भारतीयांची ‘सुवर्ण’ कामगिरी
महा एमटीबी   13-Apr-2018
 

 
२०१६ साली रिओला ऑलिम्पिक पार पाडले. तिथली सुरुवातीची भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता ’पेज थ्री फेम’ शोभा डे म्हणाल्या होत्या की, ’’भारतीय खेळाडू रिओला जाऊन फक्त सेल्फी काढतात, मोकळ्या हाताने परत येतात आणि देशाचा पैसा वाया घालवतात.’’ पण, नंतर याच ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावले. एका मुलाखतीदरम्यान साक्षी मलिक शोभा डे यांना उत्तर देताना म्हणाली की, ’’लेखकाला लिहिताना काही चूक वाटल्यास ती खोडून दुरुस्त करता येते, पण खेळाडूचे आयुष्य तिथे पणाला लागलेले असते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होण्याची भीती असते. कारण, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो.’’ आज हे सगळे आठवण्याचे कारण भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकूल स्पर्धेत केलेली देदीप्यमान कामगिरी.
 
भारताने आतापर्यंत १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्यात राहुल आवारेसारखा मराठमोळा पहलवानही आहे. राहुल आवारे मूळचा बीडचा. पुण्यातील कात्रजमध्ये त्याने कुस्तीचे धडे गिरवले. त्याचे हे नेत्रदीपक यश पाहून त्याचे वस्ताद म्हणजेच गुरू काका पवार भारावले आणि आपले स्वप्न त्याने पूर्ण केले असून २०२० साली होणार्‍या ऑलिम्पिकमध्येही त्याने पदक मिळवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. खूप हालअपेष्टा सोसून त्याने हे यश मिळवले आहे. भारतातील बहुसंख्य खेळाडूंची ही अवस्था आहे. आपल्या भारतीय चित्रपटांत त्यांचे कधी योग्य तर कधी अवास्तव चित्रीकरणही झालेले आहे. पण, २१व्या शतकात खेळाडू हे फार महत्त्वाचे आहेत. आजच्या युगात युद्ध हे जमिनीवर लढले जात नाही, तर आपल्या देशाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी सांस्कृतिक घटक हातभार लावत असतात. त्यात खेळ हा घटक फार महत्त्वाचा आहे. त्यात दोन देशांमधील एखादा सामना होत असतो. ते एका युद्धापेक्षा कमी नसतो. भारत-पाकिस्तानमधील होणारा क्रिकेटचा सामना असाच. पण तो सामना तितका खिलाडूवृत्तीने घेण्याची वृत्ती ही दोन्ही देशांमध्ये नाही, हे गेल्या काही वर्षांत दिसून आले. ऑलिम्पिक हे सुद्धा राष्ट्राला आंतरराष्ट्रीय ओळख देण्याचे एक साधन आहे. १९८४ साली रशियात जेव्हा ऑलिम्पिक झाले होते, तेव्हा अमेरिकेने त्यावर बहिष्कार घातला होता. कारण, दोघांमधले शीतयुद्ध. आज भारतीय खेळाडूंनी असंख्य संकटांवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश मिळवले. यासाठी ते कौतुकास पात्र आहेत, हे नक्की.
 
 
============================================================ 
 
दरवाढीची मात्रा लागू पडेल?
 
जगात मोफत असे काही नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत ही कोणीतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोजत असतं. ‘ऍपल’ कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्सनेही ‘अॅपल’च्या सर्व सुविधा सशुल्क ठेवल्या होत्या. त्याचे कारण विशद करताना जॉब्स म्हणाले की, ‘‘कुठलीही चांगली सुविधा ही मोफत मिळत नसते. त्यासाठी योग्य पैसे मोजावे लागतात.’’ हे ‘बेस्ट’च्या बाबतीतही म्हणा लागू होतेच. कालपासून ‘बेस्ट’ने दरवाढ लागू केली. गेल्या काही महिन्यांत ‘बेस्ट’ ही संप, कर्मचार्‍यांचे रखडलेले पगार आणि तोट्यामुळे जास्त चर्चेत आली.
 
‘बेस्ट’ला तोट्यातून काढण्यासाठी आयुक्तांनी अनेक उपाय सुचवले होते. त्यात पगार कमी करणे, देणी गोठवणे, तोट्यात असलेले ‘बेस्ट’चे मार्ग बंद करणे आणि दरवाढ असे उपाय होते. त्यापैकी दरवाढ ही मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली गेली. आज महाराष्ट्रातील बहुतांश सार्वजनिक व्यवस्था या तोट्यात आहेत. खरंतर कुठल्याही व्यवस्थेत बदल अपेक्षित असतात. ती व्यवस्था वर्षानुवर्षे जुन्या पद्धतीने चालवता येत नाही. मात्र, ‘बेस्ट’ आजही जुन्याच पद्धतीने चालवली जात असल्याने तोट्यात आहे. त्यातच शेअर रिक्षा आणि टॅक्सीचालकांशी संगनमत करून ‘बेस्ट’ कर्मचारी बस उशिरा सोडत असल्याचा आरोप बरेचदा केला जातो आणि मग साहजिकच प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडे वळतात. आता हीच सवय ‘बेस्ट’च्या कर्मचार्‍यांच्या जिवावर बेतली आहे. आजही ‘बेस्ट’ प्रवाशांना ज्या प्रकारची सेवा देते, ते पाहता आगामी काळातही ‘बेस्ट’ तोट्यातून बाहेर पडेल, असे दिसत नाही. ‘बेस्ट’च्या बसमार्गांचे मुंबईतील ट्राफिक समस्येमुळे, कर्मचार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे कोलमडलेले वेळापत्रक हे एक महत्त्वाचे कारण. परिणामी, गर्दी वाढत जाते आणि तासन्‌तास प्रवाशांना तात्कळत उभे राहावे लागते. जेव्हा सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते तेव्हा ते पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात म्हणाले की, ’’रेल्वेचे प्रवासी हे ग्राहक असतात आणि त्यांना चांगली सेवा देणे, हे रेल्वेचे कर्तव्य आहे.’’ त्यामुळे त्यांनी त्यावर्षी कुठल्याच नव्या गाड्या आणि नव्या प्रकल्पाची घोषणा न करता सेवासुधारणेवर भर दिला. आपल्या ‘बेस्ट’लाही सुरेश प्रभूंसारख्या व्यक्तीची गरज आहे. ‘बेस्ट’च्या तिकिटासाठी ’रिडलर’ नावाचे अॅप असून ते अजूनही सुरळीतपणे चालेल, याची शाश्वती नाही. तेव्हा, दरवाढ तर होतच राहील, पण जर प्रवाशांना योग्य सुविधा मिळाल्या नाही तर ही ‘बेस्ट’ची ही व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही.
 
 
 
 
- तुषार ओव्हाळ