ससहित बरेचसे कटवाले फासावर लटकले. आजही प्रत्येक वर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस इंग्लंडमध्ये ‘गाय फॉक्स डे’ म्हणून साजरा होते. या कटाला इंग्लंडच्या इतिहासात ‘गन पावडर प्लॉट’ असं नाव आहे.
 
आपल्याकडची भुयारं फक्त हरिभाऊंच्या अद्भुतरम्य कादंबर्‍यांमध्येच आहेत असं नाही. प्रत्यक्षात सर्व गडकिल्ल्यांवरही ती दिसतात. सगळ्या शहरांत-गावांत, जिथे जिथे जुने वाडे, भुईकोट किल्ले, खंदक आहेत, तिथे तिथे भुयारं आहेत. स्थानिक लोक वाटेल ते सांगत असतात. उदा. ’’दिल्लीच्या लाल किल्ल्यातून आग्रा किल्ल्यापर्यंत भुयार आहे,’’ असे स्थानिक लोक छातीठोकपणे सांगत असतात. दिल्ली ते आग्रा अंतर शंभर कि.मीच्या जवळपास आहे. तेव्हा एवढ्या लांबीचं भुयार असणं जरा अवघड वाटतं, पण दिल्ली-आग्र्यासह सगळ्या जुन्या किल्ल्यांमध्ये भुयारं आहेत नि ती जवळपासच कुठेतरी निघतात, हे तर अगदी निश्र्चित. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मुंबईच्या एका पदभ्रमण मंडळाने वसईच्या किल्ल्यातील भुयाराचं संशोधन केलं. ’’वसई बराच काळ पोर्तुगीजांकडे होती. पुढे ती चिमाजी आप्पाने जिंकून स्वराज्यात आणली. त्यामुळे हे भुयार गोव्याला निघतं, पुण्याला निघतं, खाडीपलीकडे ठाण्याला निघतं,’’ अशा वाटेल त्या गोष्टी लोक सांगायचे. हे धाडसी पदभ्रमणवाले संपूर्ण सज्जतेनिशी भुयारात उतरले नि अंधार, चिखल, साप यांना तोंड देत, वसई किल्ल्यातल्याच दुसर्‍या बाजूच्या तटातून बाहेर आले. थोडक्यात, तो भुयारी मार्ग एका तटातून दुसर्‍या तटाकडे जाणारा होता.
 
वास्तविक असं संशोधन प्रत्येक किल्ल्यातल्या प्रत्येक भुयाराचं व्हायला हवं. आपल्या पूर्वजांचं इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरमधलं ज्ञान किती उच्च होतं, हे यावरून समाजाला कळेल. पण, का कोण जाणे, असे प्रयत्न पुढे झालेच नाहीत. इतकंच नव्हे तर नामवंत इतिहास संशोधक मंडळी भुयाराचं अस्तित्व मान्यच करायला तयार नाहीत. पुण्याच्या शनिवारवाड्यात असलेल्या भुयारांबद्दल मी स्वत:च एकदा पुण्यातल्या ख्यातनाम संशोधकांना विचारले असता, त्यांनी ती भुयारं नसून, सांडपाणी निचरा व पाणीपुरवठा यांचे मार्ग आहेत, असा पवित्रा घेतला होता.
 
पण, यानंतर अलीकडेच, पुण्यातल्या एका इतिहासप्रसिद्ध सरदार घराण्याचा जुना वाडा पाडून अपार्टमेंट बांधताना वाड्याखालून मुठा नदीतीरापर्यंतचा उत्तम चिरेबंद बांधणीचा भुयारी मार्ग सापडला होता. म्हणजेच भुयारं आहेत. मग इतिहासकार मंडळी भुयारांना का नाकारतात? कोण जाणे!
 
भुयारी गटारमार्ग नि भुयारी पाणीवहन म्हणजे अंडरग्राऊंड सुवरेज व अंडरग्राऊंड वॉटर सप्लाय या आधुनिक व्यवस्था, आम्ही भारतात म्हणजे मुंबईत सर्वप्रथम१८७०-७५ साली आणल्या, अशी डिंग इंग्रज मारत असत. पण, १९२०-२१-२२ या वर्षांमध्ये प्रथम हडप्पा आणि मग मोहेंजोदडो ही प्राचीन शहरं उत्खननात सापडली. तिथे अतिशय उत्तम अशी सांडपाणी निचरा व पाणीवहन व्यवस्था भुयारी मार्गाने केलेली आढळली.
 
