युद्धभूमी
 महा एमटीबी  08-Mar-2018
 
 

 
कुरूक्षेत्रावर पांडवांनी पश्चिमेला तळ ठोकला, तर कौरव सैन्य भीष्मांच्या अधिपत्याखाली पूर्वेच्या बाजूस होते. अगदी पहाटे पहाटे पांडवांना कौरवांच्या सैन्यात पांढरीशुभ्र छत्री दिसली. ते राजचिन्ह बघून पांडव वीरांची मने थरारून गेली. अर्जुन व श्रीकृष्णाने आपआपले शंख फुंकले. त्याचे प्रत्युत्तर कौरवांनी लागलीच दिले. एकूणच युद्धभूमीवर चैतन्य सळसळत होते.
 
युद्धाचे नियम ठरविले गेले. दोन समान वीरांमध्येच युद्ध व्हावे, म्हणजे दोन रथी, दोन धनुर्धर, दोन गदाधर, असे झाले पाहिजे. त्यात एखाद्याने माघार घेतली तर त्याला अधिक छळू नये. जो तयार नसेल अथवा भ्यायला असेल त्याला सोडावे. दोघांमध्ये तिसर्‍याने पडू नये. जर शाब्दिक युद्ध असेल तर शब्दांचाच वापर व्हावा. बाण वापरू नये. सेवक, सारथी, घोडे, वाद्य वाजविणारे वादक याच्यावर हल्ला करू नये. असे सर्व नियम ठरले.
 
महर्षी व्यास धृतराष्ट्राला, आपल्या पुत्राला भेटले. याचा शेवट कौरवांच्या विनाशात होईल, असे भविष्य त्यांनी त्याला सांगितले. जर हे युद्ध आपल्या डोळ्यांनी बघायची इच्छा असेल तर मी तुला दिव्य नेत्र देतो, असेही ते म्हणाले. परंतु, धृतराष्ट्र म्हणाला, ’’माझ्या मुलांचे मृत्यू आपल्याच डोळ्यांनी पाहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मला असा कोणीतरी माणूस द्या जो युद्ध पाहून त्याचे प्रत्यक्ष वर्णन मला सांगेल. यातच मी समाधान मानेन.’’
 
मग व्यासांनी संजयला अंतर्दृष्टी दिली. ते म्हणाले, ’’या दिव्य नेत्रांनी संजय युद्धभूमीवर काय चालू आहे ते सर्व पाहू शकेल, इतकेच नाही तर लढणार्‍याच्या मनात काय विचार चालू आहेत, हेही त्याला कळेल. रात्री, दिवसा त्याला सारे दिसेल. तो दिवसभर रणभूमीवर असेल आणि रात्री येऊन तुला सर्व सांगेल. तो कधीही थकणार नाही. मात्र, कौरवांचा पराभव अटळ असून तुझ्या सर्व पुत्रांचा मृत्यू होणार आहे आणि पांडव अंती विजयी होतील,’’ असे सांगून धृतराष्ट्राचे सांत्वन करून व्यास निघून गेले. मग संजय सांगू लागला, ’’दुर्योधन सैन्याची व्यवस्था पाहण्यात गुंतला आहे. तो दु:शासनाला सांगतो आहे, उत्तम सारथी आणि उत्तम रथ पितामह भीष्मांना मिळतील असे पाहा. भीष्मांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्या धृष्टद्युम्नाच्या सैन्याचा पराभव करण्याची ताकद त्यांच्यातच आहे. पितामह म्हणाले होते की, ते शिखंडीशी लढणार नाहीत. कारण, आधी तो अंबा नावाची स्त्री होता, नंतर लिंग बदलून तो पुरुष झालाय. तेव्हा पितामहापासून त्या शिखंडीला काही करून लांबच ठेवले पाहिजे किंवा त्याला आधी ठार केले पाहिजे, पांडवांना ही गोष्ट माहिती आहे म्हणून अर्जुन स्वत: शिखंडीचे रक्षण करतो आहे. तेव्हा दु:शासना तू भीष्मांचे शिखंडीपासून रक्षण कर.’’
 
