डॉ. बाबासाहेब आणि धर्मपरिवर्तन
महा एमटीबी   14-Apr-2018

धर्मांतर करतांना देशाचाच विचार
जन्मजात विषमता मान्य नाही
भारतीय जनसंघ नावाची संस्था स्थापन
तीन तत्त्वांचे आकर्षण

 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्सल आणि अव्वल दर्जाचे देशभक्त आणि थोर राष्ट्रपुरुष होते. ते खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि अभिमानी होते. या संस्कृतीत शिरलेल्या विकृती काढून टाकण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. आपली कोणतीही कृती भारतीय संस्कृतीला विघातक होऊ नये अशी त्यांची मनोमन भूमिका होती.
 
धर्मांतर करतांना देशाचाच विचार
 
बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्वीकारण्याविषयी आपल्या निवासस्थानी दिल्लीतील अस्पृश्य समाजातील कार्यकर्ते सोहनलाल शास्त्री यांच्याशी ८ ऑगस्ट १९५६ रोजी चर्चा केली होती. शास्त्री यांनी त्यांना प्रश्‍न विचारला होता की, बाबासाहेब आपल्याला बौध्द धर्मापेक्षा ख्रिश्‍चन किंवा इस्लाम धर्म जास्त फायदेशीर होणार नाही का? त्यावर डॉ. आंबेडकरांनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे होते. ते म्हणाले, धर्म आपल्याला फायदेशीर कदाचित होतील, पण ते भारतात निर्माण झालेले धर्म नाहीत. आपण त्या धर्माचा स्वीकार केला तर आपल्या लोकांच्या भौतिक उन्नतीसाठी खूप पैसाही आपल्याला इतर देशांमधून मिळेल. आपल्याला भारतीय राजकारणात खूप बळही कमावता येईल. पण या सर्व गोष्टी परस्वाधीन होऊन आपल्याला करता येतील. दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊन आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची तहान भागविण्यात कोणताही पुरूषार्थ नाही. स्वत:च्या हिमंतीने, स्वावलंबनाने, स्वाभिमानाने आणि स्वदेशी - नव्या धर्माच्या आश्रयाने आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आपली भारतीय संस्कृती राखणे हे बौध्द धर्माचे रहस्य आहे. ते ज्यांना उमगेल तेच माझ्या धर्मदीक्षेबद्दल मनात शंका बाळगणार नाहीत. बौध्द संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.
 
तीन तत्वांचे आकर्षण
 
बौध्द धर्मात प्रज्ञा (बुध्दी), करुणा (प्रेम) आणि समता या तीन तत्त्वांचा उत्तम संयोग आहे.बौध्द धर्म माणसाच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या तीन तत्त्वांची शिकवण देतो. खरेतर प्रज्ञा, करूणा आणि समता या तत्त्वांचे डॉ. आंबेडकरांना आणि जगालाही आकर्षण आहे. ऐहिकतेला प्राधान्य देणारे मार्क्सवाद आणि साम्यवाद हे जगापुढे गंभीर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. त्यांनी सर्व देशांच्या धार्मिक व्यवस्थेचा पायाच हलवला आहे. त्यामुळे बौध्द धर्म नीट समजावून घेतला तर मार्क्सवाद आणि साम्यवादाकडे झुकण्याची गरज पडणार नाही. बौध्द धर्म हे प्रत्यक्षात आचरणात आणावयाचे सामाजिक तत्त्व आहे असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
 
डॉ. बाबासाहेब हे ज्ञानक्षेत्रातील प्रज्ञावंत तपस्वी होते. विलक्षण अतूट ज्ञाननिष्ठेने ते, जन्मभर ज्ञानाची उपासना करीत राहिले. ज्ञानातूनच आपल्याला अभिप्रेत असलेले सामजिक आणि वेैचारिक परिवर्तन शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. हिंदू समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडून यावे, अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी, जन्मजात जातीभेदावर आधारलेली विषमता, अन्याय आणि दारिद्रय यांचा विनाश व्हावा आणि समाज एकजिनसी व्हावा, यासाठी ते अखेरच्या श्‍वासापर्यंत लढले. दलितांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांनी न्याय्य संघर्ष केला. अन्याय- अत्याचाराविरोधात दलित समाजात आत्मप्रत्ययाची ऊर्मी निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मभान जागवण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम केले.
 
