होमिओपॅथी - ग्रामीण भागात वरदान
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
होमिओपॅथी  :  ग्रामीण आरोग्यास वरदानच आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा यशस्वीपणे पेलण्याची ताकद होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये आहे. समृध्द भारत घडवायचा असेल, तर ग्रामीण आरोग्याकडे आपणास विशेष लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच होमिओपॅथी ही ग्रामीण आरोग्यास वरदानच आहे. याबाबत शंका नाही.
 
होमिओपॅथी उपचारपध्दती अलीकडच्या काही वर्षात भारतात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ जिल्हा, महानगर किंवा शहर या ठिकाणी असलेली ही पॅथी आता तालुका, गाव पातळीवर आणि छोट्या वस्तीतसुद्धा येऊन दाखल झालेली आहे. पूर्वी लोकांमध्ये व होमिओपॅथीक डॉक्टरांमध्ये असा गैरसमज होता की, होमिओपॅथीसाठी फक्त शहरी भागच अनुकूल आहे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. याचे सर्व श्रेय सर्वार्थाने ग्रामीण भागात होमिओपॅथी उपचार देणार्‍या डॉक्टरांना द्यावे लागेल.
 
 
आज ग्रामीण भागात मलेरिया, टॉयफाईड, कावीळ, खरुज, संधीवात, अपचन, मूतखडा, मानसिक आजार यासारखे अनेक आजार प्रामुख्याने आढळतात. या छोट्या-मोठ्या आजारांवर प्रत्येकवेळी शहरात जावून उपचार घेणे हे वेळ व पैसा दोन्ही दृष्टीने फार अवघड असते, अशा परिस्थितीत होमिओपॅथी एक उत्तम पर्याय ठरतो. 
 
 
 
होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या आजाराची सर्व लक्षणे सविस्तरपणे विचारली जातात. तसेच त्याचा स्वभाव, मानसिक स्थिती, आवडीनिवडी याचीसुद्धा बारकाईने माहिती घेतली जाते. या सर्व माहितीच्या आधारे योग्य होमिओपॅथिक औषधाची निवड केली जाते. हे औषध पूर्णपणे सुरक्षित असते. त्याचा कोणताही दुष्परिणाम हा रुग्णांवर होत नसतो. होमिओपॅथीक उपचार पध्दतीने आजार हा मुळासकट बरा होतो. त्यासाठी लागणारा खर्चही तुलनात्मकदृष्ट्या फार कमी असतो. बर्‍याचदा रुग्णांमध्ये असा गैरसमज असतो की, होमिओपॅथी फक्त जुनाट आजारांनाच बरे करते तेही हळूहळू. पण असे म्हणणे चुकीचे ठरते. ताप, सर्दी, दमा अशा अनेक आजारांना योग्य पध्दतीने उपचार दिल्यास रुग्णास तत्काळ फरक पडतो व महागडी ऍण्टीबायोटीक घेण्याची, ऍडमिट होण्याची गरज भासत नाही. होमिओपॅथी औषधे चवीने गोड असल्याने लहान मुलांसाठी जास्त सोयीची असतात. कारण, बर्‍याचदा कडू औषध घेण्यास लहान मुले सहसा तयार नसतात. याचा आपल्या सर्वांनाच अनुभव आहे. होमिओपॅथी उपचार चालू केल्याने रुग्णांची प्रतिकार शक्ती सुधारते. लहान मुलांचे वारंवार आजारी पडणे कमी होवून आरोग्य उत्तम राहते.
 
 
 
थोडक्यात होमिओपॅथी उपचार पद्धती ही ग्रामीण जीवनासाठी सुरक्षित, समूळ, दुष्परिणाम विरहित व स्वस्त अशी उपचारपद्धती आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा यशस्वीपणे पेलण्याची ताकद होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये आहे. समृध्द भारत घडवायचा असेल तर ग्रामीण आरोग्याकडे आपणास विशेष लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच होमिओपॅथी ही ग्रामीण आरोग्यास वरदानच आहे. याबाबत शंका नाही.
 
 
-डॉ. पुष्कर महाजन