खाल्ल्या मिठाला जागू लागले
महा एमटीबी   15-Apr-2018


 

 
केतकरांना तोच तो चार वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचाराने बरबटलेला, विकासाची संधी नसलेला, लाल फितशाहीमुळे सर्वसामान्यांची अडवणूक करणारा, सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या राज्यकर्त्यांचा, गुंडापुंडांचा भारत हवा आहे का? केतकरांच्या दृष्टीने तोच समृद्ध भारत आहे का? आणि म्हणूनच ते मोदींमुळे देशाचे आणखी वाटोळे होईल, असे भाकित करत असावेत का?
 
 

गेली जवळपास चार दशके काँग्रेससोबत लिव्ह-इनमध्ये राहिलेल्या कुमार केतकरांच्या गळ्यात काँग्रेसने एकनिष्ठतेची बक्षिसी देत राज्यसभा सदस्यत्वाची माळ अखेर टाकली. काँग्रेसबरोबरच्या संसाराला अधिकृतरित्या सुरुवात झाल्याने केतकरांनी लगेच खाल्ल्या मिठाला जागत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. आपल्याला वर्षानुवर्षांच्या खिदमतगारीचे बक्षीस देणार्‍या काँग्रेसचे पानिपत करणारे नरेंद्र मोदी पुन्हा २०१९ मध्येही पंतप्रधान झाल्यास देशाचे आणखी वाटोळे होईल, असे भाकित कुमार केतकरांनी केले. महाराष्ट्राला कुमार केतकरांची ओळख व्यासंगी, अभ्यासू, विद्वान, संपादक-पत्रकार म्हणून कित्येक वर्षांपासून आहेच. परंतु गांधी परिवाराकडचं त्यांचं कलणं आणि कलंडणं हेही महाराष्ट्राला सुपरिचित आहे आणि आता तर अधिकृतपणे काँग्रेसवाले झालेल्या केतकरांनी काँग्रेसचे गोडवे गात मोदींमुळे देशाचे आणखी वाटोळे होणार असल्याचे भाकित करून आपली ज्योतिषाचार्य होण्याची हौसही भागवून घेतली. २०१४ सालीही कुमार केतकरांनी भविष्यवेत्त्याच्या भूमिकेत शिरत भाजप लोकसभा निवडणुका कशा जिंकू शकत नाही यावर लेखच्या लेख लिहून विश्लेषण केले होते. आतापर्यंत कधीही जिंकलेल्या जागा, पूर्वोत्तर आणि दक्षिण भारतात नरेंद्र मोदी भाजपचे नसलेले स्थान याचे विश्लेषण करत, कामचलाऊ आराखडे मांडत त्यांनी भाजप कसा तोंडावर आपटेल याचे भविष्य वर्तवले होते. त्यानंतर कोण तोंडावर आपटले ते देशासमोर आहेच. केवळ काँग्रेसच्या आंधळ्या समर्थनापायी भाजपच्या पराभवाची स्वप्ने रंगविणारे, लोकांच्या हृदयाची नेमकी नस ओळखू शकणारे बुद्धिमान पत्रकार म्हणून त्यानंतर केतकरांचे नाव चर्चिले गेले. आताही केतकरांनी पुन्हा तीच ती मोदीविरोधाची टेप चालवली. अर्थात मोदीफोबिया झालेल्या आणि गांधी-नेहरू घराण्याची खुशमस्करी करणार्‍यांकडून यापेक्षा वेगळे काही होऊही शकत नाही.

 