डॉ. बाबासाहेबांनी या कोट्यवधी जनतेच्या मनात अन्यायाची चीड निर्माण केली, स्वाभिमानाची ज्योत पेटवली. वैचारिक साखळदंड तोडून टाकले. हे कार्य सहज घडण्यासारखे नव्हते. सर्वच दृष्टींनी नागवला गेलेला दलित समाज स्वत:च्या पायावर उभा करावयाचा असेल तर त्याला आपले जन्मसिध्द अधिकार कोणते याची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आणि आपल्या भोवतीच्या जगाचे यथार्थ भान आल्याशिवाय गुलामाला आपली गुलामगिरीही कळत नाही. म्हणून डॉ. आंबेडकर आपले कृतीशील विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून, भाषणातून आणि गावोगावी पसरलेल्या अस्पृश्य वस्तीतील दीनदलितांना पोटाशी धरून वर्षानुवर्षे सांगत राहिले. कोणताही नेता जनतेच्या सर्व स्तरात प्रेमाने, आपुलकीने वावरतो आणि सामान्यातील सामान्य होऊन त्यांच्यातील माणूसपणाला आत्मीयतेने हृदयाशी कवटाळतो तेव्हा त्या जनसमुहाचे रुपांतर एकात्म समाजात होते. असा एकात्म समाज हा समता आणि बंधुतेच्या पायावरच उभा राहील, अशी त्यांची धारणा होती. डॉ. बाबासाहेबांना जन्मजात विषमता मान्य नाही. कुळावरून माणसाचा चांगूलपणा वा वाईटपणा ठरु नये. जन्म थोर कुळात झाला म्हणून कोणी सत्पुरुष होत नाही, उच्च कुळातील जन्मापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे फार महत्त्चाचे आहे. उच्च- कनिष्ठ हे भेदभाव असू नयेत, सर्व सारखेच आहेत. बाबासाहेबांना भगवान बुध्द आणि त्यांनी स्थापन केलेल्या बौध्द धर्माचे लहानपणापासूनच कुतूहल आणि आकर्षणही होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या बांधवांनी जेव्हा त्यांचा गौरव केला, तेव्हा त्यांचे गुरुजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी स्वत: लिहिलेले गौतम बुध्दांचे चरित्र त्यांना भेट दिले होते. या चरित्र ग्रंथाने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले ते कायमचे कोरले गेले. पुढे त्यांनी विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास केला. हिंदूधर्माचा अभ्यास केला तसेच कार्ल मार्क्सचाही केला. या सर्व अभ्यासानंतर गौतम बुध्दांवरील त्यांची श्रध्दा अधिक दृढ झाली.
 
