कर्नाटक निवडणुका : भाजपकडून ८२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
महा एमटीबी   16-Apr-2018
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अवघ्या एका महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या आगामी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून एकूण ८२ उमेदवारांची नावे पक्षाने दुसऱ्या टप्प्यात जाहीर केली आहेत.
 
 
 
 
याआधी भाजपने ७२ उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर केली होती. त्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा आणि माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. कर्नाटक विधानसभेच्या जागांसाठी १२ मे रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
 
 
कर्नाटक विधानसभा निवडणुका यावेळी भाजपचे मुख्य लक्ष्य असणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात रोड शो देखील केला होता. भाजपसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात आहे. तसेच इतर पक्ष देखील या निवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.
 
 
कर्नाटक विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी यावेळी मतदान घेतले जाणार आहे. मागील कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने १२२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि जनता दल सेक्युलरने प्रत्येकी ४०-४० जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे कर्नाटक निवडणुका भाजपसाठी यावेळी महत्वाच्या मानल्या जात आहेत.