होमिओपॅथिक औषधी वनस्पती
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
 
धर्मार्थकाममोक्षणां आरोग्यं मूलमुत्तमम् |’ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे की, आरोग्य हे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. या सुभाषितावरून ‘आरोग्य’ माणसाच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. आरोग्यच नसेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही.
 
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातच नव्हे तर जवळ जवळ संपूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात ‘चिकुन-गुनिया’ या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. साथीचे आजार हे इतर कुठल्याही आजारांपेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे असतात. कारण, अशा आजारांमुळे संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच, वेळीच अशा आजारांवर प्रतिबंध घालणे महत्त्चाचे ठरते. होमिओपॅथी उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, व्यक्तीनुसार या उपचार पद्धतीमध्ये औषध बदलत असते. प्रत्येक औषधाची लक्षणे वेगवेगळी असतात. म्हणूनच योग्यवेळी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे फार महत्त्वाचे ठरते. याची जनसामान्यांना थोड्याफार प्रमाणात कल्पना यासाठी तसेच या आजारावर साधारणपणे वापरल्या जाणार्‍या औषधांची माहिती खालीलप्रमाणे देत आहोत.
 
  
 
युपेटोरियम पर्फोलिएटम  :  डॉ. हॅनिमन यांनी ‘बोरसेट’ नावाच्या वनस्पतीच्या मूलार्कापासून या औषधाचे सिद्धीकरण केलेले असून या औषधाचे प्रभावी कार्य मलेरिया (चरश्ररीळर), इनफ्लुएंझा (खपषर्श्रीशपीर) या आजारांवर दिसून आले आहे. या औषधाची मुख्य लक्षणे म्हणजे - हाडांमधील वेदना, सकाळी वाजणारी थंडी व त्याबरोबर अंग ठणकणे, ज्वर, ज्वरात व थंडीत तहान लागणे, रूग्णास चक्कर येणे, हातापायात मुख्यत्त्वे मलेरियानंतर वेदना निर्माण होणे, पाठ, हात-पाय, टाचा, स्नायू व हाडांमध्ये असह्य वेदना होणे इ. सांधेदुखीवर तसेच मलेरियाच्या ज्वरामध्ये हे औषध खूप गुणकारी ठरले आहे. ब्रायोनियाच्या ज्वरातील व युपेटोरियमच्या ज्वरातील प्रमुख फरक असा की, ब्रायोनियाच्या ज्वरात खूप घाम येतो, असह्य वेदनांमुळे रूग्ण शांत पडून राहतो, तर युपेटोरियमच्या ज्वरात घाम कमी असतो व वेदनांमुळे रूग्णास अस्वस्थता जाणवते.
 
 
 
जल्सेमियम् :  डॉ. डब्ल्यू. ई. पेने यांनी ‘यलो जॅस्मीन’ नावाच्या वनस्पतीच्या मूलार्कापासून या औषधाची निर्मिती केली आहे. स्वमित स्वरुपाच्या विकारामध्ये या औषधाचे कार्य दिसून येते. थंडी बाधल्यामुळे होणार्‍या सर्दी-पडसे, ताप व डोकेदुखीसाठी हे औषध उपयोगी पडते. स्नायूंमध्ये शैशिल्य आल्यामुळे ते अकार्यक्षम होणे, पाठीच्या कण्यातून थंडी वाजण्यास सुरुवात होणे नंतर ताप भरणे इ. लक्षणांमध्ये हे एक प्रभावी औषध आहे. या औषधाची मुख्य लक्षणे म्हणजे - डोकेदुखी. डोकेदुखीची सुरुवात डोक्याच्या मागच्या भागातून होते, डोकेदुखीबरोबर चक्कर, अंधारी, सुस्ती इ. लक्षणेही आढळतात. थंडी, ताप, थकवा त्याचबरोबर स्नायूत वेदना होतात, तीव्र डोकेदुखीनंतर ताप भरतो, जल्सेमियम् हे औषध किंग ऑफ पोलिओ म्हणून ओळखले जाते.
 
