आंबेडकर आणि मार्क्सवाद
महा एमटीबी   14-Apr-2018

कम्युनिस्ट म्हणजे ‘पोटात एक’ आणि ‘ओठात वेगळे’
डॉ. आंबेडकर कम्युनिस्टांशी नेहमीच फटकून राहिले
लाल बावट्यांची देशात वारंवार राष्ट्रविरोधी कारस्थाने
कम्युनिस्टांनी नेहमी दलित आंदोलनांची मुळे उखडली

 
 
 
रशियन व चिनी कम्युनिस्टांशी मिळून भारतातील लाल बावटे वारंवार राष्ट्रविरोधी अशी कारस्थाने रचत आहेत असे बाबासाहेबांचे ठाम मत झाले होते. त्यांनी वेळोवेळी त्या विरोधात सावध पावले उचललेली आपल्याला पाहावयास मिळतात. १९६२ सालच्या भारत-चीन युध्दात चिनी आर्मीचे कम्युनिस्टांनी बंगालमध्ये केलेले स्वागत व भारतीय सेनेच्या विरोधात केलेली त्यांची मदत हा कम्युनिस्टांच्या राष्ट्रद्रोहाचा पुरावाच नव्हे काय ? बाबासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीने कम्युनिस्टांच्या हेतूंना वेळीच ओळखले होते. त्यांची चाणाक्ष नजर देशहिताच्या आड येणार्‍या शत्रूंवर नेहमीच चोख पहारा देत असे, याची आपणास खात्रीच पटते.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुरूवातीपासूनच मार्क्सवाद आणि कम्युनिष्टांच्या प्रखर विरोधात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांच्या सर्वंकष हुकूमशाहीच्या तीव्र विरोधात होते. ते म्हणतात, ‘हुकूमशाहीत संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचा अभाव असतो. संसदीय लोकशाहीत नागरिकापाशी अधिकार आणि कर्तव्ये दोन्ही असतात; पण हुकूमशाहीत नागरिकांपाशी केवळ आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असते, तक्रार करण्याचा कोणताही अधिकार राहत नाही’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते की, रक्तरंजित क्रांतीसाठी लोकशाहीत कोणतेही स्थान नाही. बाबासाहेबांचा राजकारणातील व्यक्तीपूूजेला विरोध होता. त्यांचे लोकांना आवाहन असे होते की, त्यांनी केवळ राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट होऊ नये. राजकीय जीवनात समानता आणि सामाजिक आर्थिक जीवनात असमानता अशी स्थिती होऊ नये, एका बाजूने समानता आणि दुसर्‍या बाजूने असमानता अशा ढोंगाने लोकशाही धोक्यात येईल असे त्यांचे मत होते.
 
मसूर येथे भरलेल्या दलित वर्ग परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना बाबासाहेब म्हणतात, ‘कम्युनिस्टांनी चालवलेली कामगार चळवळ ही कामगार हितांची कदापीही नाही तर आपल्या राजकीय स्वार्थ सिध्दीसाठी ते कामगार वर्गाला जुंपल्यासारखे राबवतात. या देशात रक्तरंजित क्रांती घडावी या आपल्या कुटील राजकीय हेतूसाठी कामगारांना व भुकेकंगाल अस्पृश्यांना संघटीत करण्याचा कम्युनिष्टांचा डाव आता उधळला गेला आहे. अशा कम्युनिस्टांशी मी संबंध ठेवणे सुतराम शक्य नाही, मी कम्युनिस्टांचा कट्टर वैरी आहे’ (आंबेडकर चरित्र, धनंजय कीर पृष्ट ३२८) त्यांच्या समाजवादाचे सिध्दांत, मार्क्सवादी सिध्दांतापेक्षा वेगळे आहेत. डॉ. आंबेडकरांना जाणीव होती की, फेबियन विचारांचा जबरदस्त प्रभाव नसेल तर दबलेल्या, खचलेल्या लोकांना मार्क्सवाद आकर्षित करेल. आपले सहकारी दादासाहेब गायकवाड यांना १९५३ मध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये ते म्हणतात, त्यांच्या योजना यशस्वी न होण्यास त्यांचे लोक मार्क्सवादी असू शकतात.
 
बाबासाहेबांनी आपल्या अनुयायाशी मार्क्सवादाच्या मूळ सिध्दांताची ना कधी चर्चा केली, ना कधी उल्लेख केला. ते म्हणत असत, सर्व मार्क्सवाद्यांनी केलेले अध्ययन एकत्र केले तरी त्यांच्यापेक्षा माझे अध्ययन जास्तच होईल, आपल्या काठमांडूच्या शेवटच्या भाषणात त्यांनी बौध्द व मार्क्सवादी विचारांची तुलना केली होती. कम्युनिस्टांच्या शुध्दतावादाला आंबेडकरांनी कापड गिरण्यांमध्ये जाणले होते. तेथे गिरणी कामगार युनियनमध्ये स्पृश्यास्पृश्यता व्यापक प्रमाणावर होती. १९३७ मध्ये प्रांताच्या विधानसभांच्या निवडणुका होत्या. १९३६ मध्ये बाबासाहेबांनी आपला वेगळा राजकीय पक्ष ‘इंडिपेंडेंट लेबर पार्टी’ नावाने स्थापन केला. ते त्याला ‘कामगार-मजदूर वर्गाचा पक्ष’ म्हणत असत. बाबासाहेब लिहितात की, गरीब कामगार वर्गाला भाकरी शिवाय अन्य विचारच करू न देणे ही कम्युनिस्टांची धूर्तता आहे. फक्त आपल्या भाकरीसाठी नाहीतर आपल्या सामाजिक, राजकीय हक्कांविषयीही त्यांना जागरूक रहावे लागेल. अन्यथा त्यांच्या हातातून सत्ता निसटून जाईल. सरकार चालवण्यात जनतेला रस नसणे हा तिचा एक दुर्गुण आहे. आंबेडकर स्पष्टपणे बजावतात की, कम्युनिस्टांच्या ट्रेड युनियनला आपला हितैषी आणि कामगारांचे शोषण रोखणारा मानणे मूर्खपणा आहे. जोपर्यंत ट्रेड युनियनचा उद्देश सरकारला प्रभावित करण्याचा असत नाही तोपर्यंत ट्रेड युनियन, युनियनच्या नेत्यांचे व्यक्तिगत हित साधण्याचे माध्यम असते. १९२९ साली मुंबईतील कापड गिरण्यांमधील कामगारांनी संप केला. हा संप सुमारे सहा महिने चालला होता. सुमारे दीड लाख कामगार या लढ्यात सामील झाले होते. स्वतः बाबासाहेब तर संपाला अनुकूल नव्हतेच.
 
बाबासाहेबांच्या मते कम्युनिस्टांच्या पाचवीला संप पुजलेला होता. साम्यवाद आणि संप ही जुळी भावंडे असे त्यांचे मत होते. ते म्हणत, ‘सांप्रतच्या कामगार चळवळीचे ध्येय मजुरांचे आर्थिक हित करण्याचे नसून राज्यक्रांती घडवून आणण्याचे आहे. संप हे कामगारांचे कायदेशीर शस्त्र आहे. पण, त्याचा उपयोग योग्य वेळीच करायचा असतो.’ संपावर जाण्याचा कामगारांचा अधिकार आहे, हे तत्त्व आहे. तथापि संपाचे हत्यार फार जपून वापरावे, ते क्वचितप्रसंगी वापरावे व तेही केवळ कामगारांच्या हितार्थच वापरले जावे. कम्युनिस्ट नेत्यांच्या राजकीय उद्दिष्टांसाठी त्याचा वापर केला जाऊ नये असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘कम्युनिस्टांची कामगार चळवळ ही खरीखुरी कामगार चळवळ नाही. दलित, शोषित वर्ग व कामगार हितापेक्षा रक्तरंजित राज्यक्रांतीच्या उद्देशानेच ती अधिक प्रेरित झालेली आहे. पोटात एक आणि ओठात वेगळे ही तर कम्युनिस्ट कार्यपध्दतीची खरी ओळख आहे. आपण त्यांच्या कुटील कारस्थानापासून नेहमी सावध राहिले पाहिजे. कम्युनिझम व कामगार चळवळ या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.’
 
जेव्हा बाबासाहेब केवळ त्रुटी न पाहता सुधारण्याचे उपायही सुचवतात तेव्हा ते कम्युनिस्ट विचारसरणीपासून निराळे असल्याचे ठळकपणे दिसून येते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच घोषणेवर ठाम राहिले होते, जी घोषणा त्यांनी कॉलेजच्या जीवनात फेबियन सोसायटीमध्ये आत्मसात केली होती- ‘शिका’, जर आपण स्वतःला शिक्षित केले नाही तर नेत्यांच्या मोहपाशात आज ना उद्या लपेटले जाल. हे निश्‍चित असे त्यांचे मत होते. भारतीय समाजाचा एक फार मोठा वर्ग आंबेडकरांनी दिलेला प्रेरक मंत्र ‘शिका’ विसरला आहे. बाबासाहेब हे कम्युनिस्टांना आपल्या जनाधारातील अडथळा वाटत होते. जेव्हा पं. नेहरूंनी १९५२ च्या स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणुकीत आपल्या कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार सुरू केला, तेव्हा कॉंग्रेसची बी टीम ‘कम्युनिस्ट’ ही कॉंग्रेसच्या मदतीसाठी पुढे आली. कम्युनिस्ट नेता श्रीपाद डांगे यांनी बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार करताना आवाहन केले की, भले आपले मत वाया गेले तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांना मत देऊ नका. याचा परिणाम असा झाला की, १९५२ च्या निवडणुकीत बॉम्बे उत्तर (दादर) भागातून कॉंग्रेसचे उमेदवार नारायण कजरोळकर विजयी झाले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांशी नेहमीच फटकून राहिले. त्यांना कम्युनिस्टांच्या राष्ट्रनिष्ठेवर नेहमीच संशय होता. १९५२ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात काही पक्षांशी मिळून संयुक्त आघाडी बनवायची बाबासाहेबांनी योजना केली तेव्हा आपल्या पक्षाशीच आघाडी करावी या प्रस्तावासह शेतकरी कामकरी पक्षाचे अध्यक्ष शंकरराव मोरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकराना दिल्लीत जाऊन भेटले. पण मोरे व त्यांचा पक्ष हा रशियातील कम्युनिस्ट विचारप्रणालीचा आहे असा बाबासाहेबांचा संशय होता. मात्र त्याचवेळी जेव्हा जयप्रकाश नारायण यांनीही बाबासाहेबाना शंकरराव मोरे हे कम्युनिस्टांच्याच बाजूचे आहेत असे सांगितल्यावर मात्र त्यांची खात्रीच पटली व त्यांनी तात्काळ शंकरराव मोर्‍यांचा संयुक्त आघाडीचा प्रस्ताव फेटाळला. बाबासाहेबांच्या जीवनकाळात त्यांना हरतर्‍हेने विरोध करणार्‍या कम्युनिस्टांना आज त्यांच्याच नावाचा आपल्यासाठी उपयोग करण्याची आठवण झाली आहे. एका जातीविशेषचे लोकच कम्युनिस्टांच्या मंचावर दिसतात. तथाकथित मार्क्सवादींमध्ये सर्वांचा जर एकच वर्ग, तर मग दलितांना प्रतिनिधित्त्व का नाही ?
 
बाबासाहेब सर्व दलितांना एका समान बरोबरीच्या व्यवस्थेत आणू इच्छित होते. त्यांनी केलेली जातीची परिभाषा, कम्युनिस्टांनी केलेल्या वर्गाच्या परिभाषेपेक्षा वेगळी होती. बाबासाहेब ‘दलित’ हा शब्द सर्व जाती-उपजातींसाठी वापरत असत. वर्षानुवर्षे कम्युनिस्टांनी दलित आंदोलनांची मुळे उखडलेली आहेत. सामाजिक-आर्थिक समानता देण्यावेळी मात्र दलितांना काळावर ढकलून दिले. कम्युनिस्टांचे धोरणच असे की, दलितांकडे सहाय्यक कार्यकर्ता या दृष्टीने बघावयाचे. बाबासाहेब हे भारतातील दलित-अस्पृश्य वर्गाचे नेतृत्त्व करीत होते, मग त्यांच्या मुक्तीसाठी आंबेडकरांनी मार्क्सवादी क्रांतीचा मार्ग का स्वीकारला नाही? त्याऐवजी ते संसदीय लोकशाहीच्या विचारांकडे का वळले ? रशियन कम्युनिस्ट राज्यक्रांतीने सारे जग भारावले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सला बुध्दाचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब सामाजिक क्रांतीसाठी बुध्दाचा आणि लोकशाहीचा मार्ग स्वीकारतात. बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या मार्क्सवादाच्या रक्तरंजित क्रांतीच्या नेमकी विरोधी आहे.
 
 
 
- नरेंद्र दिनकरराव निकुंभ,
अमळनेर, ९४२१६३९०७८