चिह्न निमित्त – निमित्त चिह्न
महा एमटीबी   10-Apr-2018


परिचय आणि लेखकाचे मनोगत...!!


चिह्न संस्कृती - चिह्न संकेत - चिह्नार्थ या विषयाच्या गेल्या दहा वर्षांच्या अभ्यासातून एका पुस्तकाचे लिखाण करतो आहे, त्या पुस्तकाचे हे शीर्षक “चिह्न निमित्त – निमित्त चिह्न”. वरच्या तीन मराठी शब्दांना, इंग्लिश भाषेतील Symbol, Symbolism & Allegories ही तीन नामे समानार्थी आहेत. मराठी भाषेत, या विषयावर फार सखोल अभ्यासाने लिखाण झालेले नसावे. हा विषय अनेकविध पैलुनी, असंख्य ठिकाणी अनुभवता आला, विशेषकरून असंख्य इंग्लिश पुस्तकांमधे वाचता आला आणि मग या पुस्तकाचे लिखाण सिद्ध होत राहिले. महा MTB च्या जाणकार आणि रसिक वाचकांसाठी हे अप्रकाशित पुस्तक साप्ताहिक लेखमालेच्या स्वरूपात सादर केले जाईल.

प्राचीन भारतीय संस्कृत साहित्य निर्मितीमधे विज्ञान, तत्त्वज्ञान, बुद्धिकौशल्य, वास्तव, विश्वाची निर्मिती, अंकशास्त्र - गणित, भूमिती, भाषा आणि लिपी, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, युद्धशास्त्र, भाषाशास्त्र, न्यायशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत, मूर्तिकला, शिल्पकला वास्तुशास्त्र, आणि अर्थातच राजकारण - मुत्सद्देगिरी अशा विविध विषयांच्या प्राथमिक मुलभूत मांडणीमधे आणि मौखिक ज्ञान साधना, आवर्तन, अध्यापन आणि लिखित साहित्य निर्मितीमधे अशी चिह्ने, चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ निश्चितपणे वापरले गेले ज्याचा अभ्यास आजही आपण करू शकतो. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांच्या साहित्यात, पर्यायाने सर्व संत साहित्यात अनुभवता येणारे चिह्न आणि चिह्नसंकेत विलक्षण प्रभावी आहेत. तत्कालीन समाजाला, जो रूढ अर्थाने शिक्षित नव्हता, तरीही चाणाक्ष व्यवहाराची साक्षरता असलेल्या या समाजाला ते चिह्नसंकेत समजले, पोहोचले आणि पटले सुद्धा आणि तो समाज श्रद्धा - भक्ति आणि राष्ट्रनिष्ठेने सर्वसंपन्न झाला.

श्रीलंकेत जन्माला आलेले तमिळ विद्वान श्री आनंद के कुमारस्वामी हे फार नावाजलेले आंतरराष्ट्रीय शिल्पकला अभ्यासक -समीक्षक. भारतीय शिल्पकला, मूर्तिकला, रंगावली कला यावर त्यांनी फार मोठे संशोधन आणि लिखाण केले. ‘Dancing with Shiva’ हे त्यांचे शतकापूर्वी लिहिलेले नटराजाच्या प्रतिमेच्या अनेक मुद्रांवरचे पुस्तक फार गाजले. “symbolism is ‘an art of thinking in images’, an art now lost to civilized Man, notably in the last three hundred years, symbols certainly being instrument of unfolding allegories”. हे कुमारस्वामींचे वाक्य मला नेहेमीच मार्गदर्शक ठरले.

शतकांपूर्वीच्या कोल्हटकर - खाडीलकर - देवल यांच्या नाट्यसंहिता, आधुनिक काळातील विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर या मान्यवर लेखकांच्या मराठी नाट्यसंहिता आणि साहित्य, गिरीश कर्नाड यांच्या नाट्यसंहिता. जी ए कुलकर्णी यांचे साहित्य, कवी ग्रेस यांच्या कविता यामधे, वर उल्लेख केलेली अशी लेखी साहित्य किंवा संहितेतील चिह्न आहेत. मराठी बरोबरच इंग्लिश साहित्यातील "वन फ्ल्यू ओव्हऱ ककूज नेस्ट " ही अतिशय गाजलेली कादंबरी आणि अनेक सन्मान प्राप्त चित्रपट, " क्रॉनिकल्स ऑफ नार्निया " ही कादंबरी आणि चित्रपट आणि जे के रोलिंग लिखित कादंबरीतील “हॅरी पॉटर" ही व्यक्तिरेखा हे सगळे साहित्यातील चिह्नांचे आणि त्यातून अभिप्रेत होणाऱ्या अमूर्त संकल्पनांचे जनक आहेत.

