आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बाबासाहेबांचा अभ्यास आवश्यक : प्रा. तांबट
महा एमटीबी   15-Apr-2018
 
 
 
पुणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजही आपण बोलत असलेल्या हिंदू धर्मसुधारणेशी सुसंगतच आहेत. त्यांचे विचार व तळमळ आपण समजून घेतली तर आजच्या अनेक आव्हानांचा सामना आपण यशस्वीपणे करू शकतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे सहायक प्राध्यापक संजय तांबट यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र पुणे यांच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता" या विषयावर प्रा. तांबट यांचे व्याख्यान झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी व संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर हे उपस्थित होते.
 
 
 
लोकांशी सतत संवाद साधणे हा पत्रकारितेचा गाभा आहे. या निकषावर बाबासाहेबांची पत्रकारिता उठून दिसते. बहुजन समाजाच्या वृत्तपत्रांनीही अस्पृश्यांची फारशी दखल घेतलेली नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले होते आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वृत्तपत्रे काढली. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी 'मूकनायक' हे नियतकालिक चालवले. बाबासाहेबांची पत्रकारीता खऱ्या अर्थाने 'बहिष्कृत भारता'त दिसून येते. बाबासाहेबांचा युक्तिवाद बिनतोड होता. बाबासाहेबांची कळकळ आपल्याला समजून घ्यावी लागेल तरच आजची आव्हाने सोडवता येतील असे तांबट यावेळी म्हणाले.
 
 
बाबासाहेबांचे विचार समजायचे असतील तर 'बहिष्कृत भारता'चे अग्रलेख आपल्याला अभ्यासावे लागतील. दलित तरुणांचा आक्रोश आपल्याला समजून घ्यावा लागेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे बाबासाहेबांनी इथल्या भूमीतून व बौद्ध विचारातून घेतली. ती त्यांनी बाहेरून कुठूनही घेतलेली नाही, हे त्यांनी स्वतः सांगितले असल्याचेही तांबट यांनी निदर्शनास आणून दिले.