चंद्रगुप्तच्या नगरीत
महा एमटीबी   13-Apr-2018


पूर्णिया. इथे माझ्या नाटकाचा पुढचा दौरा होता. कधी न ऐकलेला गाव. इथे प्रयोग ठरल्यावर, आधी गुगलवर या गावाची शोधाशोध केली. बिहार राज्यातील हे एक लहानसे गाव. उत्तरेकडे. नेपाळच्या सीमेलगत. पाटण्याच्या पूर्वेला वसलेले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीयविद्या (Indology) चा अभ्यास करत असल्याने, या भागाची प्राचीनता व त्याचे ऐतिहासिक महत्व कळले होते. त्या बरोबरच बिहार, म्हणजे पूर्वीच्या मगध या महाजनपदा विषयी मनात उत्सुकता दाटली होती. दौरा संपल्यावर, थोडा वेळ काढून पाटणामध्ये फिरायचे ठरवले.

दौरा संपला. पाठीवर सॅक टाकली. आणि एकटाच बसने पाटण्याला निघालो. खिडकीतून क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेती या भागाच्या समृद्धीची साक्ष देत होती. मधून मधून होणारे गंगा मैय्याच्या विशाल पात्राचे दर्शन डोळ्यांना सुखावत होते. खिडकीतून येणारा शीतल वाऱ्याचा झोत तोंडावर झेलत प्रवास चालू होता. पण मन मात्र प्राचीन मगधचा फेरफटका मारायला भूतकाळात धावत होते.


माझ्या डोळ्यासमोर मगध महाजनपदाचा इतिहास तरळला. इसवी सनाच्या पूर्वी ६ व्या शतकात महावीर जैन आणि गौतम बुद्ध इथे प्रवचने देण्यासाठी फिरले. इसवी सनाच्या पूर्वी ४ थ्या शतकात ग्रीक राजदूत मेगास्थेनेस भारताचा अभ्यास करण्यासाठी याच भूमीत फिरला. त्याच्यानंतर सहस्र वर्षांनी चीनचा शवान झांग आणि इत्सिंगने मगधची यात्रा केली. इथल्या नालंदा विद्यापीठात जपान, कोरिया, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया येथून हजारो विद्यार्थी शिकायला येत असत. आज मी त्या वैभवशाली साम्राज्याचे भग्नावशेष पाहात फिरणार होतो.

पटना, अर्थात पाटलीपुत्र! इसवी सनाच्या पूर्वी ४ थ्या शतकातील चंद्रगुप्त मौर्यची राजधानी. गंधार (Kandahar), बाल्हिक (Balkh) पासून बंगालपर्यंत आणि काश्मिरपासून तामिळनाडूपर्यंतच्या भूभागाची राजधानी. इसवी सनाच्या ४ थ्या शतकातील चंद्रगुप्त
गुप्तची राजधानी.


माझा पहिला पाडाव होता – कुम्हरार येथे. थेट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवाड्यात! मेगास्थेनेसने वर्णन केलेली ८० खांब असलेली भव्य सभा इथे होती. ही सभा पाहून त्याला पर्शियाची राजधानी पर्सिपोलीस मधील राजवाडे आठवले होते. आज त्या राजसभेचे घासून गुळगुळीत केलेले ३० फूट उंच खांब पाहायला मिळतात.

इथून जवळच एका आरोग्य विहाराचे अवशेष आहेत. हे चंद्रगुप्त गुप्तच्या काळातील रुग्णालय आहे. अनेक खोल्या असलेले या आरोग्य विहारावरील शिलालेखात ‘धन्वंतरी’ या आयुर्वेदाच्या देवतेचे स्मरण केलेले दिसते.

