समाज माध्यमं आणि दहशतवाद
महा एमटीबी   16-Apr-2018
 

नुकतंच फिलिपाईन्समध्ये आसियान देशांच्या संरक्षणमंत्र्यांची एक परिषद पार पडली. त्या परिषदेत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ’’समाज माध्यमांतून दहशतवादाला खतपाणी घातलं जातं. यामुळे कट्टरता वाढली असून, ही सर्व देशांची डोकेदुखी ठरली आहे.’’ खरं तर वैश्विक सुरक्षेबद्दलचे जे आयाम किंवा परिमाण आहे, ते बदलत चालले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे व्यापक बदल आणि समाज माध्यमांतून दहशतवादाला मिळणारी चालना याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संपुआच्या काळात कपिल सिब्बल कायदामंत्री असताना म्हणाले होते की, ’’समाज माध्यमांचा वापर करून मादक आणि अंमली पदार्थांची तस्करी केली जाते.’’ पंजाबचे उदाहरण इथे संयुक्तिक ठरेल. पंजाबमध्ये एके काळी स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि शीख दहशतवाद हा जवळ जवळ संपुष्टात आला होता. पण, आता समाज माध्यमांतून एक 'sleeping model' तयार केले जात असून, त्यातून त्यांना आर्थिक रसदही उपलब्ध होत आहे. आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणा या नेटवर्कला तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पण, त्यात त्यांना पूर्णतः यश मिळालेले नाही. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांत जे हत्याकांड झाले, त्याची सूत्रे हे इंटरनेटच्या माध्यमातून हलवली गेली. पंजाबमध्ये ज्या ज्येष्ठ स्वयंसेवकाची हत्या झाली, त्यात समाज माध्यमांची भूमिका कळीची होतीच.
 
समाज माध्यमांतून दहशतवादाची विषपेरणी 
  
खलिस्तानच्या नुकत्याच सुरु असलेल्या या सगळ्या गुप्त दहशतवादी कारवायांत एक समान पद्धत आणि विशिष्ट तंत्र वापरले गेले. १९८४च्या शीख हत्याकांडांविषयीचा वेगवेगळ्या प्रकारचा आशय आणि मजकूर पंजाबमध्ये पसरवून तरुणांची माथी भडकावली जातात. जे युवक समाज माध्यमांवर सक्रिय असतात, त्यांचा प्रतिसाद पाहून, त्यांना या दहशतवादी कारवायांमध्ये ओढले जाते. सामील केले जाते. २०१७ साली सप्टेंबर महिन्यात ‘बब्बर खालसा’च्या सात दहशतवाद्यांना अटक केली गेली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सात दहशतवादी इंग्लंडमधील सुरेंद्रसिंग बब्बर या म्होरक्याशी समाज माध्यमातूंन संपर्कात होते. यासाठी फेसबुक, व्हॉट्सऍप सारख्या लोकप्रिय समाज माध्यमांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. युरोपमधून या कारयावांचे सूत्र हलत होते आणि तिथून त्यांना आर्थिक मदतही मिळत होती. ‘खलिस्तान टेरर’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद मॉडेल’ची त्यांनी निर्मिती केली होती. भारतातच नाही तर दहशतवादाने आधीच पोखरलेल्या पाकिस्तानातही समाज माध्यमांतून दहशतवादाची मूळे अधिक खोलवर रुजली आहेत. त्यातच तिथल्या सरकारने दहशतवादाला खतपाणी घातल्याने आणि हेच दहशतवादी त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने आता त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकतंच पाकिस्तानने तब्बल ६५ संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी आणली खरी. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, बंदी घातलेल्या ६५ दहशतवादी संघटनांपैकी ४० संघटनांनी समाज माध्यमांचा दहशतवादाच्या प्रचार-प्रसार आणि कारवायांसाठी पुरेपूर वापर केला होता. समाज माध्यमांतून या संघटना पाकिस्तनाच्या सुन्नीबहुल भागात अल्पसंख्य असलेल्या शिया मुस्लीमांबद्दल भडकवतात. जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तानात त्यांना ‘जिहाद’ पुकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. खलिस्तान दहशतवादात ज्या प्रकारचा आशय आणि मजकूर पसरवला जातो, तशाच प्रकारे पाकिस्तानात समाज माध्यमांचा वापर करून तरुणांना दहशतवादाच्या जिहादी जाळ्यात आमीषं दाखवून ओढले जाते. फेसबुकवर दहशतवादाच्या उद्देशाने पेजेस बनवून, त्यावर तालिबान, लष्कर-ए-तोयबाच्या झेंड्याची छायाचित्रं लावली जातात. तसेच त्यांच्या संस्थापकांच्या छायाचित्रांचाही अधिकाधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी वापर केला जातो. बर्‍याच वेळेला समाजहितासाठी अशा पेजेसची निर्मिती होते आणि कालांतराने यांचे स्वरूप आणि उद्देश उघडकीस येतात.
 
