जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग सर्वात महत्वाचाना.जयकुमार रावल ः बुराई नदी पायी परिक्रमेचे ठिकठिकाणी होतेय स्वागत
महा एमटीबी   15-Apr-2018
 
 
 
 
 
जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग सर्वात महत्वाचा
ना.जयकुमार रावल ः बुराई नदी पायी परिक्रमेचे ठिकठिकाणी होतेय स्वागत
धुळे, १४ एप्रिल
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानासह जलसंधारणाच्या कामांत लोकसहभाग सर्वांत महत्वाचा आहे. लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून बुराई नदीवर ठिकठिकाणी २४ बंधारे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. रावल यांनी गेल्या बुधवारपासून दुसाणे, ता. साक्री येथून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरवात केली आहे. या परिक्रमेचा आज चौथा दिवस होता.
आज शनिवारी सकाळी चिमठाणे, ता. शिंदखेडा येथून बुराई नदी पायी परिक्रमेला सुरवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास परिक्रमेचे बाभूळदे गावात आगमन झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंत्री रावल बोलत होते. यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुराई नदीवर माथा ते पायथा असे २४ बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधार्‍यांचे काम पूर्ण झाल्यावर येत्या जुलै अखेर या बंधार्‍यांमध्ये पाणी जमा झालेले दिसेल. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला आगामी काळात पाहावयास मिळतील.
तापी बुराई योजनेच्या माध्यमातून बुराई- अमरावती नदीच्या खोर्‍यात पाणी आणण्यात येईल. या कामासाठी आतापर्यंत ३२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून या योजनेला गती देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. बुराई नदी पायी परिक्रमा आटोपल्यावर तापी- बुराई योजनेचा आढावा घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
सुलवाडे- जामफळ- कनोली योजनेचे भूमीपूजन लवकरच
सुलवाडे- जामफळ- कनोली योजनेसाठी सर्व प्रकारची परवानगी मिळाली आहे. भूमीपूजन लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे सुमारे दीड लाख एकर क्षेत्र बागायती होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बुराई बारमाही योजना, तापी नदीवरील उपसा सिंचन योजना, सुलवाडे- जामफळ- कनोली योजना, तापी- बुराई योजनेच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आलेले दिसेल. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात मोठे परिवर्तन झालेले असेल असेही त्यांनी नमूद केले.
बाजार समितीचे सभापती श्री. पाटील म्हणाले की, बंधार्‍यांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. परिक्रमेत प्रशासनातील अधिकारी सहभागी होत आहेत. ग्रामस्थांनीही सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.
 
परिक्रमेचा आज समारोप
मंत्री श्री. रावल यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या बुराई नदी पायी परिक्रमेचा रविवारी (ता. १५) समारोप होणार आहे. यानिमित्त शिंदखेडा येथे सकाळी १०.३० वाजता राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मंत्री रावल रविवार १५ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता कुमरेज, ता. शिंदखेडा येथून बुराई नदी पायी परिक्रमेला सुरवात करतील. त्यांचा दौरा असा : सकाळी ०८.०० वाजता शिंदखेडा येथे आगमन व चर्चा, सकाळी ०९.३० वाजता शिंदखेडा येथून पाटणकडे प्रयाण, सकाळी १०.३० वाजता बुराई नदीवर पाटण, ता. शिंदखेडा शिवारात केटीवेअरचे भूमिपूजन होईल.
त्यानंतरचे कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणे होतील,असेही अधिकृत सुत्रांनी सांगितले.
दरखेडा येथे बंधार्‍याचे भूमीपूजन
मंत्री ना. रावल यांच्याहस्ते बुराई नदीच्या पात्रात दरखेडा येथे बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याचे भूमीपूजन झाले. लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुराई नदीवर बाभूळदे, महाळपूरदरम्यान आवश्यकता असल्यास आणखी एका बंधार्‍याचे काम करण्यात येईल, असे मंत्री ना. रावल यांनी सांगितले. बुराई नदी पायी परिक्रमेंतर्गत मंत्री ना. रावल यांनी आज दिवसभरात निशाणे, महाळपूर, अलाणे आदी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
राष्ट्रपुरुषांना अभिवादन
बंधारा भूमीपूजन कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याही प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.