कुमार केतकर यांच्यासारख्या अभ्यासकांचे एक बरे असते, आपल्याला आवडणारे असे ठोकताळे-निष्कर्ष आधीच तयार करून ठेवायचे. निकाल काय लागेल हे आधीच सांगून मोकळे व्हायचे आणि त्यानंतर तशीच मांडणी करायची, हा यांचा आवडता उद्योग. अशा अभ्यासकांवर विश्वास ठेवणारेही मग त्यांचीच री ओढत हवे तसे दावे करून आम्हीच कसे खरे?, हे सांगत राहतात. आताही कुमार केतकरांनी नरेंद्र मोदी २०१९ ला पराभूत होतील आणि ते जर जिंकले तर देशाचे वाटोळे होईल, असा निष्कर्ष काढला. त्याला पुरावा म्हणून देशात कुठेतरी घडणार्‍या, माध्यमांनी फुगवून सांगितलेल्या छोट्या छोट्या घटनांचे दाखले देत हवी तशी मांडणी करायला सुरुवात केली, पण कुमार केतकरांना गेल्या चार वर्षांतल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपवाद वगळता भाजप जिंकल्याचे दिसले नाही का? या सर्वच राज्यातल्या लोकांनी मोदींवर आंधळेपणाने विश्वास ठेवला का? की त्यांना देशाचे वाटोळे होत असल्याचे दिसत नव्हते? की कुमार केतकरांच्या ‘दिव्यदृष्टीला तेवढे तो वाटोळे झालेला भारत दिसला? याचा अर्थच मुळी देश आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पुढे जात होता आणि आहे, पण पराकोटीचा भाजप आणि मोदीद्वेष अंगात भिनल्याने केतकरांना ते दिसले नाही. त्याच मोदीद्वेषाच्या अमलाखाली केतकर देशाचे वाटोळे होईल, असे बरळू लागले असावेत.

 

काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या सत्ताकाळात देशभरात घोटाळ्यांचे डोंगरच्या डोंगर उघडे पडत होते. कोळसा घोटाळा, टू-जी घोटाळ्यातून देशाच्या साधनसंपत्तीची, सर्वसामान्य लोकांच्या कष्टाच्या पैशाची दिवसाढवळ्या लुबाडणूक करणार्‍यांचे पेव फुटले होते. भ्रष्टाचाराने कळस गाठला होता, सर्वसामान्य जनतेची जिथे जावे तिथे अडवणूक होत होती, त्यावेळी कुमार केतकर कोणत्या कागदावर लेखणी खरडत होते? कोणत्या व्यासपीठावर शब्दांचे बुडबुडे उडवत होते? की त्यावेळी हजारो कोटींची लूट करणारे घोटाळे हे देशाचे वाटोळे करणारे नव्हे तर देशाला समृद्धीच्या शिखरावर नेणारे होते, असे कुमार केतकरांना वाटते? त्याचमुळे जुन्या ऋणांची परतफेड करणार्‍या काँग्रेसचे सर्व काही गोड गोड आणि जे आज देशाला विकासाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत, त्यांचे सर्वच कडू कडू, हीच केतकरांची भूमिका असल्याचे स्पष्ट होते आणि सर्वच प्रकारचे अभ्यास, निष्कर्ष हे स्वतःच्या याच भूमिकेला साजेसे असेच मांडण्याचे त्यांचे धोरणही दिसते. कालपरवाच ज्यांच्या पैसा व्यवहारावर तपास यंत्रणांपासून, न्यायालयांची, कायद्याची वक्रदृष्टी वळलेली आहे, त्यांच्या खिरापतीवर जगणार्‍यांना आता जे घडलेच नाही, ते मोदींचे अपयश उघडे पाडावेसे वाटत असावे आणि त्यामुळे आपला लगामकाँग्रेसच्या हाती गेल्याने कुमार केतकरांना आज असे खिंकाळावेसे वाटत असावे.

 

