कठुआ बलात्कार प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिलला
महा एमटीबी   16-Apr-2018
 
 

 
 
 
 
जम्मू : कठुआ बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला आज सुरुवात झाली असून त्याची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार असल्याचे जम्मू-काश्मीर न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावेळी अटक करण्यात आलेल्या सर्व आठ आरोपींना देखील आज न्यायलयात हजर करण्यात आले होते. दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरवली जात असल्याचेही जम्मू-काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
 
 
पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सुनावणी कठुआकडून चंदिगड न्यायालयात सोपवण्यात येण्याची मागणी केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायलयाने पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या बलात्कार आणि हत्येच्या याचिकेवर उत्तर देण्याची जम्मू काश्मीर सरकारला नोटीस पाठवली आहे.
 
दरम्यान असिफावर झालेल्या सामुहिक अत्याचार आणि बलात्काराप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. या घटनेसाठी अटक करण्यात आलेल्या सर्व आठ आरोपींविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याच्यावर पोलिसांनी वेगळे आरोपपत्र दाखल केले आहे.
 
 
यावेळी सर्वोच्च न्यायलयातील वकील इंदिरा जयसिंग यांनी पीडित मुलीच्या वडिलांची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायलयाला सांगितले की, या घटनेमुळे बाहेरील वातावरण अत्यंत तणावपूर्वक झालेले असून न्याय्य सुनावणीसाठी हे वातावरण अनुकूल नाही.