डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन
महा एमटीबी   14-Apr-2018

शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न
महिलांमध्ये सामाजिक न्यायाचे पर्व
उत्कृष्ट संसदपटू
‘मन की बात’मध्ये योगदानाचा उल्लेख

 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या बळावर संपूर्ण विश्‍वात ओेळख निर्माण केली. भारतीय समाजव्यवस्थेत अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजाला सन्मानाचा दर्जा प्राप्त करून दिला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही त्यांची कायम भूमिका राहिली आहे. डॉ. आंबेडकरांनी अशिक्षित, दुर्लक्षित, दलित अस्पृश्य समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणाच्या अभावामुळे आपला दर्जा कसा खालावला आहे, याचे भान करून दिले. गरीब- पद्दलित समाजातील मुलांनी - मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. मुंबईत सिद्धार्थ तर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळावे यासाठी भारतीय राज्यघटनेत कायदा केला. शिक्षणाप्रती त्यांच्या प्राणांतिक लढा होता. शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उध्दार होणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.
 
भारतीय शिक्षणव्यवस्था धर्मजातीमुळे अस्पृष्य समाजाला दूर लोटते. त्यांनी शिक्षण घेवू नये, शिक्षण घेणे ही वरिष्ठ समाजाची मक्तेदारी आहे, असा अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आला. त्यांनी स्वत: प्रयत्नपूर्वक व संघर्षातून उच्चशिक्षण परदेशातून प्राप्त केले. डॉ. आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर विपरीत समाजव्यवस्थेत स्थान मिळविले. दलित समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून ते ग्रहण करण्यासाठी अट्टहास केला. केवळ शिक्षण घेवून स्वउन्नती साधायची नाही तर शिक्षण प्रसार करण्याची मोठी जबाबदारी शिक्षित वर्गावर आहे, असे ते निक्षून सांगत. शिक्षणाला डॉ. आंबेडकर शस्त्र मानत. शिक्षण हे दुधारी असल्याचे ते प्रतिपादित करीत. शिलाशिवाय शिक्षण म्हणजे शिक्षणरूपी शस्त्राचा गैरवापर होय, असे ते सांगत असत. आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे. यात काही शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. त्याशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. ज्ञान हे तलवारीसारखे आहे. तिचा सदुपयोग की दुरुपयोग करावयाचा हे त्या माणसाच्या शिलावर अवलंबून आहे.
 
नवे शैक्षणिक धोरण 
 
भारतीय आणि पाश्‍चात्य अभ्यासकांनी मांडलेले शैक्षणिक दृष्टिकोन अभ्यासता त्यात सर्वसमावेशकता अल्प प्रमाणात दिसून येते. कार्यवाद, आदर्शवाद आणि निसर्गवाद या तीन सिद्धांताचा विचार केल्यास डॉ. आंबेडकरांनी या सिद्धांतच्या पलीकडे जावून सिद्धांत मांडला. त्यांनी शिक्षणात मानवतावादाचा सिद्धांत मांडला. गौतम बुद्धांनी शिक्षण व्यवस्थेची सांगितलेली मूल्ये डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणली. भारतीय शिक्षण प्रणालीत नव सिद्धांताची मांडणी केली. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत स्त्री - पुरुष असा भेद होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. महात्मा फुलेंनी स्त्री - पुरुष शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा काढली, तर डॉ. आंबेडकरांनी मुलं आणि मुली यांना प्राथमिक शिक्षणाची कायद्याने सक्ती केली. गौतम बुद्ध व महात्मा फुले दोन्ही डॉ. आंबेडकरांचे गुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा डॉ. आंबेडकरांच्या विचारात व कृतीत दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० मध्ये बहिष्कृत वर्गाच्या परिषदेमध्ये मुले- मुलींना प्राथमिक शिक्षण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सक्तीचे व मोफत करण्यात यावे, असा ठराव केला. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार कसा महत्त्वाचा ठरतो या विषयी ते म्हणतात की, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सध्याच्या युगात ज्या देशात बहुजन समाज निरक्षर आहे. अशा देशाचा जीवन कलहात टिकाव लागायचा नाही. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण का गरजेचे आहे या विषयीचा दृष्टिकोन यातून दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे दोन पैलू या ठिकाणी पुढे येतात.
१) शिक्षणासाठी स्त्री-पुरुष असा भेद असता कामा नये.
२) शिक्षणाचे सार्वत्रिकरण
 
