सर्व गोष्टींना मीच जबाबदार : मार्क झुकेरबर्ग
महा एमटीबी   11-Apr-2018


वॉशिंग्टन डीसी : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आज पुन्हा एकदा डेटा लीक प्रकरणी आपली चूक कबूल केली आहे. फेसबुक मी निर्माण केले आहे, तसेच त्याचे संपूर्ण कार्य देखील मीच पाहतो. त्यामुळे फेसबुकसंबंधी सध्या जे काय झाले आहे. त्याला मीच जबाबदार आहे' अशी कबुली त्याने दिली आहे.

फेसबुक डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या सिनेट ज्यूडीशिअरी आणि कॉमर्स कमिटीने मार्क झुकेरबर्ग चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी म्हणून मार्क आज या कमिटीसमोर हजर झाला होता. यावेळी कॉमर्स कमिटीचे संचालक सेन जॉन थ्यून यांनी फेसबुक डेटा लीक प्रकरणी मार्कची चांगलीच कानउघडणी केली. 'मार्क यांनी तयार केलेल्या फेसबुकने अनेक नागरिकांना नवी स्वप्ने दाखवली आहेत. त्यांच्या कार्याकडून अनेकांनी प्रेरणा देखील घेतली आहे. मार्क यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी फेसबुकला आपली गोपनीय माहिती देखील पुरवली आहे. त्यामुळे या नागरिकांची माहिती गोपिनीय ठेवण्याची एक मोठी जबाबदारी मार्क यांच्यावर येते. परंतु यामध्ये मार्क हे अयशस्वी झाल्यास याला दोषी कोण ?' असा सवाल थ्यून यांनी उपस्थित केला.

यावर मार्कने आपली बाजू मांडत, फेसबुकवर लावण्यात आलेल्या आरोपांचा स्वीकार केला. तसेच 'फेसबुकची सुरुवात मी केली. त्याचे संपूर्ण कार्य देखील मीच पाहतो. त्यामुळे सध्या जे काही घडले आहे. त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे. फेसबुकचा डेटा लीक होऊ नये, यासाठी काही गोष्टींची तरतूद करणे गरजेचे होते. परंतु ते मी करू शकलो नाही. त्यामुळे या घटनेची सर्व जबाबदारी मी स्वीकारतो' असे मार्कने म्हटले. याच बरोबर फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून नागरिक जे काही संदेश एकमेकांना पाठवतात, ते फेसबुक कधीही तपासत अथवा पहात नाही, अशी देखील त्याने यावेळी सांगितले. कमिटीसमोर कबुली जबाब देत असताना तो अत्यंत भावूक देखील झाला होता.गेल्या महिन्यामध्ये फेसबुकचा डेटा लीक झाला असल्याची माहिती इंग्लंडमधील एका संस्थेनी जाहीर केली होती. या बातमीनंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर मार्कने स्वतः देखील आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच या चुकीसाठी माफी मागितली मागून यापुढे असे होणार नाही, अशी कबुली दिली होती. परंतु यानंतर २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या वेळी देखील फेसबुक डेटाची चोरी केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने मार्क चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.