डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय अर्थव्यवस्थेचं निरीक्षण
महा एमटीबी   14-Apr-2018

दर दहा वर्षांनी चलन बदलावे
शेतकर्‍यांचे शोषण थांबवले
भारताची आर्थिक पिळवणूक मांडली
आर्थिक विकासाची मांडणी
 

बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय जनमानसातील ओळख त्यांच्या समाजपरिवर्तन आणि दलितोध्दाराच्या विलक्षण प्रभावी कार्यामुळे आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ अशा भारतीय संविधानामुळेही ते सुपरिचित आहेत. जगातील सर्वात विद्वान, ज्ञानतपस्वी म्हणून आपण सर्वजण त्यांचा खूप आदर करतो. आपल्या देशात आणि इतर देशातही विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांची अजून एक महत्त्वाची ओळख आहे. ती म्हणजे एक थोर अर्थतज्ज्ञ म्हणून. बाबासाहेबांच्या व्यासंगाचा आणि चिंतनाचा मुख्य विषय अर्थशास्त्र हाच आहे. त्यांचे पदत्युत्तर शिक्षणही अर्थशास्त्र विषयातच झालेलं आहे. त्यांनी संशोधक विद्यार्थी म्हणून The privincial finance in india हा संशोधन ग्रंथ लिहिला. त्यांच्या जागतिक कीर्तीच्या The problem of rupee या ग्रंथाला डी.एस्सी या पदवीने गौरवण्यात आले. अर्थशास्त्रीय विचारासंबंधी त्यांचा अत्यंत मौल्यवान ग्रंथ आहे. History of indian currancy and banking. नंतरच्या काळात बाबासाहेब सामाजिक आणि राजकीय कार्यात खूपच व्यस्त झाले, त्यांचे लेखनही सामाजिक आशयाला धरूनच सुरू झाले. मात्र त्यांच्या अर्थशास्त्रीय व्यसंगाचा आणि चिंतनाचा उपयोग इतर क्षेत्रातही खूपच प्रभावीपणे करता आला. बाबासाहेबांनी दलितांच्या उपेक्षितांच्या महिलांच्या आणि एकूणच समाजाच्या आर्थिक विकासासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने सुचविल्या आहेत.
 
भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचं निरीक्षण नोंदवितांना आपल्या देशाला लाभलेल्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. बाबासाहेबांचा भारतीय शेतीविषयीचा अभ्यास, शेतीबाबतच्या समस्या व त्यावरील उपायबाबतचे त्यांचे चिंतन अत्यंत महत्त्वाचं आणि राष्ट्राच्या विकासाला पोषक ठरणारे आहे. The evolution of provincial finance in india या संशोधन ग्रंथात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या संरचनेचा सिध्दांत मांडला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अर्थकारणाचं विश्‍लेषण अत्यंत स्पष्ट व कठोर भाषेत केलेले आढळते. प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या भारतातून कच्चा माल इंग्लंडमध्ये नेणे, तिथल्या कारखान्यात पक्का माल तयार करणे आणि राजकीय व लष्करी शक्तीच्या जोरावर तो माल परत भारतातच आणून विकणे हा दुहेरी फायद्याचा उद्योग करून कंपनीकडून भारताची प्रचंड आर्थिक पिळवणूक यात कशी झाली हे त्यांनी परखड शब्दात मांडले. या कंपनीमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था कशी मजबूत झाली आणि भारतीय अर्थकारणाचा कणा कसा मोडला गेला याबाबतची मांडणी करून या अन्यायाकडे अभ्यासकांचे आणि ब्रिटीश सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या कंपनीने भारतीय कामगारांचे श्रममूल्य अत्यंत नगण्य ठरविले होते. भारतीय कामगारांनी फक्त मेहनतीचे काम अधिकारी सांगतील त्या पध्दतीनेच करायचे मात्र त्यासाठी रास्त मोबदला मागायचा नाही. मिळेल त्या अत्यंत कमी पगारावर निमूटपणे काम करायचं हे अन्यायकारक तत्त्व कंपनीकडून अवलंबिले जात होते. कच्चा मालाच्या माध्यमातून भारतीय शेतीचे व अल्प वेतनी कामगारांच्या माध्यमातून भारतीय श्रमाचे इंग्रजांनी शोषण व अवमूल्यन केले. या अन्यायावर बाबासाहेबांनी कठोर शब्दात टीका केली. त्यांच्यापूर्वी भारतीयांच्या श्रमविषयक शोषणावर नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या वैचारिक प्रेरणेतून आवाज उठविला होता. परंतु इंग्रजांनी त्यांचे आंदोलन फारसं यशस्वी होऊ दिले नाही. बाबासाहबांनी थेट इंग्रजी भाषेत, प्रांतामध्ये, अभ्यासकांसमोर या समस्या शास्त्रशुध्द पध्दतीने मांडल्या. बाबासाहेबांच्या विचार करण्यास भाग पाडणार्‍या लोकशाहीवादी विचारवंतांच्या माणुसकीला हाक देणार्‍या लेखनामुळेच ब्रिटीश सरकार व ब्रिटीश विचारवंत अंतर्मुख झाले. आजच्या जागतिकीकरणाला सुसंगत वाटणार्‍या पण फक्त एकाच देशाच्या अर्थात इंग्लंडच्या आर्थिक हिताचे रक्षण करणार्‍या तत्कालीन सरकारी धोरणावर पूर्वी दादाभाई नौरोजी व नंतर बाबासाहेबांनी सातत्याने टीका केली. भारताच्या रूपाने बाजारपेठ सक्षम करण्याचे धोरण आणि त्यातून भारतीय ग्राहकांची आर्थिक लूटमार भारतासाठी खूपच घातक असल्याचे मत बाबासाहबांनी या ग्रंथात मांडले. या संशोधनावर त्यांचे मार्गदर्शक डॉ.एडविन सेलीग्मन यांनी खूप प्रशंसा केली. राजेशाहीपूरक अर्थव्यवस्था मूठभर धनिकांसाठी अनुकूल असून ती श्रमिकांचे अतोनात शोषण करते. अर्थव्यवस्थाही त्या त्या भागातील गरिबांना आधार देणारी व त्यांची प्रगती करणारी असावी, असे वैश्‍विक हिताचे विचार बाबासाहबांनी मांडले. म्हणून अर्थव्यवस्थेची मुलभूत संरचना कशी असावी याबाबत या ग्रंथात मतं प्रदर्शित केलेली आहेत. महसूल उत्पादन क्षेत्राची कोणती सत्ता केंद्राकडे आणि कोणती सत्ता राज्याकडे हे त्यांनी नमूद केले. तत्कालीन भारतात मुंबई, बंगाल, मद्रास, मध्य प्रांत, पंजाब, आसाम, सौराष्ट्र इ. उत्पादन देणार्‍या प्रांतांना समन्यायी वाटपाची मुभा दिली पाहिजे असं बाबासाहेबांचे मत होते. मात्र ब्रिटीश सरकारला ते परवडणारे नव्हते. श्रमिकांच्या श्रममूल्यांचा उत्पन्न आणि विकास दर कसा असावा याबाबतही त्यांनी मते मांडली. कृषिप्रधान श्रममूल्यांचा उत्पन्न आणि विकास दर कसा असावा याबाबतही त्यांची मते मांडली. कृषिप्रधान भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू उद्योगप्रवण कशी होऊ लागली याचेही त्यांनी विश्‍लेषण केले. शेतीवर आधारीत उद्योगांमध्ये साखर कारखाने, कापड गिरण्या, खत कारखाने इ. उद्योग उभे राहिले. पण भारतातील जवळपास सर्व कारखाने ब्रिटीश लोकांचे होते आणि कामगार मात्र भारतीय. येथेही भारतीय कामगारांची पिळवणूक होत होती. हे त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले.
 