 
किमान प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी घटनेत सक्तीचे व मोफत अशी तरतूद केली आहे. यावरून शिक्षणाप्रती त्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात येतो. प्रचलित शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन अभ्यासता लक्षात येते की, त्यांची शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी किती वास्तव व विज्ञानवादी आहे. आदर्शवाद हा सिद्धांत पाश्‍चात्य देशात मांडण्यात आला. प्लेटो हा आदर्शवादाचा जनक मानला जातो. प्लेटोने दृश्य वस्तू या सत्य नसून त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या कल्पना याच सत्य आहे, असा सिद्धांत मांडला. या संदर्भात डॉ. आंबेडकर म्हणतात, वास्तव डोळ्यापुढे असून ते कसे नाकारता येईल. व्यावहारिक जीवनात माणसाची पंचज्ञानेंद्रीयेच सत्याचा निर्वाळा देतात. तीच त्याच्या ज्ञानार्जनाची अंतिम साधने आहेत. आमच्या ज्ञानाची साधने जी ज्ञानेंद्रिये ती जगाच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून देत आहेत. असे असताना जगाचे अस्तित्त्व आम्हाला कसे नाकरता येईल? जर जगालाच अस्तित्त्व नसेल तर मला व तुम्हाला तरी अस्तित्त्व कुठे उरते आणि माझ्या जाणिवेला तरी काय अर्थ उरतो ? सत्य शोधून काढणे हा आदर्शवादाचा पाया आहे. परंतु सत्याची व्याख्या करताना जे डोळ्याने दिसते ते सत्य नाही असे म्हणणे चुकीचे आहे. शिक्षणाचा उद्देश हा आत्मसाक्षात्कार असा असेल तर हा आत्मसाक्षात्कार मानवाच्या पंचज्ञानेंद्रियाला व पंचकर्मेंद्रियांना अनुभवता आला पाहिले. जे नाही त्याची केवळ कल्पना करून जाणीव करायची आहे. असे शिक्षणाचे ध्येय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत नाही. ज्ञानप्राप्तीसाठी, सत्य शोधण्यासाठी आपली पंचज्ञानेंद्रिये हेच एकमेव साधन आहे, असा नव आदर्शवादी सिद्धांत शिक्षणात त्यांनी मांडला. शिक्षणाने केवळ स्वत:चा विकास होत नाही तर त्यांच्या मदतीने समाजाचादेखील दर्जा उंचावता येतो हा महत्त्वाचा घटक डॉ. आंबेडकर प्रतिपादन करतात. शिक्षणातील आदर्शवाद संकल्पना डॉ. आंबेडकरांनी शीलाशिवाय अपूर्ण वाटते. प्लेटो शिक्षणामुळे जीवनातील श्रेष्ठ मूल्य लाभतात असे मानतो. तो या मूल्यांना सत्य, सौंदर्य व शिव असे मानतो. डॉ. आंबेडकर शिक्षणामूळे मनुष्य शीलवान होतो असे मानतात.
 