सॅम्युएल बेकेट या नामवंत फ्रेंच नाटककाराचे जगप्रसिध्द नाटक ‘वेटिंग फोर गोदो’. या नाटकाचे वैशिष्ट्य असे की, यातील अमूर्त संकल्पनेसाठी, हे नाटक त्याकाळात खूप गाजले. राजकीय, सामाजिक, धार्मिक दृष्टीकोनातून या नाटकाचे असंख्य जाणकार समीक्षकांनी मोजता येणार नाही इतक्यावेळा विश्लेषण केले.

लिखित गद्य भाषेत असो. बोली भाषेत अथवा काव्यात असो – गेयता असलेल्या संगीतबद्ध निरुपणात असो. नाटक संहितेत असो, मूर्तिकला (आयकॉनोलॉजी) अथवा शिल्पकला, चित्रकला (फाइन आर्ट) आणि सादरीकरणाच्या कला (परफॉरमिंग आर्ट).  आणि चित्रपटात असो. चिह्न संस्कृतीचा प्रभाव सर्वत्र दिसत रहातो. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकांत पंडित विष्णू शर्मा यांनी लिहिलेले संस्कृत भाषेतील मूळ भारतिय पंचतंत्र. हेच पंचतंत्र अरबस्थानातून फिरून आले आणि इसापनीति या नावाने आपल्यावर लादले गेले. या बरोबरच भारतीय साहित्य समृद्ध करणाऱ्या संस्कृत आणि अन्य प्रादेशिक भाषांतील सिंहासन बत्तिशी, वेताळ पंचविशी, हितोपदेश, तेनालीराम, मुल्ला दोप्याजा आणि बिरबलाच्या गोष्टींमधे, बोलणारे प्राणी-पक्षी आणि चतूर-हुशार किंवा निर्बुद्ध व्यक्तीच्या संवादातून असे स्पष्ट–अस्पष्ट चिह्नसंकेत आपल्याला मिळत रहातात. लोकसाहित्यातिल, लोकसंस्कृतीतिल लोकश्रुती-लोकोक्ती अथवा म्हणी आणि वाक्प्रचार यातील चिह्नसंकेत सुद्धा समाजातील प्रचलित श्रद्धा-अंधश्रद्धा-लोकभ्रम-विश्वास-मानसिकता आणि रूढी-परंपरांचा परिचय करून देतात.

या बरोबरच पुरातन भारतीय वास्तुशास्त्र – पुरातत्वविद्या यातील संशोधन, प्राचीन भारतिय कमान कलेची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे आणि त्यातील मूर्तीकला, प्राचीन गुंफा आणि त्यातील चित्रकला-शिल्पकला, यासह इजिप्त मधील पिरॅमिड आणि इजिप्शियन संस्कृतीतील मांजर-कुत्रा-मगर-गेंडा आणि आयबीस पक्षी या संदर्भातील आख्यायिका आणि चिह्न आणि चिह्नसंकेत आणि अनेक प्राचीन संघटनांचे इतिहास अभ्यासले तर काही हजार वर्षांपासून आदिमानवाच्या आणि कालपरत्वे प्रगत मानवी इतिहासातील चिह्नसंकेतांचा मागोवा घेता येतो.

अशा या रंजक विषयातील अभ्यास आणि संशोधन यावर आधारित ही नियोजित लेखमाला, आपल्या वाचनासाठी. रुचले - पटले - आवडले तर आणि रुचले नाही तरीही प्रतिक्रिया अवश्य द्यावी, जी नम्रपणे स्वीकारली जाईल.


- अरुण दिनकर फडके