कौरवांनी दहा अक्षौहिणी सैन्य चौरस व्यूहात उभे केले. अतिशय अभेद्य अशी ही रचना होती. त्यात एक अक्षौहिणी सैन्य भीष्मांपाशी दिले होते. ते सर्वात अग्रभागी होते. पांढरेशुभ्र अश्व आणि उत्तम चांदीचा रथ त्यांना दिला होता. त्यांच्या ध्वजावर सोनेरी ताल वृक्ष आणि पाच तारे यांचे चित्र झळकत होते. पांढरेशुभ्र केस, शुभ्र वस्त्रे आणि शुभ्र दाढी यामुळे ते जणू उगवत्या चंद्रासारखे भासत होते. सूर्याच्या लाल सोनेरी किरणांनी पूर्व दिशा उजळली होती. भीष्मआपल्या सेनेस म्हणाले,’’हे वीरांनो, आज ज्याला रणांगणी मरण येईल त्याला स्वर्गच मिळणार आहे. भविष्याचा जराही विचार न करता सर्वांनी प्राणपणाने लढा. तुम्हाला क्षत्रियाचे वैभवशाली मरण हवे की अंथरुणात आजारी पडून मारायचे आहे हे तुम्ही ठरवा. उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहात आहे. जिंकण्यासाठी तयार व्हा.’’ त्यांचे शब्द ऐकून सैन्यात उत्साहाची एकच लहर सळसळली. सर्वांच्या हाती शस्त्रे होती. फक्त एका माणसाकडे ती नव्हती. तो म्हणजे राधेय! जोवर भीष्मजिवंत आहेत तोपर्यंत मी लढणार नाही, अशी शपथ त्याने घेतली होती. भीष्मांच्या अनुयायांना अश्वत्त्थाम्याचे नेतृत्व होते. शिवाय शल्य, भूरीश्रवां असे अनेक वीर भीष्मांच्या अवतीभवती होते.
 
सैन्याच्या मध्यभागी दुर्योधनाचा रथ होता. त्याच्या सुवर्ण रेशमी ध्वजावर सर्पाचे चित्र झळकत होते. त्याचे प्रचंड सैन्य पाहून युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाला, ’’अकरा अक्षौहिणी एवढे त्यांचे सैन्य आहे आणि आपले तर सातच अक्षौहिणी! भीष्मांच्या या प्रचंड सैन्यापुढे आपला निभाव कसा लागेल?’’ यावर अर्जुन म्हणाला,’’दादा, ही चौरस व्यूहाची रचना ‘वज्रव्यूह’ म्हणून परिचित आहे. ती वज्रासारखी अभेद्य असते. अशी रचना इंद्राला आवडते म्हणूनच याला ‘वज्रव्यूह’ म्हणतात.’’ पांडवांच्या आघाडीस धृष्टद्युम्न होता. त्याला मदत म्हणून भीमसोबत होता. मध्यभागी युधिष्ठिर आणि अर्जुन तसेच शिखंडी होता. सात्यकी उजवीकडे होता. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान विराजमान होता. रथास पांढरेशुभ्र घोडे होते, सारथी श्रीकृष्ण सुहास्यवदनाने त्याचे सारथ्य करत होता. कृष्ण-अर्जुन जोडी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. द्रोण आणि कृप हे या जोडीला नर व नारायण यांची जोडी मानत होते. त्यांनी मनातल्या मनात या जोडीला वंदन केले. कृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यावर समोर आणला आणि तो म्हणाला, ’’अर्जुना, नीट पाहा, तू आता खंबीर राहा, हे भीष्म, कौरव वीरांतील ते सिंह आहेत. हाच वीर पुरुष तुझा पहिला बळी असणार आहे. या महायुद्धाला आता तयार हो!’’
 
 
 
 
- सुरेश कुळकर्णी