कार्यवाद हा सिद्धांतदेखील पाश्‍चात्य राष्ट्रात उदयास आला. कृतीमधून ज्ञानप्राप्ती होते. समस्या निराकरणातून मनुष्यास शिक्षण मिळते असा हा सिद्धांत सांगतो. ज्या शिक्षणातून व्यक्तीच्या सुप्तगुणांचा विकास होतो आणि त्यातून तो स्वत:च्या व समाजाच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकतो त्याला खरे शिक्षण म्हणावे असे जॉन ड्युई कार्यवादाविषयी सांगतात. जॉन ड्युई यांच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रभाव डॉ. आंबेडकरांवर विशेष दिसून येतो. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवार्‍याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्चवर्गाची सेवा करण्यास लावणे नव्हे. डॉ. आंबेडकर सदर परिच्छेदात कार्यवाद सिद्धांताचा संपूर्ण सार सांगतात. कार्यवाद सिद्धांताच्या अनुषंगाने मांडणी करतांना १) शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन २) परिस्थिती शाश्वत राहणार नाही ती प्रयत्नपूर्वक बदलता येणे शक्य आहे. ३) जीवशास्त्रीय अशा त्रिसूत्रांवर आधारित आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेत गौतम बुध्दांनंतर पहिल्यांदा प्रत्यक्षात कार्यवाही सिद्धांत अस्तित्त्वात आणला. अस्पृष्य समुहाच्या उत्थानाकरिता त्याची शैक्षणिक उपयुक्तता कार्यप्रवण करण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले आहे.
 
शिक्षणविषयक सिद्धांतापैकी निसर्गवाद हा देखील एक पाश्‍चात विचारवंतानी मांडलेला सिध्दांत आहे. निसर्गवादाची संकल्पना इंद्रियजन्य अनुभवावर आधारित आहे. ही संकल्पना ऍरिस्टॉटल, बेकल हॉब्जलामार्क, रूसो, थॉमस हर्बट स्पेनर, सॅम्युअल बटलर, बनार्ड शॉ, पेस्टॉलॉजी, फ्रोबेल, कॉम्युन्स या अभ्यासकांनी विशेषत: मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेत निसर्गवादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पध्दतीने रूजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत तसा कायदा केला. हजारो वर्षांची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढली. शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते, जातीवर नाही हा विचार त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेत रूजविला. अमूक एक जातीचा म्हणून त्याला शिक्षणापासून दूर ठेवणे म्हणजे निसर्गनियमांचा भंग करणे होय हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम भारतात मांडला. शिक्षण व्यक्ती वैशिष्ट्याचा विकास करते ही बाब तथाकथित समाजाच्या लेखी नव्हती. डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नातून, संघर्षातून भारतीय समाजव्यवस्थेत निसर्गवादाचा सिद्धांत रूजला. शिक्षण घेण्यासाठी जात, धर्म, वय, लिंग हे भेद पुसले गेले. निसर्गवाद शिक्षणाचे ध्येय लोकनिष्ठ मानतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या ध्येयाला अनुसरून विचार मांडताना म्हणतात. आपला व्यक्तीविषयक लौकीक वाढविणे व त्याबरोबरच आपल्या समाजाची योग्यता वाढविणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे. आध्यात्मवाद किंवा आदर्शवादाप्रमाणे शिक्षणाची उद्दिष्ट्ये परलोक प्राप्ती नसून स्वविकास आणि सामाजिक उन्नती असे असायला हवे. तरच शिक्षण खर्‍या अर्थात मानवोपयोगी ठरेल अशी सैद्धंतिक भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली.
 
डॉ. आंबेडकरांचा शिक्षणातील निसर्गवाद म्हणजे केवळ निसर्गावर अवलंबून राहणे नव्हे तर निसर्गातील आपण एक घटक आहोत त्यानुसार इतरांवर अवलंबून आले. इच्छा आल्या, आकांक्षा आल्या मग त्या पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे लागतात आणि हेच निसर्गवादातील सत्य आहे. शिक्षणाचे मानवी जीवनातील स्थान, महत्त्व, ध्येय आणि उपयोगिता सिद्धांताच्या माध्यमातून मांडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी काही पाश्‍चात्य व भारतीय अभ्यासकांनी ते विशद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचलित शिक्षणविषयक सिद्धांताचा प्रत्यक्ष जीवनाशी सहसंबंध जोडला. प्रचलित सिद्धांतात काही बदल सुचविले, नवा शैक्षणिक सिद्धांत मांडला. संपूर्ण मानवजातीला शिक्षणाची गरज, महत्त्व व उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन सत्याशी भिडणारा शाश्वत स्वरूपाचा आहे.
 
 
- डॉ. विनोद निताळे,
जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग,
उ.म.वि. जळगाव
ई-मेल : [email protected]