संतकृपाप्राप्त भाग्यशाली समाज
 महा एमटीबी  08-Mar-2018
 
 
समाजामध्ये सहकार्याची भावना असणं आवश्यक आहे. एकमेकांना मदत करणं, साहाय्य करण गरजेचं आहे. समाजात अनेक व्याधींनी ग्रस्त आणि त्यामुळे त्रस्त असणारी माणसं आहेत. त्यांच्या दुःखावर हळुवार फुंकर घालून, जगण्याच्या आशा पल्लवित करण्याला साहाय्य करणं म्हणतात. त्यांना शारीरिक, मानसिक आधार मिळाला की, ती उभी राहतात. जगण्याला बळ मिळालं की ती बलशाली होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणं आणि बघायला शिकवणं अगत्याचं आहे. काळाप्रमाणे समस्या, प्रश्न, दुःख, संकटं बदलत जातात, तरी मानवता मात्र बदलत नाही. बघ्याची भूमिका न घेता मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा प्रत्यय देणं यात बदल होत नाही.
 
कलियुगात समाजाला सहृदय, सात्विक, स्नेहमय वृत्तीची गरज आहे. कारण कलियुगात स्वार्थ, संकुचितपणा टोकाला पोहोचलेला आहे. पिळवणूक, शोषण करण्याची वाईट वृत्ती फोफावली आहे. वासना, विकार, विकृतीची वाळवी लागली आहे. अशा काळात समाजाला सांभाळण्यासाठी संत सामोरे येतात. वाईट वृत्तीचा विळखा पडलेल्या समाजाला हळुवार हाताने सोडवतात. सर्वत्र अंधःकार, अराजकता माजलेली असली तरी संत भगवंत भक्तीचा प्रकाश दाखवतात. लोकांना जवळ घेऊन समजावतात. संतांच कार्य सोपं नाही. समाजाला संत कळतच नाहीत. त्यांची विशाल वृत्ती आकलन होत नाही. त्यामुळे लोक संतांना खूप त्रास देतात. संत सहनशील राहून संयमाने समाजाला सांभाळतात, अपमान सहन करतात, छळदेखील सोसतात. त्यांच्या अंतःकरणात समाजाविषयी कामनारहित उच्च कोटीचा प्रेमभाव असतो.
 
माणसातला हरवलेला माणूस, माणुसकी मोठ्या प्रयत्नाने श्रमाने शोधून काढतात. प्रेमाचे आटलेले झरे पुनश्च झुळझुळत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. क्षमेची फुलं सदैव फुलत ठेवणारे संत महान असतात. कोणी कसंही वागलं तरी त्याला स्नेहाचं अमृत प्रदान करतात. प्रेमाने अवघं जग जिंकता येतं, हे आपल्या आचरणाद्वारे दाखवतात. संतांच्या संगतीचा सुपरिणाम हळूहळू समाजात झिरपत जातो. दुष्टपणा संपून प्रेमभाव निर्माण होतो, स्वार्थ विरत जातो, स्नेहभाव उत्पन्न होऊ लागतो, संकुचितपणा पातळ होऊ लागतो. दुसर्‍याचा विचार करण्याची वृत्ती तयार होत जाते.
 
संत समाजसेवेचा वसा घेऊन आलेले असतात. त्यांची कार्य दिखाऊ नसतात, फक्त दाखविण्यासाठी समाजसेवेचा दिखावा करणारी नसतात. भगवंताच्या भक्तीमधून समाजसेवेचा मार्ग गेल्यामुळे अंतःस्थ प्रेमभाव असतो. मानसिक आरोग्य उत्तमठेवणारे संत मानसशास्त्रज्ञ असतात. ते समाजाला सगुणाच्या उपासनेद्वारे भगवंताबद्दल प्रेमउत्पन्न करतात. सगुण पूजेला लागणारी फुलं फुलवण्यासाठी फुलझाडं, वेली यांची जोपासना करायला शिकवतात. त्यामधून झाडांशी फुलांशी जवळीक साधली जाते. झाडामधला सृजनाचा सुंदर आविष्कार बघून त्यामधून भगवंतांची किमया स्मरणात ठेवली जाते. भगवंताला स्नान घालण्यासाठी जलाची आवश्यकता असते. पूजेसाठी जलाच्या स्त्रोतापर्यंत संत पोहोचवतात. सरितेच्या पात्रामधील पवित्र जलपूजेला वापरण्यासाठी सरितेप्रती स्नेहभाव जागृत होतो. गंध ईश्वराला लावताना त्यामधील शीतलता मनाला स्पर्श करते.
 
ईश्वराला धूप, उदबत्ती लावून सुगंध दरवळताना माणसाच्या मनातील दुर्गंधी, विचार दूर जातात. निरांजनाने ओवाळून आरती करताना सृष्टीमधील तेज मनात प्रकाशमान होत जाते. त्याला फळांचा, पंचामृताचा नैवेद्य दाखवताना देवाचं अस्तित्व जाणवू लागतं. देवाला अर्पण केलेलं प्रसादरूप होऊन देवाचं श्रेष्ठत्व जाणवू लागतं. त्याला देऊन प्रसाद म्हणून ग्रहण करताना दुसर्‍याचा विचार, दुसर्‍याला देणं, दातृत्व प्रगट होत जातं. माणसाच्या मनाला सात्विकता, सदाचार प्रदान करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ईश्वराच्या पूजनामधून साध्य करणारे संतश्रेष्ठ असे समाजकार्य करणारे आहेत.
 
समाजशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र जाणणारे आणि रुजवणारे, फुलवणारे संत वंदनीय आहेत. ही तिन्ही शास्त्र हातात हात घालून एकोप्याने नांदली की, समाजाचं कल्याण होणार याची खात्री वाटते. उक्ती आणि कृती एकच असणार्‍या संतांच्या पावलावर पाऊल टाकून समाज वाटचाल करू लागला की तो सर्वांगाने फुलून, बहरून येतो. ध्यानामधून मनःशांती प्राप्त करण्याचा सुंदर मार्ग संत दाखवतात शांतपणाने फक्त श्वासावर लक्ष केंद्रित केलं की वैचारिक, मानसिक, अस्वस्थता, अशांती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे विवेक जागृत होतो. योग्य-अयोग्य विचार आणि आचारांची निवड अचूकपणाने करता येते. त्यामुळे भगवंताच्या उपासनेमधील सगुणाच्या पूजेबरोबर निर्गुणाकडे वाटचाल करणारे ध्यान महत्त्वपूर्ण आहे. अवगुण मावळून गुण प्रगट होण्याचा हा मार्ग संतांनी समाजाला दाखविला. संतकृपाप्राप्त समाज मोठा भाग्यशाली!
 
संत सहवासाचा सुगंध ज्यांना लाभला तो समाज भाग्यवान. संत भूलोकीचे चालते-बोलते ईश्वर असतात. ते समाजाचं भरकटलेलं तारू किनार्‍यावर सुखरूप आणतात. संतांचे उपकार कधीही न फिटणारे असतात. ते विवेकाचं आगर असतात. सुखाचं निजधाम असतात. समाजाला सजग करून सात्विकतेचा सुंदर साज चढवतात. दैवी गुणसंपदा देणारे संत सर्वांगाने परिपूर्ण असतात म्हणून  वापाशी मागणं मागतात
 
न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा !
 
 
 
 
- कौमुदी गोडबोले