वृद्ध रुग्णांना ‘दिलासा’ देणारा आधुनिक पुंडलिक
महा एमटीबी   12-Apr-2018
 
 

 
‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’ ही उक्ती नित्यनेमाने जगणारे, ती आपल्या जगण्यातून इतरांना प्रेरणा देणारे सतीश जगताप. ‘दिलासा’च्या माध्यमातून त्यांनी केलेले समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
 
’’धकाधकीचा मामला, कोण पुसे अशक्ताला?’’ असे संत रामदास म्हणतात. अशक्त तर सोडाच, जे वृद्ध आणि विकलांग आहेत, अंथरुणाला खिळलेले आहेत, त्यांना सांभाळणे हे अगदी मातापित्यांची सेवा करणार्‍या चांगल्या मुला-मुलींनादेखील कठीण जाते. अशा स्थितीत नाशिकच्या सिडको वसाहतीत एक आधुनिक पुंडलिक कार्यरत आहे. सतीश शिवाजी जगताप हे त्यांचे नाव असून, ते व त्यांची पत्नी उज्ज्वला दोघेही मिळून ’दिलासा केअर सेंटर’ चालवितात. त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील अकलूज. सर्वसामान्य कुटुंबातील जगताप यांनी आज नाशिकमध्ये व्याधिग्रस्त अशा ७० जणांचे पालकत्व स्वीकारले. त्यातून सुधारणा झालेले शेकडो जण पुन्हा आपापल्या कुटुंबांत रमले आहेत. तब्येत व्यवस्थित झालेल्या रुग्णांना नातेवाईकांनी परत घरी नेणे आणि नवीन रुग्णांना ’दिलासा’मध्येच दाखल करण्याचे हे चक्र सातत्याने सुरू असते. अशा या ’दिलासा’मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथील व्याधिग्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्यांचा मुक्काम असतो. १९९८ मध्ये पुण्यातील आयबीएमसारख्या प्रसिद्ध कंपनीत सतीश जगताप अभियंता म्हणून कार्यरत होते. कंपनीतील आपल्या एका महिला सहकार्‍यास कामावर येण्यास रोजच उशीर होत असे. याची खातरजमा करण्यासाठी गेले असता पलंगावर अर्धांगवायूने जर्जर वडील, तर दुसर्‍या पलंगावर अस्थिभंगामुळे अंथरुणाला खिळलेली आई असे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य त्यांना पाहायला मिळाले. त्यांचे सर्व काही आवरूनच कंपनीत येणे जमत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे विचारचक्र सुरु झाले.
 
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी नोकरीच्या दीड वर्षांतच आयबीएममधील गलेलठ्ठ पगाराच्या या नोकरीला व्याधिग्रस्तांच्या सेवेसाठी तिलांजली देण्याची हिंमत जगताप यांनी दाखविली. सन २००० मध्ये पुण्यातील एका छोट्या बंगल्यात एका बेवारस रुग्णाला दिलासा देण्यापासून, जगताप यांनी समाजकार्यास सुरुवात केली. २००२ मध्ये नाशिक येथे सर्वप्रथम गंगापूररोड आणि त्यानंतर पाथर्डी फाटा परिसरात त्यांनी मुक्काम हलविला. नंतर डॉ. अजित भामरे त्यांच्या मदतीला धावून आले. २००९-१० मध्ये सिडकोतील पारिजात हॉस्पिटलच्या जागेत, दोन मजल्यांचा वापर करण्यास त्यांनी जगताप यांना सांगितले. त्या वेळी रुग्णांची संख्या २० ते २२ पर्यंत मर्यादित होती. तोपर्यंत संस्थेची नोंदणी झालेली नसल्याने मदतीसाठी पुढे येणार्‍यांनाही पेच पडत असे. २०११ मध्ये ’दिलासा’ प्रतिष्ठान संचलित ’दिलासा केअर सेंटर’ अशी संस्थेची नोंदणी झाल्यावर एक मोठी समस्या दूर झाली. पुढे जगताप यांचे कार्य पाहून, भामरे यांनी त्यांना रुग्णालयाचा तिसरा मजलाही वापरण्यास परवानगी दिली. मध्यवर्ती बस स्थानकापासून संस्था सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेमार्गे येणार्‍यांसाठी नाशिकरोड स्थानक, तसेच सीबीएसपासून राणाप्रताप चौक, विजयनगर ही शहर बससेवा उपलब्ध आहे. या बसने राणाप्रताप चौकात उतरल्यावर अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर संस्था आहे.
 
सध्या ’दिलासा’ मध्ये महिलांची संख्या अधिक आहे. हा सेवेचा व्याप सांभाळण्यासाठी त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही समाजकार्यात झोकून देणारी पत्नी उज्ज्वलासह आई मंगला जगताप, शैलेंद्र चव्हाण, पल्लवी चव्हाण, सुनील महाडिक, वनिता महाडिक ही जवळची मंडळी लाभली. शिवाय, जो मोबदला मिळेल त्यावर समाधान मानत अहोरात्र कार्यरत राहणारे १५ कर्मचार्‍यांचे सहकार्यही मोलाचे ठरले आहे.
 
वयवर्षे ३८ ते ४० असलेल्या तीन जणांचा अपवाद वगळता ’दिलासा’मधील इतर सर्व रुग्ण सत्तरी ओलांडलेले आहेत. त्यात शंभरी ओलांडलेल्या एका आजीबाईंचाही समावेश आहे. संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या आसपास असतो. यापैकी सुमारे ५० टक्के रक्कम रुग्णांचे नातेवाईक देणगी स्वरुपात देतात, २० टक्के रुग्णांचे नातेवाईक झालेल्या खर्चापैकी काही वाटा उचलतात, तर ३० टक्के रुग्णांना पूर्णतः विनामूल्य सेवा दिली जाते. ही रक्कम सेवाभावी संस्थांच्या मदतीतून मिळते, अशी माहिती उज्ज्वला जगताप यांनी दिली. संस्थेस शासकीय अनुदान नसताना ’नाशिक रन’, ’नसती उठाठेव’, ’कालिका माता ट्रस्ट’, ’मिडास टच’, ’इनरव्हील क्लब’, ’लायन्स क्लब’ यांसारख्या संस्था, ’अल्कॉन’, ’मायलॉन’, ’वासन टोयोटा’, ’महिंद्रा’ या कंपन्यांकडून विविध स्वरूपात मिळणार्‍या मदतीमुळे आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते. २००९ मध्ये व्याधिग्रस्त पत्नीस ‘दिलासा’मध्ये दाखल केल्यानंतर पुन्हा कधीही चौकशी न करणारा पती असो किंवा बर्‍या झालेल्या आई-वडिलांना घरी परत घेऊन जाताना मुलांच्या डोळ्यांमध्ये तरळणारे अश्रू असोत किंवा आपल्या नातेवाईकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावर ‘‘आम्हाला वेळ नाही. तुम्हीच पुढील सर्व व्यवस्था पाहून घ्या,’’ असा सल्ला देणारे असोत, अशा मानवी प्रवृत्तींचे दर्शन येथे होते. पण, तरीही ही रुग्णसेवा अविरतपणे सुरु आहे.
 
 
 
 
- पद्माकर देशपांडे