होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
 
 

‘होमिओपॅथी’ या उपचार पध्दतीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांचा हा जीवन परिचय...
 
 अवघ्या २४ व्या वर्षी एम.डी.
 
डॉ. हॅनिमन १० ऑगस्ट १७७९ रोजी, वयाच्या अवघ्या अवघ्या २४ व्या वर्षी एम.डी.झाले आणि लगेच ड्रेस्डेड येथे त्यांची जनरल सर्जन म्हणून नेमणूक झाली. रिकाम्या वेळेत चांगल्या पुस्तकांची भाषांतरे करायची या अभ्यासातून त्यांनी रसायनशास्त्रात नवीन प्रक्रिया शोधून काढल्या. शास्त्रामध्ये लागणार्‍या भट्टीत अनेक सुधारणा त्यांनी सुचवल्या. १७८६ मध्ये त्यांनी ‘सोमल विषबाधा’ (झेळीेपळपस ईीशीळल) यावर स्वतंत्र पुस्तक लिहिले. निरनिराळ्या भाषेतील वेगवेगळ्या काळातील ३८९ लेखकांचे ८६१ आधार या पुस्तकात आहे असे ते महान पुस्तक आजही अभ्यासनीय आहे.
 
रुग्णांना मोफत औषधी, अनेक विषयांचा अभ्यास
 
 
होमिओपॅथीचा गुण आणि महत्त्व लोकांना पटू लागल्यामुळे हॅनिमन कित्येकदा रुग्णांना मोफत औषधी देत. समकालीन डॉक्टर मंडळींनी त्यांचा छळच केला. पुस्तकांची जाळपोळ, औषधांचा नाश, विद्यार्थीवर्गाला तुुरुंगाची कोठडी असे प्रकार केले. वैद्यकीय ज्ञानाशिवाय रसायन, ज्योतिष, भूगोल, कीटक इत्यादी अनेक विषयांचा त्यांचा जसा अभ्यास होता तसाच सर्व युरोपीय आणि पौर्वात्य भाषा त्यांना अवगत होत्या.
 
 
जर्मनीतील सक्सेनी या प्रांतात मेसिनी या गावी १० एप्रिल १७५५ रोजी डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्म झाला. या गावाला मायसेन नावानेेही संबोधले जाते. माईस नदीच्या काठी हे लहानसे खेडे होते. गावाचा परिसर निसर्गरम्य होता. गावात चिनी मातीची भांडी तयार करणारे लहान-मोठे कारखाने व कापड विक्रेते होते. डॉ. हॅनिमन यांच्या वडिलांची गावात एक कुशल चितारी, उत्तम चित्रकार अशी कीर्ती होती. गावात लहानशी शाळा होती. डॉ. मल्लर नावाचे शिक्षक होते. ते प्रत्येक मुलाला आपला मुलगा समजून शिकवायचे. अशा शिक्षकाच्या हाताखाली हॅनिमन यांचे शिक्षण सुरु होते. त्यांनी ग्रीक भाषा दुसर्‍या मुलांना शिकण्याची संधी दिली. शिक्षणात गोडी वाढत असतानाच त्यांच्या वडिलांना वाटायचे की, आपल्या मुलाने आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळावा, परंतु शिक्षकांनी तसे न होवू देता हॅनिमन यांना वयाच्या १६ व्या वर्षीच ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. त्या त्यांना चांगल्याच अवगत झाल्या. इ.स.१७७५ ला वयाच्या २०व्या वर्षी लीपाझीक येथे वैद्यकीय विद्यालयात शिक्षण घ्यायचे ठरले. पण घरची परिस्थिती गरिबीची होती. शिक्षणाचा खर्च जास्तच होता. थोडेफार पैसे घरून येत, त्यात खर्च भागत नव्हता. हॅनिमन दिवसा विद्यालयात जायचे आणि उरलेल्या वेळात खासगी शिकवण्या घेऊ लागले. 
 
 
 
रात्री पुस्तके वाचून चांगल्या पुस्तकांची जर्मनमध्ये भाषांतरे करू लागले. कविता लिहू लागले. वैद्यकशास्त्रातील स्टीडमनचे निबंध असलेले दोन खंड, काही उत्कृष्ट निबंध, बॅट यांचे फिजिक्सचे खंड यांचे जर्मन भाषेत भाषांतर करुन उदरनिर्वाह व शिक्षणाचा खर्च करु लागलेे. १७७७ ला हॅनिमन व्हिएन्ना येथे गेले. तेथे वैद्यकशास्त्राचे उच्च शिक्षण मिळावे, चांगले नावारुपाला यावे असे सारखे वाटे. त्यांना व्हिएन्ना येथे ग्रंथालयात नोकरी मिळाली. ते रिकाम्या वेळेत ग्रंथालयातील पुस्तके वाचायचे.
 
 
 
यावेळी त्यांनी ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, इटालियन, हिब्रू, सिरीआक, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन अशा अनेकविध भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॅनिमन एरलेन्जेन येथे गेले. तेथे ‘आझेपकाची कारणे व चिकित्सा’ हा निबंध लिहिला. 
 
