बघा, बहिर्जी नाईकांच्या डोळ्यातील धगधगता अंगार
महा एमटीबी   16-Apr-2018

 
'फर्जंद' या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा जोरदार सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या मराठी माणसाला नेहमीच आपल्या वाटणाऱ्या विषयावर हा चित्रपट बेतलेला आहे. त्यामुळे तो अधिकच जवळचा भासतेय. पहिले पोस्टर, टिझर आणि आता आज प्रसाद ओकने प्रदर्शित केलेलं पोस्टर या सगळ्यातुनच 'फर्जंद'ची क्रेझ वाढतच चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खास गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे करारी पोस्टर आज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आणि पुन्हा एकदा या चित्रपटाच्या चर्चेने जोर धरला.
 
 
एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून गेल्याच आठवड्यात प्रसाद ओक 'कच्चा लिंबू'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चर्चेत होता. आज त्याने 'फर्जंद' या त्याच्या आगामी चित्रपटातील बहिर्जी नाईक यांची व्यक्तिरेखा असलेले पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टर मध्ये बहिर्जी मोठ्या आवेगाने आपल्या मिशांना ताव देत आहेत, त्यांच्या डोळ्यात एकप्रकारचा अंगार भरल्याचे दिसून येत आहे व महाराजांचा मावळा असल्याचा अभिमानही त्यांच्या देहबोलीवरून जाणवत आहे. हे पोस्टर प्रदर्शित करताना प्रसाद म्हणतोय की, '' आमाला नाव न्हाई...आमचं नाव, आमची जात, आमचा धर्म, आमचं रक्त, आमचं सत्वं एकच...शिवाजी !!! छत्रपती शिवरायांचे खास गुप्तहेर "बहिर्जी नाईक" यांच्या भूमिकेत.''
 
 
 

दिगपाल लांजेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून प्रसादसह चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार देखील आपल्याला 'फर्जंद' मधून दिसणार आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ‘AA films’ प्रस्तुत करणार आहे. ‘AA films’ ने ‘बाहुबली’ चित्रपटाची प्रस्तुती केली होती. जून महिन्याच्या एक तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.