संघर्ष तिचा माणूस म्हणून जगण्यासाठी...
 महा एमटीबी  08-Mar-2018
 

 
प्रत्येक जिवंत स्त्रीसाठी प्रत्येक दिवस ’महिला दिन’च असतो. तरीही आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयान हिर्सी अलीबद्दल लिहावेसे वाटले. कारण की...
 
थेव वॉन गोश यांनी ’सबमिशन’ या लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटाचा विषय होता इस्लाम धर्मातील काही कालबाह्य रूढींमुळे मुस्लीम महिलांचे होणारे शोषण. या लघुपटाची पटकथा लिहिली होती आयान हिर्सी अलीने. त्यामुळे थेव वॉन गोश यांची इस्लामिक कट्टरपंथाच्या मोहम्मदने निर्घृण हत्या केली. यानंतर गोशच्या पार्थिवात चाकू खुपसून त्यावर संदेश दिला होता की, यानंतर आयान हिर्सीची हत्या होणार. १९७९ साली जन्मलेल्या आयानचा जन्म सोमालियामधला. तिचे वडील हिर्सी इसास हे राजकीय कार्यकर्ते. आयानची वयाच्या पाचव्या वर्षी धार्मिक रूढींनुसार सुंता केली गेली. या विधीचा त्रास-परिणाम आयुष्यभर भोगताना आयानचे मत साहजिकच बनले की, मुलींच्या नैसर्गिक लैंगिक इच्छेला क्रूरतेने मारून टाकण्यासाठीचा हा विधी असून त्यामुळे स्त्रियांच्या शुद्ध मानवी हक्कांचे क्रूरपणे हनन होते. पुढे आयानचे कुटुंब सौदी अरेबियाला पोहोचले. तिथे इस्लाम कट्टरविधींचे पालन अगत्याने करणे हा आयानच्या जीवनशैलीचा भाग झाला. इतका की ’सटेनिक व्हर्सेस’ लिहिणार्‍या सलमान रश्दींविरुद्ध जेव्हा कट्टरपंथीयांकडून फतवा काढण्यात आला, तेव्हा तिने फतव्याचे समर्थन केले. पुढे तरुण आयानला तिच्या इच्छेविरुद्ध केवळ घरच्यांची इच्छा म्हणून लग्न करावे लागले. त्या विवाहानंतर बालविवाहाचे दुष्परिणाम, इच्छेविरुद्ध विवाह केल्यानंतरचे नीरस जगणे आणि मुख्यता योनीमार्गाला कापून, पुन्हा योनीचे मुख शिवून सुंता केल्यावर विवाहानंतर एका स्त्रीला होणारी यातना हे सगळे तिने अनुभवले. आयानने त्यावेळी जे अनुभवले ते जगभरातल्या करोडो मुस्लीम स्त्रिया अनुभवत होत्या. पण, या करोडो स्त्रिया परिस्थितीला शरण जाऊन मरेपर्यंत मरत मरत जगायचे हे मेलेल्या मनाने ठरवतात.
 
आयान या सर्वांपेक्षा इथे वेगळी ठरते. तिने विचार केला, तिच्यासारख्या करोडो स्त्रिया आहेत. दुर्दैव आणि दुःख की या महिलांना चुकूनही वाटत नाही की त्याही माणूस आहेत आणि माणसासारखं जगण्याचा त्यांनाही अधिकार आहे. आयानने दशेपासून वाचण्यासाठी दिशा शोधली. ती नेदरलँडला गेली. तिथल्या राजकारणात तिने पाऊल ठेवले. ती जिंकलीही. सोमालिया ते नेदरलँडच्या जीवनप्रवासात महिला म्हणून सहन केलेल्या सर्वच यातनांचा ती आवाज बनली. घरगुती हिंसा, बालविवाह, जबरदस्ती विवाह, महिलांची आणि पुरुषांचीही सुंता यावर ती उघड उघड आवाज उठवू लागली. धर्मात जर असेल लिहिले असेल तर धर्माची पुनर्रचना करायला हवी. त्यात सुधारणा व्हायलाच हवी. त्यातच २००१ साली अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरवर हल्ला झाल्यानंतरचा व्हिडिओ प्रदर्शित केला. त्यात लादेन म्हणत होता, हा नियतीचा न्याय आहे. त्यासाठी त्याने कुराणाचा हवाला दिला. हे सगळं पाहून आयान हवालदिल झाली. धर्म अशा न्यायाचे समर्थन करत असेल तर त्या धर्माचा पुन्हा नव्याने विचार करायलाच हवा, असे तिला वाटले. आपले विचार तिने ‘इनफिडेल, द केज व्हर्जिन, नोमॅड, हेरेटिक : व्हाय इस्लामनीड्‌स रिफॉर्मेशन नाऊ’ या पुस्तकातून मांडले. जे लिहिले त्यावर कृती करण्यासाठी अहा (AHA) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. ती आणि तिची संस्था जगभरातल्या दुःखी पीडित वंचित महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करते. अर्थात त्यासाठी तिला जागतिक स्तराचे अत्यंत प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण, त्यासोबतच मुस्लीम कट्टरपंथीयांकडून तिच्या मृत्यूचा फतवाही तिला मिळाला आहे. घरगुती हिंसा, बालविवाह, महिलांची आणि पुरुषांचीही सुंता यावर निर्भयपणे आवाज उठविणार्‍या आयानचा संघर्ष माणूस म्हणून जगण्यासाठीचा आहे.
 
 
 
- योगिता साळवी