हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी असिमानंदांसह ५ जणांची निर्दोष मुक्तता
महा एमटीबी   16-Apr-2018

 
हैदराबाद येथील मक्का मशिदीत २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने स्वामी असिमानंद यांच्या सहित ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. असिमानंद आणि इतर आरोपींवर दाखल झालेल्या गुन्ह्यांविरुद्ध पुरावे नसल्यामुळे न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
२००७ साली झालेल्या या बॉम्बस्फोटात ५८ जण जखमी झाले असून ९ जण मृत्युमुखी पडले होते. २००९ साली या प्रकरणी स्वामी असिमानंद यांच्यासहित ५ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर खटला सुरु झाला. असिमानंद हे या आरोपातून जामिनीवर सुटले असून उर्वरित आरोपी हे अद्यापही तुरुंगात आहेत. आज त्यांना दोषमुक्तता मिळाली असून, लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होईल.
 
 
या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे २०११ साली तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. २०११ पासून अद्याप पुरेसे पुरावे आरोपींविरुद्ध मिळू न शकल्यामुळे आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.