गोष्ट ’देव्हाऱ्यातील देवतेची’
 महा एमटीबी  09-Mar-2018


“स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे, तिचा उपमर्द कुणी करु धजेल तर कुणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही.” - शिवछत्रपतींचा हा आदेश म्हणजे स्थल-काल आणि परिस्थिती निरपेक्ष स्त्री विषयक भारतीय दृष्टिकोनच जणू. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी सुमारे तीनेकशे वर्षं परकीय आक्रमकांनी इथल्या माय-बहिणींवर कुठलेच अत्याचार करायचे शिल्लक ठेवले नव्हते. त्यापेक्षाही वाईट म्हणजे तत्कालीन समाजानेही हे वास्तव स्वीकारले होते. पण आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात आणि पस्तीस वर्षांच्या कारकीर्दीत महाराजांनी स्त्री-प्रतिष्ठेबाबत असा काही दरारा निर्माण केला की आज इतक्या वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांचे नाव समस्त स्त्री वर्गास आश्वासक तर दुष्कर्म्यांना भयावह वाटते. अशा पुण्यश्लोक राजाचे आपण वारस आहोत इतके जरी सर्वांनी स्मरणात ठेवले तरी महिलेचा सन्मान काय असतो, हे वेगळे शिकवावे लागणार नाही. छत्रपती शिवरायांना जर आम्ही ’आमचे राजे’ म्हणत असू तर वरील दोन वाक्ये म्हणजे आपल्यासाठी अपरिवर्तनीय अशी ’राजाज्ञा’ आहे, जी आम्ही कायम हृदयावर कोरुन ठेवायला हवी.

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जनकल्याण रक्तपेढी आणि असे हजारो सेवाप्रकल्प भारत भरात सुरु केले त्या संघाने तर ’व्यक्ती’ म्हणून एकमेव आदर्श छत्रपती शिवरायांनाच मानलं आहे. स्वाभाविकच संघाचे कार्यकर्ते जे जे काम करतात त्या सर्व कामांमध्ये स्त्रीचे स्थान राजांनी म्हटल्याप्रमाणे ’देव्हाऱ्यातील देवते’ प्रमाणेच पवित्र असते. जनकल्याण रक्तपेढीमध्येदेखील ’महिला सन्मान आणि सुरक्षितता’ या बाबी कायमच अग्रक्रमाच्या राहिलेल्या आहेत. रक्तपेढीमध्ये तर महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे प्रारंभापासून लक्षणीय. शिवाय रक्तपेढी म्हटलं की चोवीस तासांचे काम आले, म्हणजे वेगवेगळ्या वेळांत काम करण्याशिवाय इलाज नाही. पण हे सर्व असले तरी इथल्या वातावरणात असुरक्षिततेचा मागमूसही नाही. रक्तपेढीचे विश्वस्त, संचालक, डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी वर्ग या सर्वांनीच इथल्या महिला कर्मचाऱ्यांची आपल्या माय-बहिणी-मुलींप्रमाणे काळजी घेतली आहे.

अलिकडेच ज्यांचे देहावसान झाले ते रक्तपेढीचे संस्थापक कै. वैद्य प. य. तथा दादा खडीवाले यांच्याबाबत एक हृदयद्रावक आठवण त्यांच्या श्रद्धांजली सभेतच एका मावशींनी सांगितली. अगदी सुरुवातीच्या काळात रक्तपेढी शनिवार पेठेतील दादांच्याच इमारतीत चालत असे. स्वाभाविकच स्वत: दादांचे रक्तपेढीतील सर्वांकडेच आपुलकीने लक्ष असे. पुढे, म्हणजे नव्वद-एक्क्याण्णव सालाच्या सुमारास स्वारगेटजवळची सध्याची जागा रक्तपेढीला मिळाली आणि बाकीचे सर्व सोपस्कार होऊन रक्तपेढी नव्या जागेत स्थलांतरित झाली. मुख्य प्रयोगशाळेचे स्थलांतर एका दिवसातच झाले. रक्तपेढीचे काम बंद न होता हे स्थलांतर करायचे होते त्यामुळे सर्वांचीच खूप धावपळ झाली. उपकरणादी वस्तु स्थानांतरित झाल्यानंतर सर्व मावश्या शेवटी दादांचा निरोप घेण्यास त्यांच्या जवळच असलेल्या औषध कारखान्यात गेल्या. एरवी सर्वत्र ’कडक’ म्हणून परिचित असलेले दादा यावेळी मात्र गहिवरले आणि मावश्यांना म्हणाले, ’मुलींनो, मला सोडुन निघालात होय गं. पण लक्षात ठेवा कधीही, कसलीही मदत लागली तरी तुमचा बाप इथे जिवंत आहे, हे विसरु नका.’ असे म्हणून, ’माहेराहून निघताना तोंड गोड केल्याशिवाय कुणी जायचं नाही’ हेही फ़र्मान त्यांनी काढले. सर्वांना साजुक तुपातील गरम गरम शिरा आग्रह करकरुन त्यांनी खाऊ घातला आणि मगच डोळे पुसत सर्वांना निरोप दिला. आपल्याकडे काम करणाऱ्या महिला कर्मचारी या आपल्या मुलीच आहेत, हा निर्व्याज भाव जपणाऱ्या पूर्वजांचा वारसा जनकल्याण रक्तपेढी अभिमानाने मिरवते आहे. स्वाभाविकच आपल्या स्वत:च्या घरात जशी सुरक्षितता मिळते तितक्याच सहजतेने ती जपली जावी असे वातावरण रक्तपेढीच्या विश्वस्त-संचालकादी मंडळींच्या इथल्या आश्वासक वावरामुळे इथे आपोआप तयार झाले आहे. एखादं रक्तदान शिबिर संपायला उशीर झाल्यास महिला कर्मचाऱ्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करणे असो किंवा रक्तपेढीत निवासी असणाऱ्या मुलींना केवळ रहायला जागा न देता त्यांच्यासाठी पालक म्हणून रक्तपेढीतीलच महिला डॉक्टरांची रितसर योजना असो, सुरक्षितता हा रक्तपेढीच्या दृष्टीने कायमच प्राधान्याचा विषय राहिलेला आहे.