चार दशकांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटत देशावर आणीबाणी लादली. सर्वच राजकीय पक्षांचा, विरोधकांचा, प्रसारमाध्यमांचा आवाज दाबत आपल्या अहंकाराला कुरवाळत इंदिरा गांधींनी लोकशाहीची थट्टा केली. आणीबाणीविरोधात उभ्या राहणार्‍या हजारो लोकांना तुरुंगात डांबले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मागमूस कुठे ठेवला नाही. त्याच आणीबाणी पर्वाचे पत्रकार-संपादक राहिलेले कुमार केतकर जाहीरपणे समर्थन करताना अजिबात थकत नाहीत. त्यावर पानेच्या पाने लिहून आणीबाणी कशी योग्य होती, ही भूमिका हिरीरीने मांडतात. मात्र आणीबाणीच्या काळात देशातल्या लोकशाहीचे खरोखरच वाटोळे झाले होते, हे कोणीही मान्य करेल. केतकरांच्या ‘दिव्यदृष्टीला ते वाटोळे दिसले नाही का? की तेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधून केतकर समर्थनासाठी लेखणी खरडत होते? आणि आजही त्या आणीबाणीचे जाहीर गोडवे गाण्याचे कार्य करतात? दुसरी गोष्ट म्हणजे आता तर चार दशकांपूर्वीची तशी कोणतीही आणीबाणीसदृश परिस्थिती नाही. लोक उघडपणे मोदींविरोधात, सरकारविरोधात बोलू शकतात, मोर्चे काढू शकतात, लिहू शकतात, तरीही केतकरांना हे देशाचे वाटोळे झाल्याचे आणि पुन्हा सत्ता आल्यास आणखी वाटोळे होईल असे वाटते. यालाच सर्व काही सुरळीत सुरू असूनही फक्त मोदीद्वेषाचा कंड भागविण्यासाठी काहीबाही बरळणारे अतृप्त आत्मे म्हणतात. माणसाला कावीळ झाली की, सर्वत्रच पिवळे पिवळे दिसते. कुमार केतकरांना तर ही मोदीद्वेषाची कावीळ आधीपासूनच झाली असून आता तर काँग्रेसचे राज्यसभा खासदार झाल्याने मोदींचा अधिकाधिक द्वेष करण्यासाठीचा पक्षीय परवाना मिळाल्याचेही त्यांच्या निरनिराळ्या वक्तव्यांवरून लक्षात येते. म्हणूनच केतकरांना देशात सर्वत्र बजबजपुरी माजल्याचे, अन्याय वाढल्याचे दिसते परंतु, कुमार केतकरांना मोदी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने वर्षानुवर्षे नुसत्याच घोषणा केलेल्या योजना पूर्णत्वास जात असल्याचे दिसले नाही.

 
ला योजनेच्या माध्यमातून लाखो गरीब, ग्रामीण घरातला चुलीचा धूर नष्ट झाल्याचे, त्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारल्याचे दिसले नाही? दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून ज्या गावखेड्यांत, दुर्गमभागात काँग्रेसच्या उदासीन कारभारामुळे कधी वीज पोहोचली नव्हती, तिथे वीज पोहोचून अंधार दूर झाल्याचे दिसले नाही? ज्या गावांत गेल्या ६०-६५ वर्षांत कधी रस्ता गेला नाही, एस.टी. गेली नाही, तिथे रस्ता पोहोचल्याचे, ती गावे देशाच्या नकाशावर आल्याचे त्यांना दिसले नाही.? कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून लाखो युवकांनी आपल्या कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्याचे आणि त्यातून त्यांच्या हाताला काम मिळाल्याचे दिसले नाही? मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडियाच्या माध्यमातून लाखो उद्योजकांना, नवनव्या कल्पना मांडणार्‍यांना संधी मिळाल्याचे दिसले नाही.? मोदी सरकारने या प्रगतीच्या दिशेने झेप घेण्यासाठी आवश्यक असलेल्या योजना राबवल्याने, घेतलेल्या निर्णयामुळे देशाचे वाटोळे झाल्याचे कुमार केतकरांना वाटते काय? देश आणि देशातले कोट्यवधी युवक- युवती प्रगतीच्या वाटेवर पुढे जात असल्याचे कुमार केतकरांना पाहावत नाही काय? केतकरांना तोच तो चार वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचाराने बरबटलेला, विकासाची संधी नसलेला, लाल फितशाहीमुळे सर्वसामान्यांची अडवणूक करणारा, सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या राज्यकर्त्यांचा, गुंडापुंडांचा भारत हवा आहे का? केतकरांच्या दृष्टीने तोच समृद्ध भारत आहे का? आणि म्हणूनच ते आता २०१९ ला मोदी सत्तेत आल्यास देशाचे आणखी वाटोळे होईल असे भाकीत करत असावेत का? तसे जर असेल तर ठीक आहे, देशातल्या कोट्यवधी लोकांना हाच मोदी सरकारच्या काळातला भारत हवा आहे, कुमार केतकरांसारख्यांनी कितीही मोदीद्वेषाच्या पिंका टाकल्या तरीही.