ट्रम्प घेणार किम जोंग उनची भेट
 महा एमटीबी  09-Mar-2018

उत्तर कोरियाकडून चर्चेसाठी अमेरिकेला निमंत्रण
वॉशिंग्टन :
उत्तर कोरिया आणि अमेरिका याच्या गेल्या २ वर्षांपासून सुरु असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही देशांमधील तणाव नष्ट व्हावा व चर्चेतून यावर मार्ग काढावा, यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला चर्चेसाठी निमंत्रण दिले असून अमेरिकेने देखील उत्तर कोरियाच्या या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग इ योंग यांनी आज या विषयी माहिती दिली आहे. उत्तर कोरियाकडून अमेरिकाला चर्चेचे आमंत्रण आले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या मे महिन्यामध्ये ट्रम्प हे किम जोंग उनची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु स्थळ आणि भेटीचा नेमका दिवस मात्र अद्याप अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

तसेच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे किम जोंग उनने यापुढे उत्तर कोरिया कसल्याची प्रकारची अणु चाचणी अथवा क्षेपणास्त्र चाचणी घेणार नाही, असे आश्वासन देखील दिले आहे, असे चुंग यांनी सांगितले आहे. तसेच ट्रम्प यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून किमने चर्चे निमंत्रण दिले असून यापुढे कसल्याची प्रकारची क्षेपणास्त्र चाचणी घेणार नसल्याचे कबुल केले आहे. तसेच उत्तर कोरियाचे हे पाऊल सकरात्मक असून याचा सर्व जगाला फायदा होईल, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.


गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये कमालीची तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या, तर अमेरिकेने कोरियन सागरामध्ये आपल्या युद्ध नौका देखील सज्ज केल्या होत्या. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या दोन्ही देशांकडे लागले होते. परंतु दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेमुळे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात चर्चा झाली व या तणावावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात पुन्हा एकदा नवे संबंध प्रस्थापित होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.