कुम्हरार येथील आरोग्य विहार


येथील संग्रहालयात आपणही घेऊन खेळवीत, अशी गुप्त काळातील सुबक खेळणी पाहिली. मातीच्या गुळगुळीत गोट्या, छोटे छोटे पक्षी, प्राणी आणि चाकाच्या गाड्या! चेहेऱ्यावर निरागस भाव असलेली एक लहानशी मातीची पुतळी, कोणा कन्येची बाहुली होती का? असा विचार करत कुम्हरार सोडले.तिथून कुंडलपूरला गुप्त कालीन सूर्यमंदिरात, सूर्याचे दर्शन घेतले. मग वर्धमान महावीराच्या जन्मस्थळी आलो. या मंदिरात भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील २४ तीर्थांकारांची लहान लहान मंदिरे आहेत. वर्धामानच्या आईला त्रिशलेला पडलेले स्वप्न, ती झोपलेली जागा इथे दाखवली जाते. त्यानंतर पावपुरीला महावीर जैनाने देह ठेवला ती जागा सुद्धा पहिली. महावीराचा भाऊ नंदिवर्धनने येथे एक मंदिर बांधले होते. तळ्याच्या मधोमध उभारलेले स्वच्छ, शांत आणि सुंदर मंदिर.

पुढे मी महावीराच्या गावाहून बुद्धाच्या गावी बोध गयेला आलो. इथे अनेक सुंदर बौद्ध मंदिरे आहेत. अक्षरश: हजारो स्तूप आहेत. भारतीय लोक इथे फारसे दिसत नाहीत. पण आग्नेय आशियातून आलेले बौद्ध भिक्षू इथे साधना करतांना पाहिले. इथल्या बोधी वृक्षाखाली संथ लयीत मंत्र म्हणणारे, ध्यान करणारे साधक पाहून मीही अंतर्मुख झालो.

त्यानंतर माझा मोर्चा वळला – नालंदाच्या बौद्ध विद्यापीठाच्या अवशेषांकडे. या विद्यापीठातील अनेक दालने, भव्य वर्ग, विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्तूप, येथील underground, covered drainage system सर्वच त्याकाळातील वैभवाचे प्रतीक आहे. भारतातूनच नाही तर परदेशातून देखील इथे हजारो विद्यार्थी येत असत. इंडोनेशियाच्या शैलेंद्र राजाने तिथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, नालंदामध्ये एक विहार बांधवले होते. १३ व्या शतकाच्या सुरुवातीला बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळले तेंव्हा इथेली लाखो हस्तलिखिते भस्मसात झाली होती.

नालंदाच्या वर्गात


नालंदा मधील आणखी एक आकर्षण आहे शवान झांगचे स्मारक. जे भारत आणि चीनच्या सरकारने एकत्र येऊन बांधले आहे.


XuanZang Museum, Nalanda


माझा शेवटचा पाडाव होता – राजगिर! पाटलीपुत्रच्या आधी शेकडो वर्ष ही मगधाची राजधानी होती. महाभारतातील जरासंधाची राजधानी, बिम्बिसार आणि अजातशत्रूची राजधानी. बिम्बिसारने बुद्धाला दिलेला वेणूवन विहार, जरासंधाचा आखाडा, बिम्बिसारचा तुरुंग, अजातशत्रूने बांधलेला स्तूप आदि स्थानके पाहात पाहत संध्याकाळ होऊन गेली. भूतकाळातून पुन्हा वर्तमानात यायची वेळ झाली होती.
 
राजगिर येथील गुहा


गेले तीन चार दिवस आधाशासारखे पाटण्याच्या परिसरात फिरलो होतो. गुप्त काळातील सोन्याच्या नाण्यांची श्रीमंती, मौर्यांची मध्य आशियापर्यंत पोहोचलेली सत्ता, मातीच्या पुतळीतील सौंदर्य आणि बौद्ध विहारातील शांततेची शिदोरी बरोबर बांधून मी पुनश्च पुण्याकडे निघालो.


- गिरीश परदेशी
- दीपाली पाटवदकर
(शब्दांकन)