होमिओपॅथी औषधे घेताना घ्यावयाची काळजी
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
 
 
घेण्यास सोपी आणि कुठलीही साईडइफेक्ट्स न होणारी अशी ओळख सांगणारी औषधे म्हणजे ‘होमिओपॅथीची औषधे’. पण ही औषधे घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधांचा चांगला प्रभाव होण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे औषधांचा प्रभाव टिकून राहण्यासही मदत होईल.
 
हे जरूर करा
 
१) होमिओपॅथीची औषधे उघडी ठेवू नका. कोरड्या आणि थंड जागेतच ठेवा. औषधे घेतल्यानंतर बाटलीचे झाकण आठवणीने तातडीने बंद करा.
 
२) औषध घेताना त्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. बाटलीच्या झाकणातून सरळ तोंडात औषध घ्या. द्रव स्वरुपातले औषध असल्यास ड्रॉपरचा वापर करा. त्वचेच्या संपर्कामुळे होमिओपॅथी औषधांचा प्रभाव कमी होतो.
 
३) होमिओपॅथी औषधे घेण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीही खाणे किंवा पिणे टाळा. याला अपवाद फक्त साध्या पाण्याचा आहे. साध्या पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाचे सेवन करता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचे पथ्य आहे.
 
४) होमिओपॅथीच्या प्रभावी परिणामांसाठी धूम्रपान, दारु, तंबाखू यासारखी व्यसने दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय कुठल्याही मादक पदार्थांचे सेवन करू नका.
 
 
ही पथ्ये आवर्जून पाळा
 
 
होमिओपॅथी उपचार घेताना आहारात तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे श्रेयस्कर असल्याचे सांगितले जायचे. लसूण, आलं, कच्चे कांदे, कॉफी यासारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो. यामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो. काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाळल्यास या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही. यासंदर्भात आपल्या डॉक्टरकडून एकदा खात्री करून घ्या. होमिओपॅथी औषधे घेत असताना ऍलोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर टाळा. कुठलीही औषधे घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
 
औषधाची कार्यक्षमता सिध्द करण्याची पध्दत होमिओपॅथीमध्ये एकमेव आहे. कारण त्यामध्ये औषधांचा माणसांवर काय परिणाम होतो ते अभ्यासले जाते, बाकीच्या शास्त्रांप्रमाणे प्राण्यांवर होणारा परिणाम अभ्यासला जात नाही. व्यक्तीनिष्ठ लक्षणांना जास्त महत्त्व दिले जाते. वस्तुनिष्ठ लक्षणांना नव्हे. माणसांना त्यांच्या भावना व्यक्त करता येतात आणि ते बोलू शकतात. त्यामुळे औषधांचा त्याच्या मनावर झालेला परिणाम कळू शकतो. 
 
 
 
औषधाची उपयोगिता सिध्द करण्यास अनेक आठवडे लागतात. कारण तज्ज्ञांना रोजच्या रोज आढळणारी लक्षणे आणि त्यात होत जाणारा बदल लिहून ठेवावा लागतो. शरीरात होत जाणारे बदल आणि मानसिक बदल ज्याला कळतात अशा चिकित्सकाला उत्तम तज्ज्ञ समजले जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंघटना असणार्‍या व्यक्तींवर उपचार करुन बघितले जातात. ज्यामुळे व्यक्तीची स्वयंघटना कळू शकते. 
 
 
 
घेण्यास सोपी आणि कुठलीही साईडइफेक्ट्स न होणारी अशी ओळख सांगणारी औषधे म्हणजे होमिओपॅथीची औषधे. पण ही औषधे घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधांचा चांगला प्रभाव होण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे औषधांचा प्रभाव टिकून राहण्यासही मदत होईल.
 
 
- डॉ विवेक जोशी