कठुआ प्रकरणी आजपासून न्यायालयीन सुनावणीला सुरुवात
महा एमटीबी   16-Apr-2018


कठुआ : कठुआ हत्याकांडा प्रकरणी न्यायालयीन सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. कठुआ जिल्ह्यातील जिल्हा विशेष सत्र न्यायालयासमोर आजपासून या घटनेची सुनावणी केली जाणार आहे. या घटनेसाठी अटक करण्यात आलेल्या सर्व आठ आरोपींना देखील न्यायलयात हजर केले जाणार असल्यामुळे न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.


पीडितेच्या वकील दीपिका सिंह राजावत यांनी मात्र हे प्रकरण जम्मू बाहेर ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. राजावत यांनी हे प्रकरण स्वीकारल्यापासून त्यांना यासाठी धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाला केली आहे. त्यामुळे हे सुनावणीसाठी म्हणून जम्मू बाहेर ट्रान्सफर करावे, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु न्यायालयाने मात्र यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान असिफावर झालेल्या सामुहिक अत्याचार आणि बलात्काराप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. या घटनेसाठी अटक करण्यात आलेल्या सर्व आठ आरोपींविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याच्यावर पोलिसांनी वेगळे आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच या घटनेसाठी विशेष न्यायाधीशांची देखील नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.