चिंतन करूया...
 महा एमटीबी  08-Mar-2018
 

नेमकी कशी सुरुवात करायची आणि कसं व्यक्त व्हायचं हे समजत नाहीय. पण, तरीही आजच्या या ’जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने काही सांगावंसं वाटतंय. आज जागतिक महिला दिन असल्यामुळे आम्हा तमाम महिलांना आज खास वागणूक दिली जाईल. सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा देणार्‍या संदेशाचा पाऊस पडेल. आज सर्वत्र स्त्री शक्तीचा सन्मान, आदर केला जाईल. तिचं अस्तित्व, कर्तृत्वाविषयी भरभरून कौतुक केलं जाईल. कुठे महिलांचे सत्कार, कुठे महिलांच्या विषयांवरचे व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्रे तर कुठे सेलिब्रेशन केलं जाईल. थोडक्यात काय आजचा दिवस केवळ आणि केवळ महिलांना समर्पित.
 
पण, आता तुम्ही लगेच म्हणाल, एक दिवस महिलांनी रोजच्या रूटीनमधून बाहेर पडून थोडीशी मज्जा-मस्ती केली तर बिघडलं कुठे? यात काहीचं चुकीचं नाही. पण, महिलांनी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या एकाच दिवसाची वाट का म्हणून बघायची? आजकाल ’महिला दिन’ हा एका उत्सवासारखा साजरा करण्याचा जणू काही ट्रेंडच आला आहे. आपण जर शोभेच्या बाहुल्या होऊन इतर उत्सवांसारखा साजरा करणार असू तर मग त्या महिला दिनातून नक्की काय साध्य होणार आहे? म्हणजे वर्षातून एकच दिवस महिला दिन म्हणून साजरा करायचा आणि मग बाकीच्या दिवसांचं काय? असा प्रश्न खरंतर पडला पाहिजे. अशाप्रकारे महिला दिन साजरा करून आपणच स्वतःची फसवणूक करत आहोत का? महिला दिनानिमित्ताने छान कपड्यांमध्ये फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकायचे, पार्टी करायची, फिरायला जायचे, चित्रपट पाहायचा असे प्लॅन केले जातात. मग दिवस संपला की, चला आपण ‘वूमन्स डे मस्त एन्जॉय केला,’ अशी आपण आपली समजूत घालतो. खरंच यातून काही साध्य करतो आहोत का? नटायला-थटायला, फोटो काढायला, जेवायला बाहेर जायला कारण कशाला पाहिजे याचा विचार करायला हवा. महिला दिनाच्या निमित्ताने अधिक रचनात्मक, सकारात्मक काही करता येईल का? खरंतर त्याचे पूर्वनियोजन हवे आणि हो, नुसता विचार करून फायदा नाही तर प्रत्यक्षात त्यावर कृतीसुद्धा होणे गरजेचं आहे. महिला दिन साजरा केल्यामुळे आपल्या परिस्थितीत काही चांगले बदल होणार आहेत का? आणि जर ते होत नसतील तर ते का होत नाहीत? याचं आत्मपरीक्षण करायला हवं. या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस मिळेल, त्याचवेळेस खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा होईल.
 
 
==============================================
 
 
अज्ञान करूया दूर..
आजच्या आधुनिक युगात स्त्रिया, महिला या समाजामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या जाचक परंपरा, बंधनापासून मुक्त झाल्या आहेत. असं असलं तरी आधुनिक काळात विकृत मानसिकतेमुळे महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी झालेलं नाही. हुंडाबळी, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन, घटस्फोट, गर्भलिंगनिदान अशा विविध कारणांवरून महिलांना मानसिक आणि शारीरिक छळाला अजूनही सामोरे जावे लागते. आज अन्याय झाला की न्याय मागण्यासाठी महिला या पुढे येत असल्या तरी काही न्यायालयीन प्रक्रिया, कायदा याच्याबाबतीत अनेक स्त्रिया अज्ञानी असल्याचे दिसून येते.
 
ही बाब लक्षात घेऊनच स्त्रियांचे हे अज्ञान दूर करण्यासाठी एक नवीन उपक्रम महिला दिनाच्या निमित्ताने राबविण्यात येणार आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने एक नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना तातडीने मदत आणि समुपदेशन केले जाणार आहे. पण, त्याचबरोबर महिलांशी संबंधित असलेले कायदे, न्यायालयीन प्रक्रिया याबाबत माहिती, तसेच मार्गदर्शन केलं जाणार आहे. स्त्रियांवर होणार्‍या निरनिराळ्या अत्याचारांपासून व कौटुंबिक हिंसाचारांपासून तिचे संरक्षण करण्यासाठी तसेच हक्क देण्यासाठी आजपर्यंत काही कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत. परंतु, त्याची माहिती नसल्याने अनेक स्त्रिया यापासून वंचित राहतात. याचबरोबर भारतीय संविधानाने व संसदेने देशातील प्रत्येक महिलेला सबला बनविण्यासाठी काही कायदे बनवलेले आहेत. त्याची जाणीव करून देण्यासाठी महिलांशी संबंधित अनेक खटले यशस्वीपणे लढणार्‍या ख्यातनाम वकील अॅड. इशिका तोला यांनी ’महिला दिना’च्या निमित्ताने विविध माध्यमातून महिलांना अनेक कायद्यांची माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तक्रार आणि विश्लेषण केंद्र स्थापन केले आहे.
 
एफआयआरची नोंदणी कशी करायची, अर्थसाहाय्य, परदेशस्थ विवाह यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये महिलांना मार्गदर्शन अशा सुविधा आयोगातर्फे पुरविल्या जात आहेत. तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी आयोगाने चौकशी समिती स्थापन केली असून या समितीद्वारे प्रत्यक्ष गुन्हा स्थळी चौकशी, साक्षीदारांचे परीक्षण, पुरावे गोळा करणे, शिफारशींनुसार अहवाल सादर करणे, पोलिसांतर्फे होणार्‍या चौकशीमध्ये समन्वय साधणे, कौटुंबिक वादविवादामध्ये मध्यस्थांची भूमिका निभावून सल्ला देणे इ. कार्य राष्ट्रीय महिला आयोग करत आहे.
 
 
 
- सोनाली रासकर