वेदनेच्या साक्षात्कारातून माणूस म्हणून जगताना
महा एमटीबी   02-Apr-2018

 


 
 
 
अंतर्मनाचा आवाज जेव्हा मूर्त कृतीतून अभिव्यक्त होतो, तेव्हा त्या माणसाचे जगणे खर्‍या अर्थाने जगणे होत असते. त्यातून व्यक्त होणार्‍या संवेदना अखिल मानवतेचे गीत गात असतात. अशा जगण्याचे साक्षीदार आहेत रवींद्र बिरारी.

रवींद्र बिरारींचा पिढीजात पारंपरिक व्यवसाय म्हणजे केशकर्तन. मात्र, रवींद्रचे वडील दगडू यांनी केशकर्तन सोडून गवंडी कामसुरू केले. पण, घरची आर्थिक घडी विस्कटली. जेमतेमतिसरी शिकून रवींद्रही कामाला लागले. त्यावेळी वडिलांनी रवींद्रला एकच सल्ला दिला की, ‘‘मी आपल्या बापजाद्यांनी शिकवलेली कला सोडली, केस कापण्यात कमीपणा मानला आणि कंगाल झालो. तू आपले पिढीजात काम शिक. तू तरी सुधारशील.’’ रवींद्रने वडिलांचा सल्ला ऐकला. दिवसभर काम आणि रात्री मंदिरातले भजन-कीर्तन तो ऐकू लागला. वयाच्या १४-१५ वर्षी रवींद्रला कळले की, त्यांच्याच गावच्या योगेश कुलकर्णीचे मुंबईत केश कर्तनायलय आहे आणि त्यांना कष्टाळू मुलांची गरज आहे. घरातून मुंबईला कामासाठी पाठवणे शक्यच नव्हते. त्यामुळे घरात न सांगता रवींद्र मुंबईला आले. योगेश कुलकर्णींशी संपर्क साधून, रवींद्र त्यांच्या भांडूपच्या केशकर्तनालयात पडेल ते काम करू लागले.

गावातल्याच माणसाकडे रवींद्र काम करतात, म्हणून घरच्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर रवींद्र यांच्या आयुष्यात बरीच स्थित्यंतरे आली. पण, त्यांनी आपल्या हातातली कला सोडली नाही. उलट मुंबईतल्या आपल्या समाजातील यशस्वी केशकर्तनालयाच्या चालकांशी संपर्क साधत, त्यांची मर्जी राखत रवींद्रने केशकर्तनाचे शिक्षण सुरू केले. आज रवींद्र बिरारी यांचा पूर्व उपनगरात केशकर्त क्षेत्रात चांगला जम बसला आहे. त्याच वेळी वनवासी भागातील खर्‍या वंचितांना वैयक्तिकरित्या सर्वतोपरी मदत करणे हेही काम ते करत असतात. या कामाला गती येण्यासाठी रवींद्र यांनी भांडूपचे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक शैलेश बोपर्डीकर यांच्याशी संपर्क करून वनवासी क्षेत्रात आपले काम संघटितपणे सुरू करण्याचेही ठरवले आहे.

पण खरी कथा तर पुढे आहे. रवींद्रने यथावकाश आपल्याच समाजातल्या आणि केशकर्तन क्षेत्रात रूची असलेल्या पूनम यांच्याशी विवाह केला. टिटवाळ्याला घरही घेतले. ते ही टिटवाळा ते भांडूप मुंबई ट्रेनने ये-जा करत. एके दिवशी पावसामुळे कल्याण स्टेशनवर ट्रेन थांबली. रवींद्रही थांबले, गर्दी येत होती जात होती. मात्र, एक वेडा भिकारी, केसांचा भार सांभाळत केस खराखरा खाजवत भर पावसात भिजत तिथेच फलाटाच्या कोपर्‍यात बसलेला. तरूण, पण काय अवस्था. क्षणात वीज चमकली आणि रवींद्रला वाटले याला लोक पैसे देतात, खायलाही देतात, कपडेही देतात. पण याचे वाढलेले केस कोणीही कापत नाही. मला देवाने ही कला दिली आहे. तिचा उपयोग का करू नये? रवींद्रने त्या भिकार्‍याला परोपरीने विनवले, पण त्याने काही दाद दिली नाही, उलट रवींद्रलाच मारले. पण, तरीही रवींद्रच्या मनात विचार तीव्र बनला की अशा हतबल, असहाय लोकांची मदत करायलाच हवी. त्यामुळे दर सोमवारी टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर अशी ते एक मोहिमच काढतात.

केस कापण्यासाठी मुलुंडच्या पारस ब्युटी शॉपचे पारस यांनी विनामूल्य त्यांना इलेक्ट्रॉनिक मशीनही दिले आहे. त्या मशीनने ते गरीब, भिकारी, अपंग, वेडे अशा लोकांचे केस कापतात. तीन वर्षांत जवळ जवळ आठशे लोकांचे केस त्यांनी कापले आहेत. हे काम करणे वाटते तितके सोपे नाही. कारण, रवींद्र ज्यांचे केस कापतात त्यांनी वर्षोनुवर्षे अंघोळही केलेली नसते. त्यांना केस कापण्यासाठी राजी करणे, त्यामुळे कर्म कठीण. त्यासाठी रवींद्रला त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. कित्येक वेळा रवींद्रला या कामामुळे संसर्गही झाला आहे. पण, रवींद्र यांनी घेतलेला वसा सोडलेला नाही. कल्याण स्थानकावर एक तरूण वेडी होती. केसांच्या अगदी जटा. तिच्याकडे पाहूनच रवींद्रला कळले की, ती गरोदर आहे. तिच्यावर अत्याचारच झाला असेल. कारण, ती कुणालाही तिच्या जवळपासही येऊ देत नसे. तिच्या जटा झालेल्या केसांकडे ती एकटक पाहत असे. रवींद्रनी तिला विचारले, केस कापू का?’’ त्यावेळी त्या वेडीच्या चेहर्‍यावर आनंद दाटला, मान डोलावून ती ‘‘हा...हा’’ म्हणाली. रवींद्रने तिचे केस कापले. केस कापल्यानंतर ती आनंदाने हसू लागली. तिला इतका आनंद होण्याचे कारण काय? त्यानंतर रस्ताभर रवींद्रच्या अंगाला खाज येऊ लागली. घरी येऊन पाहिले तर शर्ट, पॅण्ट आणि अंगावर लाल लाल किडे वळवळत होते. तेच त्यांना चावत होते. हे किडे कुठून आले? संदर्भ लागला की, हे किडे त्या तरूण वेडीच्या जटांमधले होते. ते तिला २४ तास चावत असणार म्हणूनच ती जटांकडे सारखी पाहत असे. त्या जटा कापल्यामुळे ते किडे गेले आणि तिची सुटका झाली.

रवींद्र म्हणतात, ‘‘१० मिनिटांत त्या किड्यांनी मला नकोसे केले होते, ती तर त्यांना वर्षानुवर्षे जटांत घेऊन जगत होती.’’ हे सांगत असताना रवींद्रच्या चेहर्‍यावर दुःख दाटून आले. त्या दुःखाला किंमत होती. कारण, नुसते दुःख वाटून रवींद्र शांत बसले नाहीत, तर आपल्या परीने त्यांनी मार्गही शोधला होता. उमलत्या वेदनेचा साक्षात्कार घेऊन, ते खर्‍या अर्थाने माणूस झाले होते.