पीरियरोन्डिटिस : हिरडी विकार
महा एमटीबी   17-Apr-2018
 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकांना कोणता तरी हिरडीचा विकार जडलेला असतो. शिवाय जागतिक लोकसंख्येपैकी १/५ लोकांना हिरडीच्या ‘पीरियरोन्डिटिस’ या विकाराने ग्रासलेले आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ...
 
‘पीरियरोन्डिटिस’ विकारात काय काळजी घ्याल?
 
‘पीरियरोन्डिटिस’ हा हिरडीचा आजार होऊ नये म्हणून घरबसल्या सुचविला जाणारा उपचार म्हणजे दिवसातून दोन वेळा ब्रशने दातांची स्वच्छता करणे. मात्र, बरेचदा दिवसातून दोन वेळा ब्रश करूनही अपेक्षित गोष्टी घडत नाहीत. ब्रशने दात घासल्यामुळे, तोंडातील २५ टक्के भागाची स्वच्छता केली जाते. मात्र, ७५ टक्के भाग हा तसाच स्वच्छतेविना राहतो. तसेच बरेचदा ब्रशमुळे दातांची तसेच दातांमधील जागेची पूर्ण स्वच्छता होत नाही. दातांमधील जागेची स्वच्छता करण्यासाठी डेंटल फ्लॉस तसेच वेगळ्या पद्धतीच्या ब्रशचा उपयोग केला जातो.
 
ब्रशिंग कसे कराल?
 
दररोज ब्रश करूनही दातांचे पूर्ण आरोग्य राखता येत नाही. वास्तविक दात स्वच्छ करण्यासाठी त्यांना किमान दोन मिनिटे ब्रश करणे आवश्यक असते. मात्र, प्रत्यक्षात बहुतेक लोक एका मिनिटापेक्षा कमी वेळ ब्रशिंग करतात आणि त्यांना आपण दोन मिनिटे ब्रश केले आहे असे वाटत राहते. त्यामुळे सद्यस्थितीत ‘ब्रशिंग’ आणि ‘फ्लॉसिंग’ हे दोनच प्रकार दाताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपलब्ध असले, तरी ते पूर्ण स्वच्छतेसाठी पुरे नाहीत.
 
माऊथवॉश घेणे का हितकारक?
 
दंतारोग्य चांगले राखण्यासाठी माऊथवॉश घेणेही हितकारक ठरते. अशा प्रकारचा वॉश हा जंतू प्रतिकारक असल्यामुळे तो मुखातील जीभ, हिरड्या, दात, दाढा, दातांमधील जागा आदी ठिकाणी पोहोचतो. तेथील जंतूंचा नायनाट करतो. माऊथवॉश हा तोंडामध्ये जंतूंची निर्मिती होऊ देत नाही. ब्रशिंग आणि हिरड्यांमध्ये अशा प्रकारची जंतूनिर्मिती शक्य असते. त्यामुळे ब्रशिंग आणि फ्लॉसिंगबरोबरच दररोज अशा प्रकारचा जंतूप्रतिकारक माऊथवॉश घेणे हितकारक आहे. त्यामुळे तुमच्या तोंडाला सुगंध येतोच, शिवाय तोंडाचे आरोग्यही चांगले राहते.
 
 
 
 
- डॉ. राजीव चितगुची.
(लेखक एमडीएस, पिरियोडोन्टिस्ट सल्लागार आहेत.)