बाबासाहेबांवरचे ‘प्रेम’ हे नक्षलवाद्यांचे ‘ढोंग’
महा एमटीबी   13-Apr-2018
 
 
 
 
 
नक्षलवाद्यांबद्दल रंगवले गेले उदात्त चित्र
 
जनतेच्या सहानुभूतीचा ठेवतात फायदा
 
संविधानासमोर माओवादी चळवळीचे आव्हान
 
साम्यवादाचा मार्ग अत्याचारी, मार्क्सचा हिंसेवर आधारित
 
 
माओवादी नक्षलवादाला, त्यांच्या विध्वंसक वृत्तीला चालना देणारे अनेक कार्यकर्ते सतत डॉ.आंबेडकरांचा जयजयकार करीत असतात. त्यामुळे बाबासाहेबांवर नितांत प्रेम करणार्‍या, त्यांना दैवत मानणार्‍यांना असे वाटते की, हे माओवादी, नक्षलवादी मंडळीच आपली माणसं आहेत. ‘जय भीम - लाल सलाम’ या घोषणेला ते प्रतिसाद देतात. पण माओवादी, नक्षलवादी राष्ट्रविरोधी कारवाया करीत आहेत आणि ते डॉ.बाबासाहेब आंबेेडकरांच्या विचारांच्या आणि आदर्शांच्या किती विरोधी आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 
 
जंगलात राहणारे आदिवासी, अल्पभूधारक, गरीब मजूर यांची शासकीय कर्मचारी, व्यापारी ठेकेदार आणि नेते मंडळी वर्षानुवर्षे पिळवणूक करीत होते. त्यामुळे सततच्या अत्याचार आणि अन्यायामुळे दबून राहिलेला संताप कधीतरी उफाळून येणार यात आश्‍चर्य नाही, असा सर्वसाधारण माणसाच्या मनात विचार येतो आणि तो नक्षलवादाचे समर्थन करू लागतो. नक्षलवादी म्हणजे दीनदुबळ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शस्त्रसज्ज संघटना असा सातत्याने सर्वांंचाच समज करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची सहानुभूती नेहमीच नक्षलवाद्यांच्या पाठीशी राहिली आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्या आदींच्या माध्यमातून तसेच माध्यमांमधून सतत होणार्‍या अन्याय आणि त्यासाठी हातात शस्त्र घेऊन विरोधात उभ्या ठाकणार्‍या नायकाचे चित्र रंगवण्यात आल्यामुळे तो नेहमीच आदरास पात्र ठरला आहे. असे उदात्त चित्र नक्षलवाद्यांबद्दल रंगवले गेल्यामुळे नक्षलवादी आज जे प्रकार करीत आहेत त्यामागे नेमके काय षड्यंत्र आहे ? आणि ते किती भयंकर वा धोकादायक आहेत ? हे लक्षात येत नाही.
 
 
 
ज्यावेळी नक्षलवादाची चळवळ सुरू झाली त्यावेळी पीडितांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द लढण्याची त्यांची इच्छा प्रामाणिक होती. पण आता ही चळवळ संपलेली आहे. आज त्या नक्षलवादी चळवळीचा बुरखा घालून माओवाद्यांनी नव्याने चळवळ उभी केली आहे. सामान्य जनतेच्या मनातील सहानुभूतीचा फायदा उठवत हे माओवादी आपल्या मनातील दुष्ट विचार वास्तवात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा माओवाद्यांचा नक्षलवादाच्या बुरख्यामागील विद्रूप चेहरा जगासमोर आणणे ही काळाची गरज आहे.
भारतीय संविधानासमोर माओवादी चळवळीचे एक फार मोठे आव्हान अनेक दशकांपासून आहे. परंतु आजची माओवादी चळवळ खूप वेगळ्या धोरणाने त्यांचे कार्य वाढवत आहे. चळवळीला माणसे मिळावित म्हणून आणि यांना अपेक्षित असलेल्या क्रांतिसाठी व्यापक जनाधार प्राप्त व्हावा याकरिता आता माओवादी शहरी भागात कार्य वाढविण्यासाठी सक्रिय होत आहेत. शहरी भागात यांना बंदुका घेवून हल्ले करायचे नाहीत तर मार्क्स, माओच्या विचारांचे समर्थक, कार्यकर्ते निर्माण करावयाचे आहेत. समाजात अनेक गटांमध्ये फूट पाडायची, बुध्दिभेद करायचा, राज्यव्यवस्थेवर जोरदार टीका करायची आणि मोठया प्रमाणावर असंतोष निर्माण करायचा असा प्रयत्न या शहरी चळवळी करताना दिसतात.
 
 
 
बोधिसत्त्च डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे की, साम्यवादाचा मार्ग अत्याचारी आहे. मार्क्सचा मार्ग हा हिंसेवर आधारित आहे (धनंजय कीर, पृ.क्र ५६४) शहरी भागात सक्रिय असलेल्या जहाल गटाला मात्र बुध्दाचा विचार सांगणारे बाबासाहेब पसंत नाहीत. लोकशाहीवादी, संविधान निर्माते, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना नको आहेत. दलित चळवळींना बदनाम करण्याचे आणि लोकशाहीत विचारंाशी प्रतारणा करीत अराजकता माजविण्याचेे काम काही गट करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि भारतीय लोकशाहीपुढे या माओवाद्यांची हिंसक क्रांती कधीही सफल होऊ शकत नाही. 
 
 
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणतात, हे सहज शक्य आहे की, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरुप सांभाळेल. परंतु, प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असेल तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे ? आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हाच की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारुन सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला पाहिजे.
 
 
 
आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग अन्य काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल. 
 
 
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण नोव्हेंबर, २५, १९४९ (स्त्रोत : १ डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पान नं. १७१-१७२)
 
 
- महेश आहेराव