लहान बाळापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांसाठी लाभदायी होमिओपॅथी
महा एमटीबी   10-Apr-2018
 
 
 
 
 
 
होमिओपॅथी उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून ते वद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेणे फार सोपे आहे. या उपचार पध्दतीचे वैशिष्ट्य म्हणजे चेतना शक्तीला (व्हायटल फोर्स) उत्तेजना दिली जाते. अशा या आधुनिक होमिओपॅथीचा प्रचार-प्रसार झाल्यामुळे त्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे.
 
 
भारतात होमिओपॅथीचे १८९ कॉलेज
 
भारतात सर्वप्रथम पश्‍चिम बंगालमधील कोलकाता येथे होमिओपॅथी उदयास आली. जगात सर्वात जास्त होमिओपॅथीक डॉक्टर भारतात आहेत. आज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने होमिओपॅथीचा राष्ट्रीय स्तरावर विकास झाला आहे. भारतात १८९ होमिओपॅथी कॉलेज आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ४६ कॉलेज आहेत. जवळपास ६० हजारपेक्षा जास्त नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर्स महाराष्ट्रात आहेत.
 
 
 
 

लक्षणास्वरुप सारखे होमिओपॅथी औषध 
 
सध्याच्या वैद्यकीय उपचार पद्धतींपैकी होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे. होमिओपॅथीबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर सोरा, सिफिलीस व सायकोसिस या तीन मायझम्सच्या (त्रिदोष) संतुलनात बिघाड होतो, तेव्हा आजार निर्माण होतो. त्यावेळी ‘समः समं शमयंती’ या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षणास्वरुप सारखे होमिओपॅथी औषध दिले जाते व औषधाने या तिनही मायझममध्ये समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समूळ नष्ट होतो.
 
 
वैद्यक शास्त्रातील अस्तित्त्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी आधुनिक आणि प्रभावी असे होमिओपॅथी हे एक शास्त्र होय. ज्याचा शोध डॉ. ख्रिश्‍चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांनी लावला. हे आधुनिक शास्त्र विकसित करताना डॉ. हॅनिमन यांना फार कष्ट पुरले. सुरुवातीला सहाकार्‍यांच्या त्रासामुळे त्यांना स्वतःचे घरदार सोडावे लागले. यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला तरीही जिद्द व चिकाटीने रुग्णांचा अभ्यास करीत, स्वतःवर व मित्रांवर प्रयोग करीत त्यांनी विविध होमिओपॅथी औषधे शोधून काढली आणि १७९६ साली होमिओपॅथी जगासमोर आणली. त्यांनी होमिओपॅथीवर ३० पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले. होमिओपॅथीच्या गुणकारी औषधांमुळे रुग्ण मुळापासून बरे होऊ लागले. यामुळे इतर डॉक्टरही होमिओपॅथीचा अभ्यास करू लागले आणि होमिओपॅथीचा प्रचार-प्रसार होऊ लागला. काही वर्षातच डॉ. केंट, डॉ. बोरीक, डॉ. एलेन यांनीसुद्धा होमिओपॅथीचे ग्रंथ लिहिले व हळू-हळू होमिओपॅथी संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली. होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णाच्या मनावर कोण-कोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण त्या घटनेचा कसा विचार करतो? यासारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात. होमिओपॅथी ही कमी वेळात रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या-त्या आजारावर अवलंबून असतो. (उदा. थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालवता येतो. परंतु गंभीर आजार जीर्ण झाल्यावर, आजाराचा गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास हा गुंता सोडवण्यास थोडा वेळ लागतो.) होमिओपॅथी चिकित्सेत आज टॉन्सीलायटीस, ऍपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मूळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रक्रिया न करता बरे केले जातात. आजार परत उद्भवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून ते वद्धांपर्यंत सर्वांना, सर्व आजारांवर औषध घेणे फार सोपे आहे. या उपचार पध्दतीचे वैशिष्ट्य म्हणजे चेतना शक्तीला (व्हायटल फोर्स) उत्तेजना दिली जाते. अशा या आधुनिक होमिओपॅथीचा प्रचार-प्रसार झाल्यामुळे त्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे. आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत. रुग्णांना संजीवनी देणारी होमिओपॅथी व होमिओपॅथीच्या महान जनकास त्रिवार वंदन !
 
 
- डॉ. नरेंद्र सोनार