दुसर्‍या महायुद्धानंतर अर्धा जर्मनी रशियाच्या ताब्यात, तर अर्धा जर्मनी इंग्लंड अमेरिकेच्या ताब्यात अशी अवस्था झाली. बर्लिन या जर्मन राजधानीचीही फाळणी झाली. कुप्रसिद्ध अशी बर्लिन भिंत उभारली गेली. पूर्व बर्लिनमध्ये म्हणजे कम्युनिस्ट विभागात त्यांचं एक टेलिफोन केबल टर्मिनस होतं. अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयएला आपल्या हस्तकांकडून त्या टर्मिनसचा नेमका ठावठिकाणा समजल्यावर त्यांनी आपल्या विभागातून म्हणजे पश्र्चिम बर्लिनमधून थेट त्या टर्मिनसपर्यंत एक भुयार खणलं. या भुयाराच्या भिंती आणि छताला पत्रे बसवण्यात आले. सबंध भुयार वातानुकूलित बनवण्यात आलं. झिरपणारं पावसाचं पाणी काढून टाकण्यासाठी पंप बसवण्यात आले. टर्मिनसमध्ये ४३० दूरभाष लाईन्स होत्या. त्या सर्व एकाच वेळी चालू असल्या, तरी टॅप करता येतील नि टेपही करता येतील, अशी कुशल व्यवस्था सीआयएच्या इंजिनिअर मंडळींनी केली. १९५४ ते ५६ अशी दोन वर्षं सीआयएने त्या टर्मिनसमधून जाणारा-येणारा प्रत्येक कॉल सुखाने टॅप केला. योगायोगानेच ते भुयार उघडकीला आलं. पूर्व जर्मन साम्यवादी राजवटीचा जळफळाट झाला. साम्राज्यवादी, भांडवलशाही अमेरिकनांचे भयानक कारस्थान म्हणून साम्यवादी प्रचारयंत्रणांनी या भुयाराचा प्रचंड गवगवा केला. भांडवलशहाची कृष्णकृत्ये आपल्या जनतेला कळावीत, म्हणून पूर्व जर्मन सरकारने आपल्या नागरिकांना मुद्दाम ते भुयार दाखवायला सुरुवात केली. पण, परिणाम उलटाच झाला. ते अत्याधुनिक भुयार पाहून पूर्व जर्मन नागरिक अमेरिकन तंत्रज्ञांच्या कौशल्याची तारीफच करू लागले. साम्यवाद्यांचा आणखीनच जळफळाट झाला आणि त्यांनी ते भुयार बंद करून टाकलं.
 
आता मेक्सिकोने हेच तंत्र अमेरिकेवर उलटवलं आहे. मेक्सिको हा उत्तर अमेरिका खंडातला एक मोठा, पण गरीब देश. मेक्सिको आणि अमेरिका यांची सरहद्द दोन हजार मैल एवढी विस्तीर्ण आहे. कॅलिफोर्निया, अरायझोना, टेक्सास इत्यादी अमेरिकन राज्ये मुळात मेक्सिकोचा भूभाग आहेत. अमेरिकेने ते बळकावले आहेत. मेक्सिको गरीब असला, तरी तिथे अंमली पदार्थांचं उत्पादन भरपूर होतं. अमेरिका अतिश्रीमंत असल्यामुळे तिथले लोक, विशेषत: तरुण वर्ग फार व्यसनी आहे. त्यामुळे अमेरिकेत अंमली पदार्थ पोहोचवणं हा एक प्रचंड किफायतीचा धंदा आहे. अमेरिकन सीमा सुरक्षा चौक्यांना चुकवण्यासाठी सरहद्दीखालून आरपार भुयारं खणणं हा तस्कर मंडळींना सगळ्यात सोपा मार्ग वाटतो. कार्लोस काल्व्हिलोच्या जबानीतून उघडकीला आलेलं भुयार हे काही पहिलंच नव्हे. गेल्या ११ वर्षांत अशी २१ भुयारं मिळाली आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे, अगदी आधुनिकातलं आधुनिक रडार यंत्रसुद्धा या भुयारांचा माग काढू शकलेलं नाही.
 
अखेर यंत्रापेक्षा मानवी बुद्धीच श्रेष्ठ आहे, परंतु यंत्राप्रमाणेच तीदेखील दुहेरी आहे. तिचा उपयोग विधायक मार्गाने करायचा की विघातक मार्गाने, याचा निर्णय मन, अंत:करण, आत्मा यांनी करायचा असतो. दैनंदिन जीवनात आत्मतत्त्वाचा उपयोग करण्यात अमेरिकनच कशाला, आपणही अजून फार लांब आहोत.
 
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले