रशियन कंपनी असलेल्या 'टेलिग्राम'वर रशियामध्येच बंदी
महा एमटीबी   13-Apr-2018


मॉस्को : व्हॉट्सअॅपचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'टेलिग्राम' या मेसेंजर अॅपवर रशियन न्यायालयाने बंदी घातली आहे. रशियन सरकारने दाखल केलेल्या एका याचिकेनुसार रशियन न्यायालयाने हा निर्णय घेतला असून संपुर्ण रशियामध्ये या अॅप बंदी घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे टेलिग्राम ही मूळ रशियन कंपनी असून देखील रशियाने यावर बंदी घातल्यामुळे अनेक जणांकडून यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु ही बंदी घालण्याचे कारण देखील आश्चर्यचकित करणारे असेच आहे.
टेलिग्राम हे अॅप रशियामध्ये मोठ्या संख्येत वापरले जाते. त्यामुळे याद्वारे दररोज अनेक महत्त्वाचे संदेश पाठवले जातात. त्यामुळे रशिया सरकारने टेलिग्रामला आपल्या अॅपमधून देवाणघेवाण होणाऱ्या संदेशांची चौकशी करण्याचे अधिकार मागितले होते. जेणेकरून देशात कधीही दहशतवाद अथवा तत्सम देशहिताच्या दृष्टीने घातक घटना घडल्यास त्यांचा शोध घेण्यास त्याची मदत व्हावी. परंतु टेलिग्रामचे संस्थापक अध्यक्ष पावेल दुरोव यांनी हे कंपनीच्या नियमांच्या बाहेर असल्याचे म्हटले. तसेच ग्राहकांच्या गोपनीयतेचा दाखला देत हा अधिकार देण्यास नकार दिला. त्यामुळे रशिया सरकारने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करत आपले गाऱ्हाणे मांडले.

दरम्यान न्यायालयाने देखील सरकारची बाजू उचलून धरत, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने टेलिग्रामने आपल्या नियमांमध्ये बदल करून रशिया सरकारला हे अधिकार द्यावेत, असे आवाहन केले आहे. तसेच जो पर्यंत टेलिग्राम हा अधिकार सरकारला देणार नाही. तोपर्यंत टेलिग्राम रशियामध्ये बंदी घालण्यात येत असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.