सुरक्षिततेबरोबरच इथे काम करणाऱ्या स्त्रीस मोकळे अवकाश मिळाले पाहिजे, प्रगतीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठीदेखील व्यवस्थापन आग्रही असते. एक गमतीची घटना चांगली लक्षात राहिली आहे. एके वर्षी ’महिला दिना’निमित्त काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधी आम्हाला एकत्र बसायचं होतं. आता बसु, मग बसु असं करता करता काही दिवस गेले आणि शेवटी एके दिवशी आम्ही रक्तपेढी संचालक डॉ. कुलकर्णींना गाठलं आणि एकत्र बसण्याची वेळ ठरवली. महिला दिनाचा कार्यक्रम काय घ्यायचा, कसा घ्यायचा या विषयावर बोलण्यासाठी ठरलेल्या वेळेत मी, प्रशासकीय अधिकारी डॉ. आशुतोष काळे आणि जनसंपर्क अधिकारी संतोष अनगोळकर असे तिघेजण डॉ. कुलकर्णी यांच्या कक्षात गेलो. भेटीचा अजेंडा सांगितल्यावर डॉ. कुलकर्णींनी हसत हसत पहिलाच गुगली प्रश्न टाकला. ते म्हणाले, ’महिला दिनाचा कार्यक्रम ठरवायचाय ना ? मग तो ठरवायला काही महिलादेखील असाव्यात, असं नाही वाटत का तुम्हाला ?’ झालं. आम्ही तिघे सुन्न. अर्थात सुन्नतेचा हा अवकाश संपल्यावर मात्र आम्हाला स्वत:वरच हसु यायला लागले. ती बैठक अर्थातच झाली नाही. पुढे ’महिला-दिन कसा साजरा करायचा’ याबाबत महिला कर्मचाऱ्यांनीच एकत्र बसून निर्णय घेतले आणि तो कार्यक्रम यशस्वीदेखील करुन दाखवला. आमची भूमिका पडद्याआडचीच राहिली. अगदी साधी बाब होती. इतकी साधी, की ती आमच्या लक्षातही आली नव्हती. पण डॉ. कुलकर्णींच्या एकाच वाक्याने आम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. आपल्या नित्याच्या व्यवहारातही असं बऱ्याचदा होतं की घरातील महिलांबाबतचे निर्णयही पुरूषमंडळी परस्परच घेऊन टाकतात. हेतु वाईट नसतात, पण असं होतं खरं. या पार्श्वभूमीवर ’त्यांचा कार्यक्रम कसा घ्यायचा ते त्यांनाच ठरवु द्या, तुम्ही फ़क्त पाठीशी थांबा’ हा विचार खरोखरीच अभिनव होता, कालसुसंगत होता. व्यवहारातील स्त्री-स्वातंत्र्य काय असतं, याचं प्रात्यक्षिक आम्हाला पहायला मिळालं होतं.

