गेल्या ८ वर्षात वाढल्या १९ हजार संघ शाखा
 महा एमटीबी  09-Mar-2018

 
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये दर वर्षी काही प्रमाणात वाढ होत असते, यावर्षी देखील त्यात भर पडली आहे. याचसोबत गेल्या ८ वर्षांचा तपशील पाहिल्यावर लक्षात येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल १९ हजार ५९ एवढ्या शाखांची वाढ झाली आहे. सध्या ५८ हजार ९५७ शाखा देशभरात सुरु आहेत, ही आकडेवारी संघाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
 
 
२०११ साली ३९ हजार ९०८ संघ शाखा देशभरात कार्यरत होत्या, तर २०१८ साली ५८ हजार ९५७ शाखा विद्यमान स्थितीत सुरु आहेत. गेल्या ८ वर्षात तब्बल ४७% वाढ संघाच्या शाखांमध्ये झाली आहे, त्याचबरोबर देशातील नवीन १० हजार ठिकाणी संघाचा संपर्क वाढला असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. यातून नागरिकांचा संघात येण्याचा कौल अजून देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवते.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नागपूर येथे सुरु आहे. यात सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी वार्षिक प्रतिवेदन सादर केले. यामध्ये वर्षभरात संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये २०१७-१८ मध्ये झालेल्या संघ शिक्षा वर्गांची तसेच त्यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या संख्येची आकडवारी सादर करण्यात आली. तसेच यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्षभरात झालेल्या दौऱ्यांविषयी माहिती देण्यात आली.