अस्पृश्यता मुक्तीचा लढा देतांना आपल्यापुढे धर्मांतर हा एक पर्याय आहे, असे त्यांनी अनेक भाषणातून सांगितले होते. बाबासाहेबांनी आरंभलेल्या महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, पुण्याच्या पर्वती मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह अशा विविध सामाजिक लढ्यांबरोबरच राजकीय लढ्याचा पुणे करार अशा या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या नाशिकच्या दौर्‍यात १३ ऑक्टोबर, १९३५ रोजी येवला येथे अस्पृश्यांची जी परिषद घेतली त्यात उपस्थित सुमारे दहा हजार श्रोत्यांसमोर आपला समाज स्वतंत्र करावा अशा आशयाचा लिखित अंतस्थ हेतू प्रकट केला. अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य वर्ग यामध्ये समता आणि संघटन घडवून आणण्याच्या हेतूने, तितके सामर्थ्य नसतांनाही, माणसांची व द्रव्याची अपरिमित हानी सोसून मुंबई इलाख्यातील अस्पृश्यवर्गाने महाड येथे चवदार तळ्यावर आणि नाशिक येथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह तर सहा वर्षे चालविला होता. परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदूंचे किंचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसले नाही. म्हणून अस्पृश्य वर्गाच्या परिषदेने असा ठराव पारित केला की, हिंदूंची मनधरणी करण्यात अस्पृश्यवर्गाने आपले सामर्थ्य विनाकारण खर्च न करता सत्याग्रहाची मोहीम बंद करावी. त्यानुसार त्यांनी ठाम घोषणा केली की, मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो हा काही माझा दोष नाही, परंतु मरताना मात्र मी अस्पृश्य म्हणून मरणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या या घोषणेला जगभर प्रसिध्दी मिळाली.
 
बाबासाहेबांना भगवान गौतम बुध्द आणि बौध्द संस्कृतीविषयी आत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा होता, म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्याच्या संदर्भात सिध्दार्थ, बुध्द, आनंद, मिलिंद व नागसेन अशा बुध्द संस्कृतीतील शब्दांचा जाणीवपूर्वक उपयोग केला. ८ जुलै १९४५ रोजी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या संस्थेचे २० जून, १९४६ पासून एक नवीन महाविद्यालय सुरू केले. त्याचे नाव सिध्दार्थ कॉलेज ऑफ आर्टस् असे ठेवले. १९५० साली बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे नवीन कॉलेज सुरू करुन त्याचे नामकरण मिलिंद महाविद्यालय असे केले. २४ ऑक्टोबर १९५१ साली ‘द बुध्द अँड हिज गॉस्पेल’ अशा शीर्षकाचा इंग्रजीतील ग्रंथ लिहिण्यास सुरूवात केली. पण नंतर त्यांनी त्याचे शीर्षक बदलून ‘द बुध्द अँड हिज धम्म’ असे शीर्षक दिले.
 
बौध्द धर्माच्या अभ्यासासाठी बाबासाहेबांनी पाली भाषेचाही अभ्यास सुरू केला होता. त्यांनी बौध्द धर्म स्वीकारण्याच्या अगोदर भारतात बौध्द धर्माच्या प्रसारासाठी १९५० मध्येच भारतीय जनसंघ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या वतीने त्यांनी नोव्हेंबर, १९५१ मध्ये बौध्द उपासना पाठ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे लेखक व प्रकाशकही ते स्वत:च होते. धर्मांतराविषयी डॉ. आंबेडकरांची मनोधारणा पाहता ती स्वाधीनतेची, आत्मभानाची, स्वदेश प्रेमाच्या एकनिष्ठतेची, भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याची आणि स्वत: पुरूषार्थाला महत्त्व देण्याची होती. म्हणूनच बौध्द धर्माचा स्वीकार करण्याच्या दिशेने वाटचाल होत राहिली. पुढे १९५४ मध्ये बाबासाहेबांनी ‘भारतीय बौध्द जनसंघ’ या संस्थेचे नाव बदलून भारतीय बौध्द महासभा असे केले. बाबासाहेब हेच संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांची मनापासून इच्छा होती की, भारतात बौध्द धर्माचा प्रसार झाला पाहिजे. कारण भारत ही बौध्द धर्माची जन्मभूमी आहे.
 
