भारत हा भविष्यातील ऊर्जा क्षेत्राचा केंद्रबिंदू : मोदी
महा एमटीबी   11-Apr-2018

भारतीय ऊर्जा क्षेत्राची प्रतिवर्षी ४.५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली :
'भारतीय ऊर्जा वाढ ही अत्यंत वेगाने होत असून येत्या २५ वर्षांमध्ये भारत हा जागतिक ऊर्जा क्षेत्राचा मुख्य केंद्रबिंदू असेल' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला आहे. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेच्या १६ व्या बैठकीला आजपासून प्रारंभ झाला आहे. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते.

'भारत सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये ऊर्जा क्षेत्राची वाढ, तिची स्थिरता आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली जात आहे. यामुळे भारतीय ऊर्जा क्षेत्र हे प्रत्येक वर्षी ४.५ टक्क्यांच्या विकास दराने प्रगती करत आहे. त्यामुळे येत्या २५ वर्षांमध्ये भारत हा जगातील सवत मोठा ऊर्जा निर्मिती करणारा तसेच ऊर्जेचा पुरवठा करणारा देश बनेल' असे त्यांनी यावेळी म्हटले.

याचबरोबर जगात आजही असे अनेक देश आहेत, ज्यांना ऊर्जा क्षेत्रात प्रगती करायची आहे. परंतु काही अडचणींमुळे त्यांना आपला विकास करता येत नाही. त्यामुळे सर्व अशा देशांनी एकत्र येऊन ऊर्जा क्षेत्राच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.