बाबासाहेबांच्या The problem of rupee या महत्त्वपूर्ण संशोधनग्रंथात ब्रिटीशांनी दिलेली अर्थव्यवस्था कारखानदार आणि जमीनदारांना कशी अनुकूल होती हे नमूद करून ती कष्टकर्‍यांच्या बाजूने वळली पाहिजे असे मत त्यांनी मांडले. ब्रिटीश सरकार भारतीय रूपयाचे अवमूल्यन कसे करते हे सांगून त्यावर कठोर टीका केली. रूपयाच्या भविष्यातील मोठ्या प्रमाणात अवमूल्यनाचं त्यांचे भाकीत आज खरं झालेलं सर्वांना दिसत आहेच. बाबासाहेबांनी दर दहा वर्षांनीच चलनात बदल व्हावा, असेही सुचविले होते. सध्या गाजत असलेल्या नोटाबंदीचा निर्णय बाबासाहेबांनी सुचविलेल्या आर्थिक उपाययोजनांचाच एक भाग होय. बाबासाहेबांनी इंग्रजांच्या अन्यायकारक आर्थिक धोरणावर कठोर टीका The problem of rupee मध्ये केली. तेव्हा त्यांचे मार्गदर्शक डॉ.एडविन कॅनाल यांनी ‘आंबेडकरांची भूमिका मान्य नाही पण त्यांच्या विद्वत्तेला मानावेच लागेल.’ त्यांच्या इंग्रज सरकारवरील टिकेचा आशय समजू शकतो. मात्र भाषा सौम्य असावी असं मत मांडले. बाबासाहेबांनी एडविन यांच्याबद्दल आदर व्यक्त करून त्यांनी भारतातील विदारक परिस्थिती प्रत्यक्ष बघितली तर यापेक्षाही कठोर भाषा वापरावी असा सल्ला ते स्वतःच देतील अशा शब्दात भारतीय जनतेच्या व्यथा जगासमोर मांडल्या. कारखान्यातील मजुरांनी सलग १२ तास काम करणे बाबासाहेबांना मान्य नव्हते. कामाचे तास आणि अत्यल्प मोबदला याबाबतही त्यांनी कठोर टीका केली. परंतु कामगार आणि भांडवलदार यासंबंधीच्या बाबासाहेबांच्या विचारांवर मार्क्सचा प्रभाव वगैरे नव्हता. वस्तुतः कार्ल मार्क्स आणि महात्मा फुले यांचा कार्यकाळ समान होता. दास कॅपिटल आणि शेतकर्‍याचा आसूड हे ग्रंथसुध्दा एकाच कालावधीत लिहिले गेले. या ग्रंथांमध्ये उपेक्षितांच्या वेदना व संघर्ष मांडला गेला. बाबासाहेबांनी मात्र सर्वच समाजघटकांच्या आर्थिक विकासाची मांडणी केली. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना व विचारवंतांनाही बाबासाहेबांची ही मांडणी कुणाच्याही प्रभावाने नव्हे तर स्वानुभवातून आणि आत्मचिंतनातून झाल्याचे वाटते. उत्पादन, विक्रय आणि चलन हे खेड्यांमध्येच फिरत असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण वाटत असली. तिथे शेतकर्‍यांचे शोषण कसे होते याबाबतही बाबासाहेबांनी स्पष्ट विचार मांडले. त्यांनी आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी व त्यातून सामाजिक बदलासाठी दलित बांधवांना शहराकडे वळण्याचा व शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. शहरातील वास्तव्य आणि शिक्षणातून आर्थिक सुधारणा आणि आर्थिक सुधारणेतून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. व्यापक पातळीवर बोलतांना ते भारतीय रूपयाला डॉलर आणि पौंड यांच्या बरोबरीने आणण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्नांची अपेक्षा करीत होते. बाबासाहेबांनी History of indian currency and banking या ग्रंथातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या योग्य संतुलनासाठी चलन प्रचलन आणि बँकिंग क्षेत्राची गरज याबाबत मौल्यवान विचार मांडले. आर्थिक विकासासाठी बँकिंग क्षेत्राचे योगदान, खासगी सावकारीपासून सामान्यांना वाचविण्यासाठी बँकांचे महत्त्व त्यांनी लक्षात घेण्याचा आग्रह केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांच्या चिंतनाचे आणि मार्गदर्शनाचे फार मोठे योगदान आहे. अशाप्रकारे शेतीवर आधारीत अर्थव्यवस्था असलेल्या भारतीय परिस्थितीचा सखोल अभ्यास करून बाबासाहेबांनी ग्रामीण, शहरी, शेतीपूरक, उद्योगपूरक अशा विविध रूपात अर्थव्यवस्थेचे निरीक्षण केले. रूपयांचे मूल्य, कामगारांच्या श्रमाचे मूल्य, कामाच्या तासांचे मानसशास्त्रीय गणित, बँकिंगचे महत्त्व वेळोवेळी सरकारपुढे मांडून आपल्या देशाच्या विकासात फार मौल्यवान योगदान दिलेले आहे. बाबासाहेबांनी बघितलेले अर्थक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाल्यास आपला देश नक्कीच आर्थिक महासत्ता होणार यात तसुभरही शंका नाही.
 
 
 
 
- प्रा.संजय गायकवाड
सामाजिक समरसता मंच, देवगिरी प्रांत
७७२२०४२१३७