वन विभागाच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात १२ टेकड्यांवर फुलतेय हिरवाई!
महा एमटीबी   16-Apr-2018

 
मुंबई : आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या उजाड टेकड्या पाहून आपलं मन नाराज होतं… त्यावर उभं असलेलं एखादं झाडंही आपल्याला आनंद देऊन जातं… मनात विचार येतो ही पूर्ण टेकडीच हिरवीगार असती तर? हिरवाईचा एक गुच्छच या टेकडीच्या रुपानं रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेला दिसला असता.. मनातल्या याच भावनेला प्रत्यक्षात आणण्याचं काम वन विभागाने “महावृक्षलागवडी” च्या माध्यमातून हाती घेतलं आहे.
 
राज्यात 3 वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेताना लॅण्डबँकेचा शोध झाला. त्यातील एक पर्याय म्हणून उजाड टेकड्यांवर हिरवाई फुलवण्याचा निर्णय घेतला गेला. स्वयंसेवी संस्था, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात गावाजवळच्या डोंगरावर जात तिथे विविध वृक्षांच्या बीजांची पेरणी केली. अशी अनेक उदाहरणे मागील दोन वर्षात राज्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी घालून दिली. वन विभागही मागे राहिला नाही. वन विभागानेही टेकड्यांच्या हरितीकरणाचा उपक्रम हाती घेतला.
 
“पर्यावरण संतुलनात वाढतं हरित क्षेत्र मोलाची भूमिका बजावते हे लक्षात घेऊनच राज्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार यावर्षी आणखी काही टेकड्यांवर वृक्षलागवड करण्याचा आपला प्रयत्न आहे. वृक्षलागवड कार्यक्रमाला व्यापक जनाधार मिळत आहे. आबालवृद्धांचा यातील सहभाग पाहता हरित टेकड्याच नाही तर हरित महाराष्ट्राचं स्वप्नंही आपण नक्की साकार करू शकू”, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
 
महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या १२ टेकड्या यासाठी पहिल्या टप्प्यात निवडल्या गेल्या.. निवडण्यात आलेल्या १२ स्थळांमध्ये अहमदनगर-इसळक, नाशिक-औंढा, कोल्हापूर- धोंडेवाडी, पुणे- रेटवाडी-मलठण, औरंगाबाद- लंगडातांडा, बीड-गवळवाडी, ठाणे- रायता, रायगड- गालसुरे-कार्ले, नागपूर- वेणा निमजी, गोंदिया- लाहोरा-सुब्रातोला, वर्धा- पिंपरी मेघे या स्थळांचा समावेश झाला. २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षाच्या काळात या टेकड्यांवर हिरवाई फुलवण्याचा निर्णय झाला आणि पहिल्याच वर्षीपासूनच रोप लागवडीला सुरुवात झाली. रोप लागवड, लावलेल्या रोपाचं संरक्षण आणि संगोपन यासारख्या विविध कामांसाठी आतापर्यंत जवळपास ६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला आहे.. टेकड्यांवर हिरवाई फुलू लागलीय… २०२० पर्यंत उजाड असणाऱ्या या टेकड्यांवर आपल्याला हिरवीकंच वनराई फुललेली पहायला मिळू शकेल.
 
हिरवाई वाढवणं हा वृक्ष लागवडीचा हेतू आहेच, परंतु त्याचबरोबर भूसंवर्धन आणि जलसंधारणाच्या कामाला वेग देणं, पडणाऱ्या पावसाचं पाणी माथा ते पायथा अडवणं आणि जिरवणं, शासकीय-निमशासकीय जमिनीवरची अतिक्रमण थांबवणे हा ही एक महत्वाचा उद्देश त्यामागे होता.
 
वृक्ष लागवडीच्या माध्यमातून राज्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा वन विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्यात लॅण्ड बँक तयार केली जात आहे. वन विभागाच्या मालकीच्या जमिनीबरोबर, वनेत्तर क्षेत्रात मागील दोन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आणि भविष्यातही केली जाणार आहे. विविध प्रजातींचे वृक्ष टेकड्यांवर लावल्यानंतर वन्यजीव तसेच पक्ष्यांना एक नैसर्गिक अधिवास मिळू शकणार आहे यातून त्यांच्यासाठी असलेली अन्नसाखळी देखील विकसित होण्यास मदत होईल.