धर्मांतराच्या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगताना बाबासाहेब आवेशपूर्ण भाषेत म्हणतात, माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. समता प्राप्त करुन घ्यायची असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाने करायचा असेल तर धर्मांतर करा. सर्व समाज डोळ्यासमोर ठेवून धर्मांतराचा निर्णय घेण्याविषयी उपदेश करताना ते म्हणतात, धर्मांतराचा मी सांगोपांग विचार केला आहे. पण धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये. कोणाचीही वृत्ती साशंक राहू नये आणि कोणाच्याही मनात किंतु राहू नये. माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी सांगू शकत नाही. तुमचे हित कशात आहे हे सांगणे मला भाग आहे. माझे कर्तव्य मी केले आहे. आता याबाबत निर्णय घेणे हे तुमचे कामे आहे. तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे. ज्या धर्मात जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नतीसाठी जे काही कष्ट, परिश्रम करावे लागतील. ते करण्यास माझी तयारी आहे. परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे असे काही करू नका, तुमच्या बुध्दीला पटेल तरच होकार द्या. असा मातृहृदयी विचार करणारा हा नेता होता. आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी भगवान गौतम बुध्द आणि त्यांचा शिष्य भिक्खू आनंद यांच्यातील संवादाचा दाखला दिला होता.
 
१३ ऑक्टोबर, १९३५ च्या येवला येथील धर्मांतराच्या केलेल्या घोषणेपासून ३० मे, १९३६ च्या मुंबईतील भाषणापर्यंत ज्या क्षणाच्या प्रतीक्षेत बाबासाहेब होते तो धर्म स्वीकारण्याचा ऐतिहासिक क्षण जवळ येऊ लागल्यानंतर सप्टेंबर, १९५६ मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ८ सप्टेंबर, १९५६ ला भारतीय बौध्दजन समिती, नागपूर या संस्थेचे सचिव वामन गोडबोले यांना बाबासाहेबांनी दिल्लीत बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून विजयादशमी १४ ऑक्टोबर १९५६ ही दीक्षाविधीची तारीख निश्‍चित केली. २३ सप्टेंबर १९५६ ला बाबासाहेबांनी स्वत:च्या सहीचे वृत्तपत्रांना निवेदन दिले की, मी नागपूर येथे दसर्‍याच्या - विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत बौध्द धर्माची दीक्षा घेऊन बौध्द धर्माचा स्वीकार करणार आहे. बाबासाहेबांनी बौध्द धर्माची दीक्षा घेण्यासाठी मूळचे ब्रह्मदेशाचे रहिवासी आणि भगवान गौतम बुध्दांच्या महापरिनिर्वाण झालेल्या कुशीनगर येथे राहून बौध्द धर्माचा प्रसार करणारे ८० वर्षीय बौध्द भिक्खू चंद्रमणी महास्थवीर यांना नागपूरला आमंत्रित केले. बौध्द धर्म हा भारतीय संस्कृतीचेच अंग असल्यामुळे ते स्वत: आणि त्यांचे नेतृत्त्व मानणार्‍या समाजाने जर तो स्वीकारला तर हे कृत्य हिंदू समाजाला नुकसानकारक होण्याऐवजी उपकारकच होणार आहे. त्यात सर्व भारतीयांचे हित आहे. बौध्द धर्म हा विश्‍वधर्म आहे. माझे क्षेत्र मला फक्त अस्पृश्यांकरिता मर्यादित करायचे नाही. संपूर्ण भारतात धम्मचक्र घडवून आणावयाचे आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या पत्नी डॉ. शारदाबाई उर्फ माईसाहेब आणि बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक नानकचंद रंत्तू यांनी ‘जयभीम’ च्या गजरात पाच लाख अस्पृश्य बांधवांच्या उपस्थितीत बौध्द धर्माची दीक्षा घेतली.
"if I accept muslim or christen religion then my people may be de-nationalite"
 
 
संदर्भ -
सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर - दत्तोपंत ठेंगडी
सामाजिक न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर- रमेश पतंगे
महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर डॉ.ज्ञा.का.गायकवाड राजवंश
 
- विजय सुधाकर मोघे,
सामाजिक समरसता मंच,
जिल्हा कार्यकर्ता (जळगाव जिल्हा),
९८२३३७३२००