दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे आज होणार वितरण
महा एमटीबी   02-Apr-2018नवी दिल्ली : सर्वोच्च नागरिक पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातील पुरस्कारांचे आज वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये देशभरातून यासाठी निवडण्यात आलेल्या पुरस्कार्थीना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.


देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण ४४ मान्यवरांना आज या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामधील अनेक मान्यवरांचा समावेश करण्यात आला आह. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र आणि देशातील नेतेमंडळीही उपस्थित राहणार आहेत.

महेंद्रसिंग धोनीला ही मिळणार पद्म भूषण

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे देखील नाव यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय संघाला जागतिक पातळीवर उंच स्थानी नेण्यासाठी तसेच विश्वचषकासह अनेक चषक जिंकून दिल्याबद्दल धोनीला यंदाचा पद्म भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. 


यंदा केंद्र सरकारकडून एकूण ८४ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये ३ पद्म विभूषण, ९ पद्म भूषण आणि ७२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे गेल्या २० मार्च वितरण करण्यात आले होते. ज्यामध्ये देशभरातील एकूण ४१ मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले होते.