 
 
र्‍हस टॉक्स :  पॉयझन ओक नावाच्या वनस्पतीच्या मूलार्कापासून या औषधाची निर्मित्ती होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनिमन यांनी केली. गर्भपात, डेंग्यू, अतिसार, त्वचेवर पुरळ येणे, रक्त दूषित होणे, डोळ्याच्या तसेच कानाच्या तक्रारी, निद्रानाश, अस्वस्थता इ. विकारांवर हे औषध खूप उपयोगी आहे. अतिशय अस्वस्थता हे प्रमुख लक्षण या औषधात दिसून येते. या औषधाचे कार्यक्षेत्र अंतस्थ त्वचा, ग्रंथी, सांधे, स्नायू, स्नायूबंधने इ.वर मुख्यत्त्वे आढळून येते. या औषधाची मुख्य लक्षणे - स्नायूवर ताण पडणे, संधीवात, स्नायू मुरगळणे, अतिशय अस्वस्थ वाटणे, स्नायू ताठरणे अशी आहेत. रूग्णास रात्री खूप भीती वाटते, डोकेदुखीबरोबर चक्कर हे लक्षण आढळते. श्वास घेण्यास कष्ट पडतात. सर्व प्रकारच्या तापामध्ये या औषधाचे प्रभावी कार्य दिसून येते. टाईफाईड, इन्फ्युएंझा, डेंग्यू इ. सारख्या ज्वरात या औषधाचा उपयोग होतो.
 
 
 
ब्रायोनिया :  या औषधांचे प्रभावी परिणाम गोवर, आंत्रज्वर, डोकेदुखी, संधीवात, ज्वर इ.वर आढळून येतात. सर्व प्रकारच्या तापामध्ये याचा चांगला उपयोग होतो. न्यूमोनियाच्या प्रारंभावस्थेत प्रामुख्याने याचा चांगला उपयोग होतो. व्हाईट ब्रायोनिया या वनस्पतीच्या मूलार्कापासून या औषधाचे सिद्धीकरण डॉ. हॅनिमन यांनी केले आहे. ब्रायोनियाचे कार्यक्षेत्र यकृत, श्वसनसंस्था, मेंदू व रक्ताभिसरण संस्था, पेशी तसेच शरीराची उजवी बाजू इ. सांगता येईल. सोरा या दोषापासून या औषधाच्या लक्षणांची उत्पती झालेली दिसून येते. प्रमुख लक्षणे - मानसिक तणावांमुळे होणारी डोकेदुखी, डोकेदुखीत फाडल्याप्रमाणे वेदना, त्याबरोबरच जिभेचा रंग पांढरा व तोंडाला कोरड असते, ताप, वेदनांमुळे रूग्ण हालचाल करीत नाही.
 
 
 
रुटा  : डॉ. हॅनिमन यांनी युरोपमधील ‘रूई’ नावाच्या वनस्पतीपासून या औषधाची निर्मिती केली आहे. अस्थी, अस्थिआवरण, सांधे हे या औषधाचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. डोळे, मूत्राशय, गर्भाशय व त्वचा यावर हे औषध प्रभावी काम करते. अस्थिभंग, संधीवात, गृध्रसी , हाडांचे विकार, मलबद्धता, मुकामार, गर्भाशय भ्रंश इ. विकारांवर अतिशय परिणामकारकरित्या हे औषध काम करते. प्रमुख लक्षणे - स्नायूंवर ताण पडणे, मुरगळणे, लचक भरणे अथवा स्नायू दुखणे, सांधा निखळणे इ. रूग्ण शारीरिक दृष्टीने खूपच अस्वस्थ असतो, हाडाला झालेल्या जखमेमुळे त्याची अनियमित वाढ होत असल्यास उपयोगी. मलबध्दता, शौचाचे वेळी आवेग असूनही मल बाहेर येत नाही. खूप कुंथावे लागते. त्यामुळे गुदाशयभ्रंश झाला असल्यास हे औषध त्यावर फार गुणकारी आहे. वेदनाशामक म्हणूनही या औषधाचा वापर केल्यास फायदा होतो, सांध्याच्या विकारात अर्निकानंतरनंतर आणि हाडांच्या जखमांतही उपयोगी ठरते. 
 
 
- डॉ. विवेकांनद जोशी