एकाजनार्दनी दत्त | वसे माझ्या हृदयांत।।
महा एमटीबी   12-Apr-2018
 

 
 
जनार्दन स्वामी हे थोर दत्तोपासक होते. यवन राजवटीमध्ये राहून ते आपली दत्तभक्ती करत होते. देवगिरीवर ते मोठ्या पदावर काम करत होते. त्यांचे नित्याचे आन्हिक, श्रीगुरुचरित्र पारायण, नामस्मरण यामध्ये कधी खंड पडला नाही. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, हीन लोकांशी संबंध यांमधून त्यांनी मार्ग काढला. ते दत्ताच्या शक्तिस्थानी, अंकलखोप, नृसिंह वाडी, औदुंबर, कुरवपूर येथे दर्शनाला जात असत. महत्त्वाचे म्हणजे अंकलखोप या दत्तस्थानी प्रत्यक्ष दत्तांनी त्यांना अनुग्रह दिला.
 
’दुर्गातीर्थ’ आणि ’श्रीगोरक्षगुहा’ ही प्रमुख दत्तस्थाने समस्त भक्तांना सुखावणारी आहेत. देवगिरीच्या जवळ पाच-सहा मैलांच्या भागात ’सुलभोंजन’ शिखराच्या सपाटीवर शिवमंदिर आहे. इथेच ’सूर्यकुंड’ नावाचे तळे आहे. याच भागात ‘सहस्रलिंग’ म्हणून एक स्थान आहे. अत्यंत गर्द झाडी व एकांत असलेल्या रम्य स्थानी जनार्दन स्वामी दत्तध्यानासाठी येत असत. या प्रभावी स्थानी जनार्दन स्वामींना दत्तप्रभूंचा अलौकिक साक्षात्कार झाला. दत्तावधूतांचा कलियुगातील पहिला शिष्य म्हणजे जनार्दन स्वामी असे संत एकनाथ महाराज म्हणतात. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी अनुग्रह देऊन शक्तिसंपन्न केले. जनार्दन स्वामींच्या दत्तसाक्षात्काराचे मोठे भावपूर्ण वर्णन एकनाथांनी आपल्या भागवतामध्ये केले आहे-
 
 
’कर्म करुनि अकर्ता|
तोचि अकर्तात्मबोधुजाला देता|
देही असोनि विदेहता| तेहि तत्त्वता आकळिली|
गृस्थाश्रमु न सांडिता| कर्मरेखा नोलांडतां| निजव्यापारीं वर्ततां| बोध सर्वथा न मैळे।।
तो बोधु आकळितां मना| मन मुकलें मनपणा|
अवस्था नावरेची जनार्दना| मूर्छापन्न पडियेला।।
त्यासी सावध करुनि तत्त्वता| म्हणे प्रेमा राहे सत्त्वावस्था।।
तोही गिळोनि सर्वथा| होई वर्तता निजबोधे।।
पूजाविधी करोनियां| तंव जनार्दनु लागला पायां|
तंव अदृश्य जाला दत्तात्रेया| योगमायेचेनि योगें।।
 