 
 
वैद्यकीय व्यवसाय करीत असताना रुग्णांवर ऍलोपॅथी उपचार पध्दतीद्वारे औषधांचा अतिरेक होत आहे असे त्यांना वाटू लागले. रुग्ण बरा झाला पण कोणत्या औषधाने बरा झाला असेल, याचे उत्तर मिळत नव्हते. १७९० मध्ये डॉ.हॅनिमन लिपझीक येथे होते. विश्‍वविद्यालयात डॉ.कलेन यांच्या निघंटूचे पुस्तक होते. इंग्रजी भाषेतील अशा निघंटूचे जर्मन भाषांतर डॉ.हॅनिमन करीत होते. निघंटूच्या दुसर्‍या भागात सिंकोनाविषयी माहिती आहे. ती त्यांना गुढ वाटली. थंडी वाजून ताप येतो, अंगात सपाटून ताप भरतो. अशावेळी सिंकोना नावाची औषधी गुणकारी समजली जायची. सिंकोना तापावर प्रचारात होती. पण रोग का बरा होतो याचे स्पष्टीकरण होत नव्हते. त्यावर प्रयोग करण्याचे डॉ. हॅनिमन यांनी ठरविले. डॉ. हॅनिमन यांची प्रकृती ठणठणीत होती, तरी सुद्धा औषधाचे प्रयोग स्वत:वर करण्याचे त्यांनी ठरविले. निरोगी प्रकृती असताना सिंकोनाचे औषध स्वत: घेतले आणि मोठा चमत्कार झाला. डोके दुखणे, हातापायास मुंग्या येणे, नाडी मंद होणे, तहान, कमजोरी इत्यादी तक्रारी होवू लागल्या. तेव्हा त्यांनी औषध घेणे बंद केले. व्याधीतून हॅनिमन हळूहळू मुक्त झाले. असेच प्रयोग यांनी आपल्या निरोगी मित्रांवर केले. सर्वांचे उत्तर एकच येवू लागले. हा अनुभव सहा वर्षे प्रत्येक औषधांच्या बाबतीत सुरु होता. यात त्यांनी औेषध कोणते घेतले, किती प्रमाणात दिले, केव्हा, कशा परिस्थितीत घेतले. क्रमवार कोणकोणती लक्षणे कशी उद्भवली? याचे टिपण डॉ.हॅनिमन त्यांनी सविस्तरपणे केले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, सिंकोनामुळे एक प्रकारचा ताप येतो. मात्र असा ताप थंडी वाजून येणार्‍या तापास मारक आहे. अशी औषधे देवून होणार्‍या लक्षण निर्मितीस औषधीचे प्रत्ययन असे नाव त्यांनी दिले, आणि ‘समलक्षण चिकित्सा’ शोधून काढली. 
 
 
 
सन १७९५ ते १८१२ या काळात या नवीन समलक्षण चिकित्सा पद्धतीवर सखोल संशोधन करुन अनेक उत्तमोत्तम ग्रंथ लिहिले. व्यावसायिक स्पर्धेमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात जावे लागले. त्यापूर्वी १८१२ ते १८१३ या काळात लिपझीक येथे त्यांनी स्वत:चे विद्यालय सुुरु केले. त्यावेळी वैद्यकीय विद्यालयाच्या पदवीधरांनाच प्रवेश देण्यात आला. आठवड्यात दोन तास असे सहा महिने संपले की होमिओपॅथीचा विषय संपत असे. डॉ. हॅनिमन यांनीच स्वत:च्या पद्धतीस ‘होमिओपॅथी’ हे नाव दिले. यालाच मराठीत ‘समात्मपद्धती किंवा समचिकित्सा पध्दती’ म्हणतात. १८१३ मध्ये रशियातून नेपोलियनचे सैन्य माघारी आले. तेव्हा जर्मनीत टायफस नावाचा साथीचा रोग फैलावला. तेव्हा ब्रायोनिया व र्‍हसटॉक्स ही औषधे डॉ. हॅनिमन यांनी वापरली. सैनिक आणि अनेक देशबांधव ज्वरमुक्त झाले. डॉ.हॅनिमन यांनी निघंटूचे एकूण सहा खंड प्रसिद्ध केले. निघंटूत निरोगी मनुष्यावर होणार्‍या औषधीच्या लक्षणाचा समावेश केला आहे. १८२१ मध्ये कोथेन येथील ड्यूक आजारी होता. हरतर्‍हेचा उपचार करून प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे ड्यूकला डॉ. हॅनिमन यांचे औषध घ्यावेसे वाटले. होमिओपॅथिक औषधाने ड्यूकची प्रकृती सुधारली. परिणामी, डॉ. हॅनिमन यांची ‘राजवैद्य’ म्हणून नेमणूक झाली. त्यांनी पुन्हा लेखनाचे काम सुरू केले. ‘जीर्ण व्याधी’ या अपूर्व ग्रंथाचे प्रकाशन केले. सर्व जीर्ण व्याधींचे मूळ खरुज , उपदंश  आणि प्रमेह  यात आहे, अशी माहिती या ग्रंथात त्यांनी दिली आहे. २ जुलै १८४३ रोजी डॉ.हॅनिमन यांनी जगाचा निरोप घेतला पण होमिओपॅथीचे तत्त्वज्ञान जगापुढे ठेवून. डॉ. हॅनिमन यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने, अटळ निष्ठेने आणि लोकोपकाराच्या कर्तव्यबुद्धीने लोकनिंदेवर मात केली. होमिओपॅथीशास्त्राच्या या थोर जनकाला भावपूर्ण श्रध्दांजली !
 
 

-डॉ. राजेंद्र नीळकंठ पिंगळे