भारत आणि स्वझीलँडमध्ये दोन करार
महा एमटीबी   10-Apr-2018

इतिहासात पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रपती स्वझीलँडच्या दौऱ्यावरमंबाबने :
आफ्रिका खंडातील एक छोटासा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वझीलँडबरोबर भारत सरकारने दोन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आरोग्य आणि व्हिसा या दोन विभागांशी निगडीत हे दोन करार असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि स्वझीलँडचे राजे तिसरे मश्वती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

तीन आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती कोविंद हे काल आपल्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यासाठी स्वझीलँड येथे पोहोचले. यावेळी स्वझीलँड सरकारकडून औपचारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर राजे मश्वती यांनी कोविंद यांची आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेमध्ये भारत आणि स्वझीलँड यांच्यात नव्याने सुरु होणाऱ्या मैत्रीपर्वावर त्यांनी चर्चा केली. तसेच स्वझीलँडमध्ये आरोग्य सेवा पुरवण्यासंबंधी आणि स्वझीलँडच्या अधिकारी, नेत्यांना भारतात येण्यासाठी मिळणाऱ्या व्हिसाच्या अटी शिथिल करण्यासंबंधी नेत्यांनी चर्चा केली व यावर करार केले.

विशेष म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रपती हे स्वझीलँडच्या दौऱ्यावर गेले आहेत. कोविंद यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि स्वझीलँड यांच्यात नवे मैत्रीपर्व सुरु झाले आहे. आपल्या आफ्रिकन देशांच्या दौऱ्यामधील दुसरा टप्पा कोविंद यांनी यशस्वीपणे पूर्ण केला असून पुढील दौऱ्यासाठी आता ते झांबियाकडे रवाना होणार आहेत.