फेसबुक आणि ट्विटर या माध्यमांनी अधिकृतपणे या आधुनिक दहशतवादाशी लढण्याचे ठरवले असून, ट्विटरने जी खाती दहशतवादासाठी खासकरुन वापरली जातात, अशी एकूण चार लाख खाती बंद केली आहेत. यामध्ये ट्विटरने काही खाती ही स्वत: शोधून बंद केली, तर काही खाती ही विविध देशांच्या तक्रारींनंतर बंद करण्यात आली. भारतातही दहशतवाद विरोधी पथकांनी विविध राज्यांच्या सहकार्याने केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया करणार्‍या संघटनांवर छापे टाकून कारवाईचा बडगा उगारला. या संघटनांनी समाज माध्यमांचा वापर करून तरुणांना धर्माच्या नावाखाली आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांना या दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्याचे दिसून आले. या सर्व गोष्टी एक विशिष्ट रणनीती आखून केल्या जातात. युवकांचे वाचन आणि चिंतन कमी झाल्याने हे युवक दहशतवादी प्रचाराला सहज बळी पडतात. बेरोजगार युवक या संघटनांना शरण जातात. या लोकांना पकडणे अवघड आहे, कारण समाज माध्यमांचा वापर करताना हे लोक साधारणपणे ‘प्रॉक्सी सर्व्हर’चा वापर करतात. ओळख लपवून आणि खोटे खाते वापरून बहुतांशवेळा या कारवाया केल्या जातात. परिणामी, या लोकांचा खरा चेहरा जगासमोर येत नाही आणि त्यांची धरपकड करणे महाकठीण होऊन जाते. अशा लोकांची खाती जरी तत्काळ बंद केली, तरी दुसर्‍या क्षणाला हे लोक नवे खाते बनवून, आपल्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवतात. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘‘काश्मीर खोर्‍यात कट्टरपंथीयांच्या कारवायांसाठी समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. या कारवायांवर बंदी घालणे अवघड आहे. कारण, एकाच वेळी याची सूत्रे अनेक लोकांकडे असतात. कुठलीही एक संघटना हे कार्य करत नसून, दहशतवादाच्या नावाखाली अनेक संघटना संयुक्तपणे या कारवाया करतात. दुसरी गोष्ट अशी की, जी मोठी आणि प्रस्थापित माध्यमे आहेत त्यांनी जर काही चुकीच्या बातम्या माहिती प्रसारित केल्या, तर त्यांच्यासाठी काहीच नियम सरकारकडे नाही, तर मग या अस्ताव्यस्त पसरलेल्या समाज माध्यमांची गोष्ट तर लांबचीच.’’
 
नवमाध्यमांतून नागरी पत्रकारिता आता जोर धरत आहे. लोक आपली विशिष्ट फेसबुक पेज, वेबसाईट आणि युट्युब वाहिनी सुरू करून, पत्रकारिता करत आहे. तर अशांवर नियंत्रण मिळविणे अवघड आहे. तसेच या सगळ्या दहशतवादी कारवायांची झळ नागरिकांना, समाजाला आणि जगातील उच्चतम अशा सुरक्षा यंत्रणांना पोहोचल्यामुळे सायबर दहशतवादाचा मुद्दा जगभरातील देशांची डोकेदुखी होऊन बसला आहे.
 
 
 
 
- प्रा. गजेंद्र देवडा