राहुलजी माफी मागा डॉ. सुरेश हावरे यांची मागणी
महा एमटीबी   11-Apr-2018 

 
 
शिर्डी : रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या पत्नीच्या कंपनीने सुरुवातीला फक्त एक लाख रुपयांची गुंतवणूक केली व त्यानंतर १० वर्षात कंपनीने ३० कोटी रु. कमावल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, काँग्रेस एवढ्यावरच थांबली नाही तर त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी या प्रकरणात शिर्डीतील साईबाबांना यामध्ये आणत ‘शिर्डीच्या चमत्कारांची तर काही सीमा नाही,’ असे ट्विट केले. ज्या प्रकरणाशी शिर्डीचा, साईबाबांचा कोणताही संबंध नाही, त्याचे नाव राहुल गांधींनी घेतल्याने आता वादाला तोंड फुटले आहे. त्यावर शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली आहे. डॉ. हावरे यांनी राहुल गांधींना ट्वीटरवर उत्तर देत म्हटले की, “राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीचे नाव घेणे खूपच दुःखद आहे. यामुळे देश-विदेशातील साईभक्तांच्या श्रद्धेला ठेस पोहोचली असून सर्व साईभक्तांकडून आम्ही याचा निषेध करतो,’’ असे म्हणत राहुल गांधी यांनी, “या अपमानासाठी साईभक्तांची माफी मागितली पाहिजे,’’ अशी मागणी डॉ. सुरेश हावरे यांनी केली आहे.
 
 

दरम्यान, राहुल गांधींनी राजकीय आरोपबाजीसाठी शिर्डीसारख्या धार्मिकदृष्ट्या पवित्र आणि लाखो लोकांच्या श्रद्धास्थानाचा वापर केल्याने साईभक्तांमध्येही संतापाचे वातावरण आहे. सोशल मिडीयावर राहुल गांधींच्या या ट्विप्पणीवर टीका करण्यात येत त्यांची खिल्लीही उडवली जाते आहे.