पेशवा साम्राज्य - भाग -१
महा एमटीबी   01-Apr-2018शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांकडे त्यांनी राज्यकारभाराची निरनिराळी कामे सोपवली. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे अधिकारीपद म्हणजे पेशवे.

इसवी सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यावर मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौमराज्याचा जयघोष झाला. राज्याभिषेक झाल्यावर महाराजांनी ‘छत्रपती’ हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौमव सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांकडे त्यांनी राज्यकारभाराची निरनिराळी कामे सोपवली. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे अधिकारीपद म्हणजे पेशवे. पेशवे हे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख मंत्री असत. शिवरायांनी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना पेशवे म्हणून नेमले. शिवरायांनी पेशवेपदाचे पंतप्रधानअसे नामकरण केले. मराठा साम्राज्याच्या उत्तरार्धात हेच पेशवे साम्राज्याचे प्रशासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.

खरेतर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण, पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर प्रचंड पराक्रम गाजवल्यामुळे जनसामान्यांनी त्यांना ’श्रीमंत’ हा किताब बहाल केला आणि जवळपास १०४ वर्ष त्यांनी आपल्या पराक्रमाने तो टिकवला. मुघलांच्या आक्रमणाने आणि आपापसातल्या संघर्षाने कमकुवत झालेल्या मराठा साम्राज्याला बळकटी आणण्याचं कामबाळाजी विश्वनाथ यांनी केलं. छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत त्यांनी गृहयुद्धे शांत केली. मुघलांना पराभूत करून साम्राज्य समृद्ध केलं.

पेशव्यांच्या क्रमवारीनुसार सातवे तथा पेशवे राजगादीचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा जन्मइ.स. १६६२च्या आसपास श्रीवर्धन नामक गावात एका चित्पावन ब्राह्मण घरात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट होते. पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर ते पेशवा बाळाजी विश्वनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे पूर्वज श्रीवर्धन गावात देशमुख होते. सुरुवातीला त्यांनी चिपळूणला कारकूनाचे कामकेले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठा सेनापतींच्या नेतृत्वाखाली सैनिकाचे कार्यही केले. छत्रपती संभाजींच्या कारकीर्दीत त्यांनी मराठा साम्राज्यात प्रवेश केला. तेथे त्यांचे प्रमुख कार्य रामचंद्रपंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकार्‍याचे होते.

 

 

१६९९ ते १७०२ मध्ये पुणे येथे तर १७०४ ते १७०७ दरम्यान दौलताबाद येथे उपसुभेदार म्हणून त्यांनी काम पाहिले. म्हणजेच केवळ प्रशासकीय कामच नव्हे, तर लष्करी मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग आणि पुढाकार असे. ते दूरदर्शी होते. छत्रपती शाहू महाराज जेव्हा मुघलांच्या कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात आले, तेव्हा मराठ्यांमधले आपापसातले वाद विकोपाला गेले होते. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या समर्थकांत संघर्षाची ठिणगी पेटली. ताराबाई यांनी धनाजी जाधव यांनी शाहूंवर आक्रमण करण्यास पाठवले. पण बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्देगिरीने धनाजींना शाहूंच्या बाजूने वळवले. बाळाजी विश्वनाथांच्या या कामगिरीमुळेच शाहूंनी त्यांना आपला साहाय्यक नेमले. १७२३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली. पेशवेपद आताच्या वर्तमानकाळातील पंतप्रधानांसारखेच होते. शाहूराजे सिंहासनावर बसत, मात्र युद्धासाठी बाळाजी विश्वनाथ सैन्यासह मोहिमेवर जात असत. बाळाजींनी कोल्हापूरात महाराणी ताराबाईंच्या सैन्यास हरवले आणि कोल्हापूरही शाहूंच्या नेतृत्वाखाली आले. १७१९ मध्ये शाहूंच्या नेतृत्वाखाली बाळाजींनी मुघल सम्राटाबरोबर एक करार केला, ज्यानुसार मुघल शाहूंना शिवरायांचे स्वराज्यातील काही प्रदेश परत करतील, दक्षिणेत मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखीचे अधिकार मिळतील, ज्याच्या बदल्यात मराठ्यांची १५ हजार सैनिकांची तुकडी मुघल सम्राटाच्या संरक्षणाकरिता तैनात असेल आणि शाहू मुघल सम्राटाला १ लाख रुपये कर उत्पन्न देतील, असे ठरले. सैनिक तैनात करून मराठ्यांना मुघल साम्राज्यात प्रत्यक्ष शिरता आले.

 
बाळाजींनी मुघल सम्राटाकडून शाहूंच्या छत्रपतीपदास अधिकृत मान्यता मिळवली. बाळाजींची दूरदृष्टी येथे कामी आली. इ.स. १७२० मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. पण, त्याआधी त्यांनी शाहू महाराजांची तसेच मराठा साम्राज्याची स्थिती बळकट केली. त्यांच्या निष्ठेचे, प्रामाणिकपणाचे फलित म्हणून शाहू महाराजांनी पेशवेपद त्यांच्या घराण्यासाठी वंशपरंपरागत केले. म्हणजेच यापुढचे मराठा साम्राज्याचे पेशवे केवळ बाळाजी विश्वनाथ यांच्याच वंशातील असतील, अशी ही योजना होती.बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमहमिका लागली. त्यात बाळाजी यांचा थोरला पुत्र बाजीराव यांना परंपरागत पेशवेपद देऊ नये, असे दरबार्‍यांचे म्हणणे होते, कारण बाजीराव हा मुत्सद्देगिरीपेक्षा समशेरीला जास्त महत्त्व देणारा योद्धा होता. तो आपल्याला भारी पडेल, ही भीती बाळगून शाहूमहाराजांनी त्याला पेशवेपद देऊ नये म्हणून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही झाला. पण, शाहूमहाराजांच्या पडत्या काळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजी यांनी त्यांची विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे साहजिकच त्यांचा बाजीरावांवर स्नेह होता. सरतेशेवटी त्यांनी पेशवाईची वस्त्रे थोरले बाजीराव म्हणजेच पहिला बाजीराव यांस दिली. १७२० मध्ये कोवळ्या वयात पेशवेपदाची सूत्रे थोरल्या बाजीरावांनी हाती घेतली. मात्र, आपल्या उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपल्या शौर्याने व कुशल युद्धनेतृत्वाने मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. शत्रूला गाफील ठेऊन वेगवान हालचाल हे त्यांचे प्रभावी हत्यार. हा त्यांच्या युद्धकौशल्याचा एक महत्त्वाचा भाग होता.

रश्मी मर्चंडे