बहावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |


निसर्गाचं ‘टाईमटेबल’ इतकं पक्क असतं की अजिबात कॅलेंडरकडे न बघता निसर्गातल्या घटनांवरून आपण सध्या कोणता महिना सुरू आहे, हे ओळखू शकतो. वसंत ऋतूच्या आगमनाची सूचना देणारे, ‘द गोल्डन शॉवर’ असं ज्याचं वर्णन केलं जातं ते बहाव्याचे वृक्ष आता सगळीकडे बहरले आहेत. बहावा फुलायला लागला म्हणजे खर्‍या अर्थाने उन्हाळा सुरू झाला असं समजावं. हिवाळ्यात निष्पर्ण असलेला हा वृक्ष वसंत ऋतू सुरू झाल्यानंतर पिवळ्याधमक फुलांनी सजतो. या वृक्षाचं शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ असं असून मराठीत त्याला ‘कर्णिकार’, हिंदीमध्ये अमलतास, तर संस्कृतमध्ये ‘आरग्वध’ म्हणतात.

’आरग्वधो राजव्रुक्षशम्पाकचतुरंगुला:।
आरेवतव्याधिघातक्रुतमालसुवर्णका:।’ (अमरकोश, 696)

अशाप्रकारे अमरकोशात बहाव्याला ‘राजवृक्ष’ आणि ‘सुवर्णक’ म्हणून गौरवलं गेलं आहे. बहाव्याचं झाड साधारणपणे आठ ते दहा मीटर उंचीपर्यंत वाढतं. वसंत ऋतूत बहाव्याच्या लोंबणार्‍या पिवळ्याधमक झुबकेदार फुलांचं सौंदर्य वेड लावणारं असतं. फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते. बहाव्याचं ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडलं आहे. ‘फिस्टुला’ म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गर माकडं, कोल्हे, अस्वलं आवडीने खातात. बहाव्याच्या मोठ्या खोडापासून इमारती ला़कूड मिळतं. बहाव्याच्या शेंगेतला गर पोटाच्या विकारांवर अतिशय उपयोगी आहे. पाच पाकळ्यांच्या फुलाला मंद सुवास असतो. बहाव्याची फुलं पिवळा रंग तयार करण्यासाठी वापरतात. फुलांचा पिवळाधमक रंग भुंगे, मधमाश्या आणि कीटकांना आकर्षित करतो. ‘कॉमन इमिग्रंट’ नावाचे फुलपाखरू बहाव्याच्या पानांवर अंडी घालते. त्याचा सुरवंट या झाडाची पाने खाऊन आपली उपजीविका चालवतो. बहावा ही ‘कॉमन इमिग्रंट’ या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही मातीत हे झाड रुजतं, वाढतं आणि बहरतं.

बहाव्याचा घोस !
नाजुकशा मऊसूत पाकळ्यांना बहरण्याची हौस !
झळाळत्या सोन्याने दिला आपला रंग !
वार्‍यावर डोलताना स्वत:तच हा दंग !
पोपटी हिरव्या रंगाची याला आहे सोबत !
निसर्गाच्या हळवेपणाची हीच तर आहे गंमत !
बहर याचा संपूच नये असं दाटतं उरी !
निसर्गाच्या कलाकृतीची ही तर माया खरी !
घोस साजिरा डुलतो आहे देता देता आनंद !
सृजनाच्या नवपंखी दडला स्वानंद !
- आर्या जोशी
@@AUTHORINFO_V1@@