देहात असून विदेही अवस्था, कर्म करुनही अकर्ता राहण्याचा बोध, भगवान दत्तात्रेयांनी केला. मनाला बोध, आकलन झाल्याबरोबर मन ‘न-मन’ होऊन गेले. शक्तीमुळे जनार्दन स्वामी मूर्च्छित झाले, तेव्हा मोठ्या प्रेमाने दत्तप्रभूंनी त्यांना सावध करुन, निजबोधाचे अमृत प्रदान केले. शक्तिसंपन्न झालेल्या जनार्दन स्वामींनी आपली शक्ती सत्‌शिष्य एकनाथांना दिली. जनार्दन स्वामींचे नैष्ठिक आचरण आणि दत्तभक्तीचा प्रभाव यवनसत्तेवर पडला होता. त्यामुळे देवगिरीच्या आसपास शुक्रवार हा सुटीचा दिवस बदलून, दत्तात्रेयांचा गुरुवार या दिवशी सुटी दिली जात असे. ही अभूतपूर्व घटना घडविणारे जनार्दन स्वामी श्रेष्ठ दत्तभक्त होते, हे यावरुन लक्षात येते. दत्तात्रेयांच्या भक्तीचे तेजोवलय त्यांच्या जीवनाभोवती होते. त्यांचे सत्‌शिष्य एकनाथ महाराज हे आपल्या सद्गुरुंच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करत. त्यांनी दत्तभक्तीचा प्रसार, भागवतावर प्राकृत भाषेत टीका लिहून, सामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे अमूल्य कार्य केले. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा वसला असल्याने, भेद न करता सगळ्यांशी स्नेहमय वर्तन करण्याचा संदेश, त्यांनी आचरणामधून दिला. समाजप्रबोधन, समाजमनाचे परिवर्तन करणारे एकनाथ महाराज आपल्या सद्गुरुंप्रती ऐक्यभाव, आदरभाव ठेवणारे आदर्श शिष्य होते.
 
जनार्दन स्वामी दत्तप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचा सर्वोच्च आदर्श प्रस्थापित करणारे होते. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून, प्रपंचामध्ये राहून, उच्चकोटीचा परमार्थ करणारे एकनाथ महाराज हे एकमेव होते. जनार्दन स्वामींच्या कृपेने जागृत झालेला एकनाथांच्या दत्तभक्तीचा धागा अतूट होता.
 
 
धन्य गुरु जनार्दन| स्वानंदाचे जे निधान।।
जनार्दन स्वामींची महती वर्णन करणार्‍या या ओळी आहेत. ते म्हणतात-
जनार्दनाचा गुरु| स्वामी दत्तात्रय दातारु।।
त्यांनी उपकार केला| स्वानंदाचा बोध दिला।। सत्वित्सुखाचा अनुभव| दाखवला स्वयमेव।।
एकाजनार्दनी दत्त| वसे माझ्या हृदयांत।।
भगवान दत्तात्रेय हे जनार्दन स्वामींचे गुरु आहेत. जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु. अशी प्रभावी परंपरा असल्याचं कथन ते करतात. त्यामुळे दत्तप्रभू माझ्या हृदयात नित्य वास करत असल्याचा अनुभव एकनाथ महाराज सांगतात.
 
भरला| ओतप्रोत स्वामी माझा देवदत्त|
दत्त सबाह्य अंतरी| दत्तात्रेय चराचरी|
अशा वृत्तीने त्यांच्या दत्तभक्तीस बहर आला. त्यांना आपल्या सद्गुरुंच्या कृपेच्या अखंड वर्षावाने दत्तप्रभूचे वारंवार दर्शन घडले. एकनाथांनी दत्तात्रेयांचे स्मरण करावे आणि लगेच दत्तप्रभूंनी प्रकट व्हावे असे सुंदर नाते जडले.
 
जनार्दन स्वामी, त्यांचे एकनिष्ठ शिष्य एकनाथ महाराज आणि दत्तात्रेय, दत्तभक्ती, दत्तात्रेयांशी संवाद असा अलौकिक, अद्भुत संबंध प्रस्थापित झालेला होता. दत्तभक्तांना मार्गदर्शक ठरणारे गुरु जनार्दन, शिष्य एकनाथ याचे चरित्र अलौकिक आहे. ‘एकाजनार्दनी’ अशी नाममुद्रा लावणारे, गुरुंशी एकरुप झालेले शिष्य एकनाथ महाराज. योगीराज दत्तात्रेय एकदा का प्रसन्न झाले की, ते भक्तांवर कृपेचा अमृत कुंभ रिता करतातच. म्हणून कलियुगात दत्तभक्ती आणि दत्तदैवत शीघ्रफल देणारे आहे.
 
 
 
- कौमुदी गोडबोले