वर म्हटल्याप्रमाणे रक्तपेढीत काम करणाऱ्या तंत्रज्ज्ञांमध्ये महिला तंत्रज्ज्ञांचीच संख्या अधिक आहे. या सर्वांनी रक्तपेढीमधील अद्ययावत अशा उपकरणांवर काम करणे शिकुन घ्यावे यासाठीही व्यवस्थापन आग्रही असते. ही उपकरणे महागडी आहेत, हे तर खरेच. पण त्यावर काम करणे शिकत असताना होऊ शकणारे नुकसान हा इथे कर्मचाऱ्यांच्या शिक्षणातला अडथळा कधीच बनला नाही. किंबहुना ’काय नुकसान व्हायचे ते होऊ द्या, पण शिकणे थांबवु नका’ असा अत्यंत आश्वासक दृष्टिकोन इथल्या तांत्रिक व्यवस्थापनाने ठेवला आहे. याखेरीज दैनंदिन कामाव्यतिरिक्तही भोंडला, संक्रांति, दिवाळी असे सणही पारंपारिक पद्धतीने आपल्या नित्याच्या धावपळीशी योग्य ताळमेळ साधत इथला महिला-वर्ग साजरे करतो आणि या प्रत्येक वेळी रक्तपेढी व्यवस्थापन या सर्वांच्या पाठीशी घरातील कर्त्यासारखं उभं असतं. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे कितीही काम पडलं, सणासुदीला यावं लागलं, किंवा अधिक वेळ काम करावं लागलं तरीदेखील ’जनकल्याण रक्तपेढी’चा महिलासंच कायम तत्पर राहिलेला आहे. ’जनकल्याण’शी नातं तुटु नये म्हणून लग्नानंतर अन्य गावी स्थायिक झालेल्या मुलीने आपल्या पतीचीच मनधरणी करुन त्याला पुण्यात येण्यास भाग पाडुन रक्तपेढीत केलेलं पुनरागमन असो किंवा रक्तपेढीतून निवृत्त झाल्यानंतरही ’सेवाव्रती’ या भूमिकेतून पुन्हा रक्तपेढीचेच काम करण्याचा एखाद्या ज्येष्ठ व्यवस्थापिकेचा निर्णय असो – याप्रकारच्या अनेक घटना इथे घडलेल्या आहेत. रक्तपेढीतील सुरक्षित आणि पोषक वातावरणावर या घटना जणु शिक्कामोर्तबच करतात. ’ही रक्तपेढी तर संघवाल्यांची दिसते, इथे आपल्यासारख्यांचा कसा काय निभाव लागणार’ असा प्रामाणिक संशय मनात घेऊन आलेले एका विशिष्ट सामाजिक वर्गातील तरुण मुलीचे पालक इथे प्रत्यक्ष भेट देऊन जाताना मात्र ’तू इथेच काम कर, कारण हीच जागा तुझ्यासाठी सर्वाधिक सुरक्षित आहे’ असा उपदेश स्वत:च्या मुलीला करुन गेल्याचीही घटना मागे इथे घडलेली आहे.

अर्थात असे आश्वस्त वातावरण निर्माण करण्यासाठी वेगळे काही ठरवून करावे लागते असे मुळीच नाही कारण स्त्री-प्रतिष्ठा ही ’जनकल्याण’च्या ’रक्तात’च आहे. आज रक्तपेढीतील जवळपास सर्वच भूमिकांत म्हणजे डॉक्टर, तंत्रज्ज्ञ, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ता, स्वागतक, अर्थविभाग कर्मचारी, मदतनीस आणि सेवाव्रती म्हणूनही महिला सक्षमपणे आणि मनापासून काम करत आहेत. रक्तपेढीव्दारा आयोजित कार्यक्रमांमध्येही रांगोळी – सूत्रसंचालनापासून ते समाजात रक्तपेढीची भूमिका समर्थपणे मांडण्यापर्यंत महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. रक्तपेढीचा तांत्रिक विभाग तर खऱ्या अर्थाने महिलांनीच पेलुन धरला आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या आज समाजात असलेल्या प्रतिष्ठेमागे या महिला-वर्गाचेही महत्वपूर्ण असे योगदान आहे.

स्त्री ही ’देव्हाऱ्यातील देवता’ आहे असे आपण खरेच मानीत असु तर या देवतेची प्रतिष्ठा जपायलाच हवी. ज्या घरातील स्त्री प्रसन्न असते ते घरही सदैव प्रसन्नच राहते आणि याउलट जिथे स्त्रीची घुसमट आहे त्या घराला सौख्य कधीही मिळु शकत नाही, हा तर सार्वत्रिक नियम आहे. जो नियम घरासाठी आहे, तो संस्थेसाठीही लागु आहेच. संघाच्या प्रेरणेतून सुरु झालेले जनकल्याण रक्तपेढीसारखे देशभरातील सुमारे दीडेक लाख सेवाप्रकल्प याबाबतीत शिवछत्रपतींची राजाज्ञा शिरोधार्य मानूनच काम करतात.

देव्हाऱ्यातील ही देवता समाजातील सर्व क्षेत्रांत सुप्रतिष्ठित होवो आणि तिच्या आशीर्वादाने सर्वांस चिरंतन सौख्याचे वरदान मिळो !!!
- महेंद्र वाघ