कर गुजरने का जजबा चाहिये...
महा एमटीबी   17-Apr-2018
 

‘‘परिस्थितीला पालटण्याची माणसामध्ये क्षमता असते,’’ स्वामी विवेकानंदांच्या या एका वाक्याने राहुलचे जीवन पालटवले. दारूच्या गुत्त्यावर भरल्या डोळ्याने दुःखी गिर्‍हाईकांना दारू देणारा राहुल आज ‘डॉ. राहुल जैनल’ म्हणून नावारूपाला आला.
 
''त्यावेळी माझं वय किती होतं? पंधरा- सोळा वर्षं. दारूच्या गुत्त्यावर झिंगलेल्या गिर्‍हाईकांच्या ग्लासमध्ये दारू सर्व्ह करताना मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. तो गुत्ता, दारू पिऊन वाट्टेल ते बरळणारी माणसं, ते किळसवाणं वातावरण मनात उदासीनता भरून टाकायचं. वाटायचं याचा कधी अंत होईल का? की दारू सर्व्ह करण्यातच माझे आयुष्य जाईल?’’ डॉ. राहुल जैनल सांगत होते. भूतकाळातली स्थिती सांगताना त्यांच्या डोळ्यात नकळत दु:खाचा कवडसा दाटून आला, पण क्षणभरच. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘माणसाने स्वत:ला सक्षम बनविले तर तो परिस्थितीला नक्की पालटवू शकतो.’’ अठराविश्व दारिद्र्यासोबत सर्वच समस्यांना आमंत्रण देते. राहुलच्या घरी तर दारिद्र्यासोबतच येणार्‍या सर्वच प्रतिकूल परिस्थितीने ठाण मांडलेले. त्यातच राहुलचे वडील राजा झाडावरून पडले, त्यांच्या पाठीला त्यामुळे पोक आले. आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. कष्टाचे काम जमणे शक्यच नव्हते. चांगल्या ठिकाणी काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना काम मिळत नसे. पण, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे गरजेचे होते. घरी पत्नी, तीन मुली आणि दोन मुले. त्यापैकी छोटा मुलगा जन्माला आला तोच अपंगत्व घेऊन. अशा परिस्थितीत राजांना काम करणे गरजेचे होते. त्यामुळे मन मारून, ते मटक्याच्या अड्‌ड्यावर काम करू लागले, तर आई भाजी विकू लागली. कसेबसे मुलाबाळांचे पोट भरू लागले.
 
गोवंडीची मुस्लीमबहुल वस्ती. त्या वस्तीतही जैनल कुटुंब अत्यंत गरिबीत का होईना, पण आपली आब सांभाळून राहू लागले. पण, राजांना आपण मटक्याच्या दुकानात काम करतो, यामुळे मनातून नेहमी अस्वस्थ वाटत असे. अशातच राहुल शाळेत जाऊ लागला. पालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेताना, दरवर्षी राहुल पहिला क्रमांक मिळवायचा. त्या पूर्ण वस्तीत त्यावेळी वीज नव्हती. दिवसभरात जितका अभ्यास होईल तितका आणि रात्री गरज लागलीच तर रॉकेलच्या दिव्यात अभ्यास करायचा. अशाही परिस्थितीत घरातल्या सगळ्यांना कौतुक याचे की, राहुल पहिला क्रमांक मिळवतो आहे. राहुलच्या घरी त्यावेळी स्टेाव्ह किंवा रॉकेल घ्यायलाही पैसे नसायचे, त्यामुळे १९९० सालीही त्यांच्या घरी चुलीवर जेवण बनवले जायचे. चुलीचा जाळ फुलवताना आईचा जीव नाकातोंडात येई. वर आजूबाजूवाले लोक वाद घालायचे की, ‘‘चूल करता त्यामुळे धूर होतो, आम्हाला त्रास होतो.’’ आजूबाजूचे असे काही बोलून भांडायला आले की, राहुल आणि भावंडांना आपल्या परिस्थितीची भीषणता प्रकर्षाने जाणवे. ही परिस्थिती पालटायला हवी म्हणून मग राहुलने शिकायचे ठरवले. राहुलने शाळा शिकता शिकता दारूच्या गुत्त्यात नोकरी पकडली. घरची परिस्थिती राहुलच्या काळजात घर तर पाडत होतीच; पण त्याहीपेक्षा अपंग वडील आणि छोटा भाऊ यांचे दुःखद परावलंबीत्व जीवंत राहुलच्या मनावर कायमचे कोरले गेले. दारिद्र्य तर शाप आहेच, पण दिव्यांग आणि विशेष असलेल्या व्यक्तींचे जगणे तर त्याही पलीकडचे असते हे राहुलने प्रत्यक्ष अनुभवले.
 
पुढे राहुलने दारूच्या गुत्त्यावरचे काम सोडावे म्हणून बहिणी घरकाम वगैरे करू लागल्या. राहुलने दारूच्या गुत्त्याचे काम सोडले. ‘कोरो’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने चालणार्‍या शौचालय स्वच्छतेचे काम त्यांनी स्वीकारले. हे काम करताना राहुलचा संपर्क काही सेवाभावी वृत्तीच्या लोकांशी आला. त्यांच्या मार्गदर्शनातून राहुलने शौचालय स्वच्छतेचे काम करता करता ‘पॅरा सोशल वर्कर’चा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ’सलोखा’ नावाच्या प्रकल्पांतर्गत समाजामध्ये सौहार्द निर्माण करण्याचे काम केले. त्यानंतर राहुल यांना सामाजिक प्रकल्पामध्ये काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. कारण, जातीपातीच्या पलीकडे जाऊन, ज्या गरजू समाजासाठी काम करायचे होते, त्या खरोखर गरजू समाजातला एक घटक राहुल होता. त्यांनी गरिबी, लाचारी, अपंगत्वामुळे येणारे परावलंबी जीवन सारे जवळून अनुभवले होते. त्यामुळे सामाजिक उपक्रमात काम करताना इतरांपेक्षा राहुलचे काम सरसच असे. याचमुळे राहुलचा संपर्क सेवाभावी व्यक्तींशी होत गेला. त्यांच्या मार्गदर्शनातूनच राहुलने ‘निर्मला निकेतन’मध्ये ’मास्टर ऑफ सोशल वर्क’, तसेच ’मास्टर ऑफ आर्ट्‌स’ शिक्षण पूर्ण केले. तसेच विशेष मुलांच्या प्रशिक्षकाचेही प्रशिक्षण घेतले. राहुलने स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी व्यक्तींच्या मदतीने पी.एच.डीही केली. हे सगळे करत असताना स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांमधून व्यावसायिकदृष्ट्या काम करणे त्यांनी सुरूच ठेवले. आता आर्थिक-सामाजिकदृष्ट्या राहुलची परिस्थिती १८० अंशात बदलली आहे. राहुल दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी काम करतो. पीएचडी किंवा उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मदत करण्यात डॉ. राहुल नेहमी पुढे असतात. परिस्थितीला शरण जाऊन, आयुष्याचे वाटोळे करणार्‍या निराशावादी लोकांसाठी राहुलचे जीवन एक आदर्शच आहे. राहुल म्हणतात, ’’खुली आँखो का सपना और दिल में कर गुजरने का जजबा चाहिए|’’
 
 
 
 
 
- योगिता साळवी